वसंत भोसले
काेल्हापूरच्या ताराबाई पार्क या उच्चभ्रूंच्या परिसरात मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांचा अर्धपुतळा आहे. त्या चाैकातून ये-जा करणाऱ्या दहाजणांना हा पुतळा काेणाचा आहे, असे विचारले तर आठजण सांगतील की, मला माहीत नाही. कारण अण्णासाहेब लठ्ठे यांची काेल्हापूर संस्थानातील दिवाणबहाद्दूर म्हणूनची कामगिरी पहिल्या महायुद्धाच्या काळातली! सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा हा कालखंड आजच्या पिढीला माहीत नसणे स्वाभाविक आहे. त्या पुतळ्याचे ज्यांनी अनावरण केले, त्या मान्यवरांचे निधन होऊनही आता काही दशके लोटली आहेत. पण, लाेकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर हाेताच कागद चिकटवून तो अनावरण फलक झाकला जातो. का?- त्या नामवंत राजकारण्यांचा प्रभाव आजच्या मतदारावर पडू नये म्हणून!
१९८६ च्या डिसेंबर महिन्यात काेलकात्यात जाण्याचा याेग आला हाेता. पुढे मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका हाेत्या. त्या अद्याप जाहीर व्हायच्या हाेत्या. तत्पूर्वीच डाव्या आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने काेलकात्यात भिंती रंगवून आपली भूमिका मांडली हाेती. उत्तम चित्रे काढली हाेती. व्यंगचित्रे काढून राजकीय टीकाटिप्पणी केली हाेती. काव्य, वात्रटिका लिहिल्या हाेत्या. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणावर भाष्य केले हाेते. त्यातून राजकीय पक्षांची भूमिका समजत हाेती. आचारसंहितेच्या नावाखाली सध्या हा संवादच संपवून टाकला गेल्याचे चित्र दिसते. प्रचारसभा, बैठका, मेळावे, मिरवणुकादेखील सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच घेण्याची सक्ती आहे. उन्हाळ्याचे दिवस, देशभर उष्णतेचा पारा चाळीस अंशांवर पाेहाेचला आहे. सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत जाहीर सभा घेणे शक्य आहे का? अनेक मतदारसंघांचा परीघ २०० ते ४०० किलाेमीटर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन फार तर तीन सभा हाेऊ शकतात. सात-आठ तालुक्यांत प्रचाराच्या केवळ तीन आठवड्यांत फिरणे अशक्य आहे. डाेंगरदऱ्या, डाेंगराळ वस्ती, वाळवंटी प्रदेश असेल तर आणखीनच महाकठीण! माेठ्या शहरात सायंकाळी सभा हाेत नाही, झाल्या तर वाहतूक व्यवस्था काेलमडते. तालुक्याच्या गावात उन्हाळ्यात रात्री १२ वाजेपर्यंत लाेक जागे असतात. उन्हाचा तडाखा संपलेला असताे. रात्री १२ वाजेपर्यंत सभा व्हायला काय हरकत आहे?
सार्वजनिक निवडणुकीत लाेकसंपर्कासाठी मर्यादा असता कामा नये. पाेस्टर्स लावायची नाहीत, भिंती रंगवायच्या नाहीत, पुतळे उघडे ठेवायचे नाहीत हा आग्रह कशासाठी? लाेकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात सरासरी अठरा ते वीस लाख मतदार असतात. त्यांच्यापर्यंत पाेहाेचण्यासाठी, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना माेकळीक नकाे का? १९९० पर्यंत २४ तास जाहीर सभा घेण्यास परवानगी हाेती. तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांची महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारार्थ २६ फेब्रुवारी १९९० राेजी सांगलीत पहाटे साडेतीन वाजता सभा सुरू झाली आणि चार वाजून पाच मिनिटांनी संपली. रात्री दहापासून तीस हजार लाेक थांबले हाेते. अनेकजण वळकटी आणून मैदानावर चक्क झाेपले हाेते. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची विटा (जि. सांगली) येथे पहाटे पाच वाजता सभा झाली हाेती. तत्पूर्वी ११ वाजता काेल्हापुरात सभा करून ते निघाले हाेते.
राजकीय पक्षांना तसेच नेते तथा उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. साधने वापरात आली पाहिजेत. डिजिटल फलकांनी बारा महिने शहरांचे विद्रुपीकरण होते, तेव्हा काेणी तक्रार करीत नाही. अमेरिकेत एका व्यासपीठावर येऊन दाेन्ही पक्षांचे उमेदवार वाद-प्रतिवाद करतात. त्याला उत्तम प्रतिसाद मिळताे. आपल्याकडे असे हाेतच नाही. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय, आर्थिक, आराेग्य, शिक्षण, परराष्ट्र धाेरण, आदींवर जाेरदार चर्चा घडून आली पाहिजे. मतदान वाढावे म्हणून निवडणूक आयाेगातर्फे काम होते. ताे जनजागृतीचा भाग असेल तर राजकीय जागृती करण्यासाठी प्रचारावर मर्यादा का?
निवडणूक आयाेग मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करते, तसे राजकीय पक्षांचा संवाद वाढविण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. आचारसंहिता म्हणजे प्रचारावर निर्बंध असे असू नये. लाेकसहभाग वाढत असेल तर काही मर्यादा पाळून चाेवीस तासही प्रचारासाठी माेकळीक देण्याचा विचार जरूर झाला पाहिजे!
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)