जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद!

By किरण अग्रवाल | Published: September 10, 2023 11:42 AM2023-09-10T11:42:46+5:302023-09-10T11:48:35+5:30

Politics : यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे.

Communication with the public, but discord among themselves! | जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद!

जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद!

googlenewsNext

- किरण अग्रवाल

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या कोमेजलेल्या आशांना जिवंत करण्याचे काम दीर्घ प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे घडून आले, त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीच्या रणांगणात नशीब आजमावू पाहणाऱ्यांसोबतच त्यांचे भाग्य ठरविणाऱ्या मतदारांमध्येही सक्रियता व उत्साह भरण्याचे काम राजकीय कार्यक्रमांमुळे पश्चिम वऱ्हाडात घडून आल्याचे म्हणावे लागेल. 


‘हो ना, हो ना’ करता करता मेहकरची जागा बदलून बुलढाण्यात का होईना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम घेतला गेला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद यात्रेपाठोपाठ विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचीही संवाद यात्रा पश्चिम वऱ्हाडात येऊन गेल्याने राजकीय माहौल तापून गेला आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे तसे विरोधात ट्रिपल पक्षांची महाआघाडी आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे. ऐनवेळीच ते स्पष्ट होणार असले, तरी सर्वांनीच राजकीय मशागतीस प्रारंभ करून दिला आहे. बावनकुळे व वडेट्टीवार यांच्या यात्रा त्याचदृष्टीने नांगरणीसाठी येऊन गेल्याचे म्हणता यावे.


बावनकुळे यांनी चिखली, खामगावात जनसंवाद साधला; मात्र जालन्यातील उपोषणकर्त्या मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद पाहता अकोल्यातील दौऱ्यात पदयात्रा टाळून पक्ष कार्यकर्त्यांची बैठक व काहींच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या. या यात्रेनिमित्त भाजपातील सारे नेते पुन्हा एकवटलेले दिसून आले असले तरी व्यासपीठावर एकाच गुलाबी हारात गुंफलेल्या स्थानिक नेत्यांमधील विसंवाद अकोलेकरांपासून लपलेला नाही. तेच चित्र वडेट्टीवार यांच्या यात्रेनिमित्त काँग्रेसमध्ये बघायला मिळाले. वडेट्टीवार यांच्या अकोला दौऱ्यापूर्वी अवघ्या तीन-चार दिवस अगोदरच अकोटमध्ये पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांची एक बैठक होऊन त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याविरुद्ध अविश्वासाची चर्चा केली गेली असली, तरी वडेट्टीवारांसोबतच्या व्यासपीठांवर मात्र आजी माजी सारेच नेते परस्परांचा हात हाती घेत वावरल्याचे पाहावयास मिळाले. 


अकोल्याच्या काँग्रेसमध्ये जितके नेते तितके गट झाल्याची वास्तविकता आहे. नेते अधिक झाले; परंतु, कार्यकर्त्यांची वानवा आहे. १९८९ पासून लोकसभेतील अकोल्याची जागा काँग्रेसच्या हातून जी गेली ती पुन्हा येऊ शकलेली नाही. मात्र, अशाही स्थितीत या पक्षाकडून आजही ही जागा लढविण्यासाठी महाआघाडीअंतर्गत दावा केला जातो हे विशेष. 


विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसला अनपेक्षितपणे लॉटरी लागली. भाजपतील अंतस्थ नाराजीमुळे काँग्रेसला हे यश लाभले. आताही एकूण राजकारण बघता महाआघाडीला हायसे वाटावे असे चित्र आहे; पण त्या वातावरणावर स्वार होत आगेकूच करण्यात स्थानिक काँग्रेसचे नेते कमी पडत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस अंग झटकून कामाला लागलेली दिसत आहे, तसे अकोला जिल्ह्यात दिसत नाही. निवडणूक काळातील लाभाची गणिते लक्षात घेता पक्षाची सूत्रे आपल्याच हाती यावीत, म्हणून काहींनी उचल खाल्ल्याचे चित्र समोर येत आहे. 
सारांशात, सर्वपक्षीय संवाद वाढला असून निवडणुकीसाठीची अस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. अशात ‘जो जीता वही सिकंदर’ या न्यायाने जो सक्रियता दर्शवेल त्याच्याच वाट्याला अच्छे दिन येणार हे नक्की असले तरी, त्यासाठी अगोदर स्वकीयांतील विसंवाद दुर होणे गरजेचे आहे. 
 
 

Web Title: Communication with the public, but discord among themselves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.