काँग्रेसचा निवडणूक जनसंघर्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:20 AM2018-09-10T00:20:51+5:302018-09-10T00:21:01+5:30
‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे.
- वसंत भोसले
‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. तिचा प्रारंभ कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला झाला. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचा शनिवारी पुण्यात ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर कडाडून टीका करण्यात आली.
आगामी वर्ष हे सार्वत्रिक निवडणुकांचे आहे. प्रथम लोकसभा, त्यानंतर चारच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होईल. त्याच्या तयारीसाठीच ही यात्रा आखण्यात आल्याचे जाहीरपणेच प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून, पुन्हा एकदा सर्व कॉँग्रेसजनांना एकत्र करण्याचे पाऊल ते टाकत आहेत.
वास्तविक, महाराष्ट्राची राजकीय वीण पाहिली तर सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉँग्रेसला जनाधार आहे. तो पूर्वीही होता आणि सन २०१४ ची निवडणूक होईपर्यंत कायम राहिला होता. त्यानंतर मात्र पक्ष संघटनेच्या पातळीवर दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले होते. अनेक नेते निष्क्रिय राहिले होते. अनेकांचे गट-तट हेव्या-दाव्याने भांडत राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी गट-तट बाजूला सारून सर्वांना एकत्र करण्याची मोहीमच या यात्रेनिमित्त सुरू केली आहे, असे चित्र दिसते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेच्या निमित्ताने झालेले कार्यक्रम त्याचे द्योतकच आहे. कोल्हापुरात आवाडे-आवळे गट एकत्र आले. सोलापुरात अशोक चव्हाण यांनी एमआयएमला लक्ष्य केले.
केवळ नेत्यांच्या गटबाजीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुण्यासह अनेक जिल्ह्यांत भाजपा सत्तेवर आला. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निष्क्रियता आली होती. ती घालवण्यासाठी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपविली. यात्रेला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील भाजपाचा कारभार कोणत्याही पातळीवर उजवा नाही, जनतेत असंतोष नसला तरी नाराजी निश्चित आहे. भाजपाला पर्याय देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा आहे, तो सध्या घेताना दिसत आहे.
राज्यपातळीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, माजी मंत्री जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे, नगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आणि सतेज पाटील यासारख्या जोड्या एकत्र काम करू पाहत आहेत, त्या कार्यकर्त्यांना ऊर्मी देणाऱ्या आहेत. रत्नागिरी, रायगड, जळगाव, परभणी आदी काही जिल्ह्यांत काँग्रेसची ताकद नगण्य आहे. या सर्व पातळीवर अशोक चव्हाण यांनी लक्ष घातल्याने, त्यांना खर्गे यांची साथ मिळाल्याने एक प्रभावी विरोधी पक्ष उभा राहू शकतो, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घ्यावी लागणार आहे. ती भूमिका अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेत स्पष्टपणे मांडल्याने दिशा तरी स्पष्ट झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संभ्रम तरी दूर व्हायला ही जनसंघर्ष यात्रा मदतकारक ठरणारी असेल.
(लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक)