मिलिंद कुलकर्णीचार महिन्यांनंतर कोरोनाची भीती कायम असली तरी रोजगाराच्या चिंतेने लोक आता पुरेशी खबरदारी बाळगून बाहेर पडू लागले आहेत. काही ठिकाणी बेफिकीरी, बेशिस्त आहे, मात्र त्यांना कायद्याची भाषा वापरायला कोणाची हरकत असणार नाही. मात्र सध्या आकड्यांची चिंता महसूल व आरोग्य-वैद्यकीय प्रशासन अधिक करीत असल्याचे दिसते. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आता स्वयंसेवी व सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी पुढे येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपाचारासाठी रुग्णालये, केंद्रे आणि विलगीकरण कक्ष सुरु होत आहे. त्यात खाटांची व्यवस्थादेखील होत आहे. मात्र कोरोना नसलेल्या इतर रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्या मात्र चिंता वाढविणाऱ्या आहेत.जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर जून महिन्यात १२.१९ टक्के होता. त्यावेळी देशाचा मृत्यूदर २.८ टक्के तर राज्याचा ३.५ टक्के होता. जळगाव हे मृत्यूदराविषयी राज्यात सर्वोच्च स्थानी होते. त्याखालोखाल खान्देशातील नंदुरबार १० टक्के व धुळे ९ टक्के असे दुसºया व तिसºया स्थानी होते. त्याची कारणे अनेक आहेत. त्याविषयी चर्चा खूप झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात येऊन परिस्थितीची पाहणी करुन उपाययोजना सूचवल्या. केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सूदन यांनी व्हीसीद्वारे केलेल्या सूचना, केंद्रीय आरोग्य पथकातील वरिष्ठ विभागीय संचालक डॉ.ए.जी.अलोने, राज्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी प्रत्यक्ष रुग्णालयांना दिलेल्या भेटी आणि अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानंतर कोरोनाच्या तपासणीत वाढ झाली. तालुक्यांच्या ठिकाणी तपासणी आणि अहवाल लवकर मिळू लागल्याने पुढील उपचार सुलभ झाले. आॅक्सिजनयुक्त खाटांच्या संख्येत समाधानकारक वाढ होत आहे. त्याचा परिणाम बरे होणाºया रुग्णांची संख्या वाढण्यात आणि मृत्यूदर कमी होण्यात झाला आहे. सामूहिक प्रयत्नाने हे होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे.१५ जुलैची राज्य आणि जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या पाहता हे चित्र अधिक स्पष्ट होते. महाराष्टÑात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ६७ हजार ६६५ आहे. त्यापैकी एक लाख ४९ हजार रुग्ण बरे झाले. एक लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १० हजार ६९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ६ हजार ६५४ आहे. त्यापैकी ४ हजार ८ रुग्ण बरे झाले. २ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ३५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ हजार ९०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ४० लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात ३४ हजार रुग्णांची तपासणी झालेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.वैद्यकीय व आरोग्य यंत्रणेमार्फत त्रिस्तरीय रचना राबवून उपचार केले जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नाही, पण संशय आहे अशांसाठी कोविड केअर सेंटर, मध्यम लक्षणे असणाºयांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर गंभीर लक्षणे असणाºयांसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असे काम सुरु आहे. घरोघर सर्वेक्षण होत आहे. अँटीजेन चाचणी होत आहे. या परिस्थितीत रुग्णसंख्या वाढणार आहे. तशी मानसिकता आता सगळ्यांनी करायला हवी. परंतु, हे सगळे होत असताना कोरोनाशिवाय इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार कसे होतील, याची काळजी वैद्यकीय व आरोग्य प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना विश्वासात घ्यायला हवे. त्यासोबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी खाजगी रुग्णालयांनी कोरोनाव्यतिरिक्त असलेल्या रुग्णांवर उपचार करावे, यासाठी प्रयत्न, देखरेख आणि शेवटी कारवाई अशा पध्दतीने कार्यवाही करायला हवी. कुत्र्याने हल्ला केलेल्या रुग्णाला सहा तास फिराफिर करावी लागते, हे मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाºया जळगावच्या लौकिकाला शोभा देणारे नाही. आरोग्य सेवेकडे केंद्र व राज्य शासनाचे असलेले कमालीचे दुर्लक्ष या कोरोना संकटकाळात अधोरेखित झाले. त्यातून काही धडा घेऊन अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्याचा शहाणपणा राज्यकर्ते दाखवतात काय, हे बघायला हवे. परंतु, तोवर आपल्या गाव, शहरात तरी उपचाराविना कोणी राहणार नाही, याची दक्षता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी घ्यायला हवी.
आकड्यांपेक्षा रुग्णांची चिंता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:45 PM