काँग्रेस आघाडीत एकी तर भाजपामध्ये बेकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:23 PM2018-09-05T13:23:07+5:302018-09-05T13:24:12+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या संतापाची झळ चंद्रकांत पाटील यांनाही बसली. मी काही आकाशातून आलेला नेता नाही.
मिलिंद कुलकर्णी
लोकसभा, विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने राजकीय पक्ष अधिक सक्रीय झाले आहेत. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची यात्रा आटोपली. आता बूथपातळीवर हा पक्ष काम करीत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील त्यासाठी जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. निवडणुकांसाठी जोरबैठका सुरु झाल्याचे चित्र आहे.
ही पार्श्वभूमी असताना खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच धुळ्याच्या महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी महापालिकेच्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा शरद पवार यांच्याहस्ते घडवून आणला.
या सोहळ्याच्या निमित्ताने कॉंग्रेस नेते अमरीशभाई पटेल, आमदार कुणाल पाटील यांनाही व्यासपीठावर स्थान दिले. पवारांनीही पटेल यांना महत्त्व दिले. तुम्ही शिरपूरपुरते मर्यादीत राहू नका. राज्याला तुमच्यासारख्या नेत्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले. पवार यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. याही वक्तव्याचे तसेच झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्ह्यात एकत्र राहावे, पटेल यांनी राष्ट्रवादीत यावे असे तर्क लढविण्यात आले. पण पटेल आणि कदमबांडे यांचे घनिष्ट संबंध आहेत. जिल्हा बँक, जिल्हा परिषद या संस्थांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित काम करीत आहे. नंदुरबारात राष्ट्रवादीचे बळ फार नाही. तेथे काँग्रेसच प्रबळ आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्य ठेवल्यास भाजपापुढे मोठे आव्हान निर्माण करु शकतात. पवार यांना हेच सुचवायचे असावे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रथमच धुळे आणि नंदुरबारचा दौरा केला. राष्ट्रवादीची संघटनात्मक स्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. त्यादृष्टीने ते पुढील रणनीती ठरवतील.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या संतापाची झळ चंद्रकांत पाटील यांनाही बसली. मी काही आकाशातून आलेला नेता नाही. मला कुणी आमदार, मंत्री बनविलेले नाही. मी खालून वर आलो आहे, असे म्हणत त्यांनी पाटील यांनाच टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खडसे आता ‘एल्गार यात्रा’ काढणार आहेत. ओबीसीचे कार्ड हाती घेत खडसे खरोखर यात्रा काढतात काय, पक्षश्रेष्ठी त्यांच्या वक्तव्य आणि संभाव्य कृतीची काय दखल घेतात, हे पुढील काळात स्पष्ट होईल. धुळे महापालिका निवडणुकीत आता खरा रंग भरु लागला आहे. महामार्गावरुनच धुळ्याला ‘बायपास’ करणाऱ्या गिरीश महाजन यांनी दहीहंडीच्या निमित्ताने धुळ्यात प्रवेश केला. जळगावसारखी कामगिरी करुन दाखविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. महाजन समर्थकांना आव्हान सोपे वाटते. पण परिस्थिती तशी नाही, हे महाजन यांनाही धुळ्यात गेल्यावर लक्षात आले असेल. जळगावविषयी महाजन यांना इत्यंभूत माहिती आहे. विश्वासू कार्यकर्ते सोबत आहेत. धुळ्यात नेते सोबत आहेत, पण जळगाव, जामनेरहून कार्यकर्ते घेऊन जाऊन काम भागणारे नाही. आव्हान केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे नाही तर भाजपातील दुहीचेदेखील आहे. स्वपक्षीय आमदार अनिल गोटे हे निवडणुकीच्या तयारीला केव्हाच लागले आहेत. त्यांचा आक्रमक स्वभाव, तडफदार कार्यशैली पाहता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी ते कसे जुळवून घेतात, रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह पक्षश्रेष्ठी ही मोट कशी बांधतात, हा उत्सुकतेचा आणि भाजपाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. गोटे यांचे पूत्र तेजस आणि खडसे यांचे निष्ठावंत सहकारी सुनील नेरकर यांनी राज ठाकरे यांची घेतलेली सदिच्छा भेट ही नवीन समीकरणांना उदय देणारी ठरु शकते. गोटे यांनी महाजन यांच्या भूमिकेला छेद देण्याचे जाहीर वक्तव्य करुन रणशिंग फुंकले आहे. गोटे यांची भूमिका पसंत नसणारी मनोज मोरे यांच्यासारखी मंडळी एकत्र येऊन काही पर्याय उभा करु शकतात काय, हे बघणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
मन की बात की मनसे?
नाशिक, पुण्यात मनसेचा चमत्कार दिसून आला होता. जळगावातही दखलपात्र उमेदवार निवडून आले. पण त्याला पाच वर्षे उलटली आहेत. मनसेकडे सध्या कोणतीही संस्था नाही. त्यामुळे कोरी पाटी घेऊन राज ठाकरे मतदारांपुढे जात आहे. मराठी अस्मिता, विकासाचा मुद्दा, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार हे मुद्दे घेऊन ठाकरे यांची मनसे ‘धन की बात’ कळलेल्या भाजपाला टक्कर देऊ शकतील काय, हा प्रश्न आहेच. .