- डॉ. रामचंद्र देखणेशांती या तत्त्वाला जसे आध्यात्मिक मूल्य आहे तसेच व्यावहारिक जीवनातही शांती या तत्त्वाचे मूल्य सर्वश्रेष्ठ आहे. खरे तर कोणतेही मूल्य आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशा द्वंद्वांत बांधलेले नसते. आध्यात्मिकता ही सदाचारी जीवन व्यवहारापासून कधीच दूर गेलेली नसते. म्हणून तर आध्यात्मिक मूल्यांची परिणती आणि प्रत्यक्ष कृती ही व्यवहारी जीवनात उतरायला हवी अशीच धारणा आहे. दोहोंचाही विचार केला तर लक्षात येते की शांती ही वाटचाल, प्रसन्नता हा विसावा तर समाधान हा मुक्काम आहे. प्रत्येकालाच ही वाटचालही हवी आहे, विसावाही हवा आहे आणि मुक्कामही तत्त्ववेत्यांनी शांतीला खूप उच्चतम अवस्थेला नेऊन ठेवले आहे. शांती हेदेखील ब्रह्माचेच स्वरूप आहे. म्हणूनच शांतिब्रह्म ही अवस्था मांडली गेली. ज्ञात्याने जी वस्तू जाणावयाची ती पूर्णपणे जाणल्यावर मागून साता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच शांती असे म्हणतात. शांती हे मानवी पूर्णत्वाचे लक्षण आहे. ब्रह्मदारण्यकोपनिषदान शांतीमय आला आहे. ‘‘ॐ पूर्णमद: पूर्णमिंद पूर्णात्पूर्णमुदच्यते,पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।, ॐशांति:।शांति:।शांति:।’’ ॐ पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निष्पन्न होते आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक रहाते. यावर गुरुदेव रा. ड. रानडे यांनी सुंदर भाष्य केले आहे की, आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही पूर्ण आहेत. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण आत्मा वजा केला तर पूर्णच शिल्लक रहाते. एका पूर्णामुळे दुसऱ्या पूर्णास पूर्ण अस्तित्व प्राप्त होते. पण, हे ब्रह्म, आत्मा किंवा एवढ्या जड जड विचारातून मांडलेले शांती तत्त्वाचे विवेचन हे सामान्यांच्या प्रतिभेला केव्हा समजणार? त्या संकल्पना आणखी सोपी करून सांगणे आवश्यक ठरते. इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्याला ज्ञानाने जाणायचे आहे ते ज्ञेय होय. आणि जो जाणणारा आहे तो ज्ञाता होय. ज्याला जाणायचे आहे त्याला जाणल्यावर ज्याने जाणले आहे त्याच्या ज्ञातेपणाचाही त्यात लय होतो आणि जे उरते ते शांतीचे रूप होय. अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचे तर एखाद्याला एक सुंदरसे ध्येय गाठायचे असते. तो त्यासाठी खूप परिश्रम करतो. एक अवस्था अशी येते की त्याला जे ध्येय गाठायचे आहे ते त्याने मिळविलेले आहे मग आता त्या ध्येयामध्येच त्या ध्येयाविषयीची त्याची आसक्ती आणि ध्येयपूर्ती करणाऱ्याचा अभिमानही आपोआप विरतो आणि उरती ती शांती. थोडक्यात सांगायचे तर ज्ञानाचाही अहंकार आणि कर्माचाही अहंकार जाऊन अहंकारविरहित जी वृत्ती होते तीच शांती होय. खरे तर इथे आसक्ती संपलेली असते. कारण ध्येयाचेही पूर्णत्व प्राप्त झालेले असते. थोडक्यात समाधानाचे आणि तृप्तीचे पूर्णत्व म्हणजे शांती.
पूर्णत्व आणि शांती
By admin | Published: March 09, 2017 3:56 AM