काँग्रेसमधील भांडणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:48 AM2017-11-02T03:48:10+5:302017-11-02T03:48:18+5:30
२०१४ मध्ये देशात व नंतर राज्यात भाजपाची लाट आली. भाजपाला एकतर्फी बहुमत तर काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. या पराभवातून पुढील दोन-अडीच वर्षे काँग्रेस सावरली नाही. काँग्रेसचा गड मानल्या जाणा-या विदर्भातही काँग्रेसच भुईसपाट झाली होती.
२०१४ मध्ये देशात व नंतर राज्यात भाजपाची लाट आली. भाजपाला एकतर्फी बहुमत तर काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. या पराभवातून पुढील दोन-अडीच वर्षे काँग्रेस सावरली नाही. काँग्रेसचा गड मानल्या जाणा-या विदर्भातही काँग्रेसच भुईसपाट झाली होती. काँग्रेसचे वाईट दिवस पाहता स्वत:साठी अच्छे दिनच्या शोधात काँग्रेसचे अनेक नेते भाजपावासी झाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अलीकडेच मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद, सोशल मीडियावर वाढते पाठबळ हे सर्व त्यावेळी नव्हते. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झालीत. जसजसा काळ लोटला तसतसे नोटाबंदी, जीएसटी यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या लोकप्रियतेचा ग्राफ घसरत गेला. या संधीचा फायदा घेऊन गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी, स्वत:मधील आत्मविश्वास जागविण्यासाठी, काँग्रेस नेते ताकदीने एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, विदर्भात नेमके याउलट होत आहे. नागपूरसह विदर्भात सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी व नेत्यांच्या भांडणाचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपालाच होत आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपासारखा बलाढ्य शत्रू समोर असताना काँग्रेसने आपसातच ‘पंजा’ लढविला. गटनेता बदलण्याचा वाद कोर्टापर्यंत गेला. सरकारच्या तीन वर्षे पूर्तीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने राज्यात विभागनिहाय ‘जन आक्रोश मेळावा’ घेण्याचा कार्यक्रम आखला. चंद्रपुरात ६ नोव्हेंबरला हा मेळावा होत आहे. मात्र, माजी खा. नरेश पुगलिया यांनी त्याच दिवशी समातंर मेळावा आयोजित करून त्यात विदर्भातील नाराज नेत्यांना निमंत्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वालाच अप्रत्यक्ष आव्हान दिले जात आहे. या बाबी काँग्रेसला मजबूत करणाºया नाहीत. उलट कार्यकर्त्यांचा उत्साह नष्ट करणाºया आहेत. आज सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेसचे ‘हात’ मजबूत करण्याची गरज असताना नेते आपसात भांडत आहेत. यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपाला बळ मिळत असून कार्यकर्त्यांचा उत्साहही मारला जात आहे. या नेत्यांना यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे. ३१ आॅक्टोबर रोजी नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. पुण्यतिथीलाही गटबाजीचे दर्शन घडले. हा एकूणच प्रकार दुर्दैवी आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि ईर्षेने पछाडलेले विदर्भातील काही काँग्रेस नेते पक्षाचेच नुकसान करीत आहे. काँग्रेसच्या पुण्याईवर या नेत्यांनी खूप काही कमावले. पण आज पक्ष संघर्ष करीत असताना हे नेते आपल्याच पक्षाला बुडवायला निघाले आहेत.