शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

हा खेळ प्रतिमांचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 2:17 PM

अलीकडे रा. स्व. संघ, भाजप आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांमुळे सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडली आहे

काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन प्रमुख पक्षांच्या ध्येयधोरणांमध्ये त्यांचा धार्मिक कल वगळता काहीही फरक नाही, अशा आशयाचे मत अनेक विचारवंतांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. भाजप उघडपणे हिंदुत्ववादी पक्ष आहे, तर काँग्रेस सर्वधर्मसमभावाचे नाव घेत मुस्लिमांचे लांगूलचालन करते, असा आक्षेप त्या पक्षावर घेतला जातो. आम्ही अल्पसंख्यकांच्या विरोधात नाही; मात्र त्यांचे लांगूलचालन करण्यास आमचा विरोध असल्याचे भाजपही सांगतो. थोडक्यात, जाहीररीत्या उभय पक्ष सर्व धर्मांना समान वागणूक देण्याची भूमिकाच मांडतात; मात्र काँग्रेस मुस्लीमधार्जिणा, तर भाजपा हिंदूधार्जिणा पक्ष असल्याचे सर्वसाधारण चित्र जनमानसात निर्माण झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात, काँग्रेसची मुस्लीमधार्जिणा पक्ष, अशी प्रतिमा तयार करण्यात भाजप आणि त्या पक्षाची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा मोठा हात आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अलीकडे रा. स्व. संघ, भाजप आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांमुळे सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडली आहे. लोकसभा निवडणुकीस आता उणापुरा आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सर्वसाधारणत: अशा वेळी राजकीय पक्ष आपली हक्काची मतपेढी सुरक्षित करण्यावर भर देत असतात. काँग्रेस, भाजप आणि रा. स्व. संघ मात्र आपापली प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र, त्यांच्या सर्वोच्च नेत्यांच्या वर्तन आणि वक्तव्यांमुळे उभे राहिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत:ची नर्म हिंदुत्ववादी अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध मठांना भेटी देण्यासंदर्भात भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी स्पर्धा करून राहुल गांधींनी ती प्रतिमा अधिक गडद केली. आता पुन्हा तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकी समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि नुकतीच मानस सरोवर यात्रा करून आलेले राहुल गांधी स्वत:ची शिवभक्त अशी प्रतिमा निर्माण करू बघत आहेत. मुस्लीमधार्जिणा अशी प्रतिमा बनलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अशा प्रकारे जाणीवपूर्वक स्वत:ची हिंदू ओळख ठसविण्याच्या प्रयत्नात असताना, दुसरीकडे आजवर अभिमानाने हिंदुत्ववादी अशी ओळख सांगणाऱ्या रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सर्वसमावेशक भूमिका घेताना दिसत आहेत. केवळ रा. स्व. संघच नव्हे तर संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपचाही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात घेतलेली भूमिका, हा स्वत:ची सर्वसमावेशक प्रतिमा ठसविण्याचा प्रयत्न नव्हे तर दुसरे काय? काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपापल्या प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही उघड वस्तुस्थिती आहे. प्रश्न हा आहे की, निवडणुकीच्या तोंडावर त्यांना तशी गरज का भासत असावी? जुनीच भूमिका कायम ठेवून यश मिळण्याची आशा वाटत नसणे, हे त्याचे स्वाभाविक उत्तर आहे. आपापला राजकीय पाया अधिक व्यापक करण्याच्या आकांक्षेतून हे प्रयत्न केले जात आहेत आणि ते करीत असताना, आपापली हक्काची मतपेढी बव्हंशी कायमच राहील, हेदेखील गृहित धरले जात आहे. भाजपपुरता विचार केल्यास, २०१४ मध्ये रंगविलेले नव्या भारताच्या निर्मितीचे चित्र प्रत्यक्षात साकारण्यात अपयश आले आहे, हे त्या पक्षाच्या धुरिणांनाही ठाऊक आहे. त्यातच रुपयाची घसरण आणि भडकलेले इंधन दर यामुळे वाटचाल दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालल्याची जाणीव भाजप नेतृत्वास झाली आहे. निश्चलनीकरण व जीएसटीमुळे नाराज झालेला व्यापारी-उद्योजक वर्ग, वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेला मध्यमवर्ग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेले सवर्ण, या पार्श्वभूमीवर भाजपला नवे वर्ग जोडण्याची गरज भासू लागली असेलच आणि त्या गरजेचेच प्रतिबिंब प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात उमटलेले दिसते. दुसरीकडे कर्नाटकात भाजपला सत्तेपासून दूर राखण्यात मिळालेले यश, लवकरच विधानसभा निवडणुकी होऊ घातलेल्या तीन राज्यांमधील प्रस्थापितांविरोधी लहर आणि रुपयाची घसरण, इंधन दरवाढ, राफेल विमान खरेदी आदी मुद्यांवरून भाजपची कोंडी करण्याची मिळालेली संधी, यामुळे काँग्रेसला सत्तेची स्वप्नं पडू लागली आहेत; मात्र भाजपच्या निवडणूक यंत्रणेचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली संघटनात्मक बांधणी करण्यात आलेले अपयश, ही काँग्रेसची कमकुवत बाजू आहे. त्यातच तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच बहुजन समाज पक्षाने विरोधी ऐक्याची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना सुरूंग लावला आहे. बहुजन समाज पक्षाचे स्वतंत्रपणे लढणे काँग्रेसला महागात पडू शकते. जर तीन राज्यांमधील निवडणूक निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर जो परिणाम होणार आहे, त्याचे नुकसान पक्षाला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना त्याची पुरेपूर कल्पना आहे. बहुधा त्यामुळेच भाजपवर नाराज झालेल्या हिंदुत्ववादी मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न स्वत:ची शिवभक्त, जनेऊधारी अशी प्रतिमा निर्माण करून त्यांनी चालविला असावा. भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष अशाप्रकारे प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न करताना हक्काच्या मतपेढ्यांना दुखविण्याचा धोका जाणीवपूर्वक पत्करत आहेत. प्रतिमांच्या या खेळात अखेर कुणाची सरशी होते, या प्रश्नाचे उत्तर तर येणारा काळच देईल!

- रवी टाले                                                                                                                                                                                               ravi.tale@lokmat.com

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ