मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या बहुतेक सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत भारतीय जनता पक्षाने मिळविलेला नेत्रदीपक विजय हा मोदींच्या करिष्म्याचा, फडणवीसांच्या तडाखेबंद प्रचारकार्याचा आणि राज्यभरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांनी ही निवडणूक संपूर्ण जिद्दीनिशी तर राष्ट्रवादी काँग्रेसने ती गमावल्यासारखी लढविली. काँग्रेस पक्षाला तेवढेही करणे जमले नाही. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने त्या पक्षाला जी ग्लानी आणली तिच्यातून त्याला अद्याप बाहेरच पडता आले नाही. निवडणूक निकालांचे विश्लेषक काहीही म्हणोत, वास्तव हे की या निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रत्यक्षात फारसा कुठे दिसलाच नाही. फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्री राज्यभर फिरून प्रचारदौरे करीत असताना काँग्रेसचे पदाधिकारी आपापल्या बिळात वा जिल्ह्यात राहून हातवारे करताना दिसले. त्यांचे हस्तक तर अखेरच्या क्षणापर्यंत तिकिटांच्या वाटपाचे सौदे करण्यात आणि त्यात आपली माणसे पुढे आणण्याच्या प्रयत्नात गढले होते. परिणामी भाजपाचा प्रचार ऐन रंगात आला तेव्हा काँग्रेसचे लोक पक्षाचे झेंडे शोधताना दिसले. त्यांच्या सभा नाहीत, मिरवणुका नाहीत की प्रचारफेऱ्या नाहीत. नेत्यांनी तिकीट दिले आहे आणि त्यावर निवडून येणे ही तुमची जबाबदारी आहे असेच पक्ष व उमेदवार यांच्यातील नाते त्या पक्षात असल्याचे या निवडणुकीत आढळून आले. एकतर या पक्षाजवळ चांगले वक्ते नाहीत, प्रभावी प्रचारक नाहीत आणि पक्षाची ध्येयधोरणे व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवू शकतील एवढी विश्वसनीयता असलेले लोकही फारसे नाहीत. भाजपा सरकारच्या चुका हेच आपले निवडणुकीतील भांडवल असल्याच्या समजावर समाधान मानणारे, त्या पक्षाच्या समोर पर्यायी कार्यक्रम ठेवू शकणारे आणि राज्यातील वाढत्या समस्यांचा ऊहापोह करणारे वा करू शकणारे लोक अभावानेच दिसणे हे आजच्या काँग्रेस पक्षाचे खरे चित्र आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढल्या आहेत. महागाई कमी होत नाही. ग्रामीण भागातले मागासचित्र तसेच राहिले आहे. बेरोजगारी कायम आहे आणि भाजपाच्या कार्यक्रमांना अजून परिणामकारकता साधता आली नाही एवढे सगळे प्रश्न समोर असताना काँग्रेसचे नेते, त्याचे अनेक माजी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व खासदार स्वस्थचित्ताने निवडणूक ‘साजरी’ करताना दिसणे हे त्या तेजस्वी इतिहास असणाऱ्या पक्षाचे आताचे लाजिरवाणे स्वरूप आहे. तरुणाईला बदल हवा असतो, नवे कार्यक्रम आणि नव्या दिशा लागत असतात. मात्र ते करायला लागणारी क्षमता, प्रतिभा आणि उंची नसलेली पराभूत मनोवृत्तीची माणसेच काँग्रेस पक्षात दिसली. राज्यातील तरुणाईला उत्साह वा उल्हास देऊ शकेल, असा एकही चेहरा पक्षाला राज्यात पुढे करता येऊ नये, लोकांना आकृष्ट करील असा विकासाचा एकही कार्यक्रम जनतेसमोर ठेवता येऊ नये, राज्यात व देशात वाढत असलेल्या धर्मांध व जात्यंध शक्तींबाबत जराही जोरकसपणे बोलता येऊ नये या मचूळ व मुर्दाड प्रवृत्तीला कोण मते देईल? व किती काळ ती देत राहील? ऊठसूट अल्पसंख्य, दलित, आदिवासी, वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त यांच्या नावाने नुसती भाषणे करणे हे आता पुरेसे नाही. एखादे शरद जोशी वा एखादे जांबुवंतराव जे घडवू शकतात ते या सव्वाशे वर्षाच्या पक्षातील पुढाऱ्यांपैकी एकालाही जमू नये याएवढी दुर्दैवी स्थिती कोणती? झालेच तर दरवेळी दलित, पीडित असे म्हणत राहिल्याने व अल्पसंख्यकांचा तोंडी कड घेतल्याने समाजाचा मध्यप्रवाह आपल्यापासून दूर जातो हे समजण्याएवढे साधे शहाणपणही या स्वत:ला मध्यममार्गी म्हणविणाऱ्या पक्षाला जमू नये काय? राष्ट्रीय म्हणविणाऱ्या पक्षाने कोणताही एक धर्म, वर्ग वा जात किंवा समुदाय आपला न मानता सारा देश व समाज आपला समजणे महत्त्वाचे ठरते. काँग्रेस पक्षाचा आताचा पराभव हा त्याच्या नाकर्त्या प्रवृत्तीचा पराभव असला तरी जनसामान्यांमध्ये व ग्रामीणांमध्ये त्या पक्षाच्या इतिहासाविषयीचा आदर कायम आहे. आजच्या नेत्यांचे करंटेपण हे की तो आदरही त्यांना आपल्या पक्षाच्या कामासाठी संघटित करता आला नाही. आताचा पराभव त्या पक्षाच्या आताच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण टाकणाराच नाही, तो त्याच्या सव्वाशे वर्षांच्या तेजस्वी परंपरेवरही पाणी ओतणारा आहे. भाजपाचा उत्साह यामुळे वाढणे स्वाभाविक आहे. त्याचा विजय अभिनंदनीय म्हणावा असाही आहे. काँग्रेसचा पराभव मात्र त्यावर अश्रू गाळण्याएवढाही महत्त्वाचा नाही हे येथे खेदाने नमूद केले पाहिजे. आपली माणसे, त्यांच्या श्रद्धा, त्यांची स्वप्ने आणि आपले कार्यक्रम यांच्यात मेळ घालणे व जनतेशी असणारी आपली नाती नव्याने दृढ करीत नेणे त्या पक्षाला यासाठी गरजेचे आहे. आताचा आळस, सुस्तपणा व गळाठलेपण सोडून पक्षशिस्त कायम करणे हेही आवश्यक आहे. सारा समाजच आपला आहे ही भावना जागवणे आणि आपापले क्षुद्र हितसंबंध बाजूला सारणे त्यासाठी आवश्यक आहे. असो, भाजपाचे अभिनंदन आणि काँग्रेसला संजीवनीच्या शुभेच्छा.
भाजपाचे अभिनंदन आणि काँग्रेसचे सांत्वन
By admin | Published: February 24, 2017 12:48 AM