श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
राहुल गांधी दक्षिणेकडे सामान्य मतदारांमध्ये वावरत असताना काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी जम्मू येथे शांती संमेलन नावाने मेळावा घ्यावा आणि पक्षनेतृत्त्वाला अप्रत्यक्षरित्या आव्हान द्यावे, पक्षाच्या पडझडीची काळजी श्रीमती सोनिया व राहुल या गांधी मायलेकांपेक्षा आपल्यालाच अधिक आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करावा, यात काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणापेक्षा बरेच काही आहे.
गेल्या वर्षी पक्षनेतृत्त्वाला उद्देशून जाहीर पत्र लिहिणाऱ्या व त्यांची संख्या २३ असल्याने 'जी-२३' नावाने ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसमधी.ल नाराज नेत्यांनी दिल्लीबाहेर जम्मूमध्ये बैठक घेऊन नेमके काय साधले, हा प्रश्नच आहे. एकतर 'शांती संमेलन' नावाच्या या मेळाव्याला पार्श्वभूमी आहे, ती गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेतून निवृत्ती आणि त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डबडबलेले डोळे व गळ्यात अडकलेला दु:खातिरेकाचा आवंढा या घडामोडींची. पंतप्रधानांनी आझाद यांच्यावर उधळलेली स्तुतीसुमने किमान राजकीय अभ्यासकांनी तरी सहजपणे घेतलेली नसणार. त्यामुळेच की काय, काँग्रेसने किंवा खासकरून श्रीमती सोनिया गांधींनी आझाद यांचा राज्यसभेत पुनरागमनाचा पत्ता कापला असणार. सोबतच आनंद शर्मा यांच्याऐवजी अधिक विश्वासू मल्लिकार्जून खर्गे यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद देऊन पक्ष नेतृत्त्वाने नाराज नेत्यांना द्यायचा तो योग्य संदेश दिला.
या पार्श्वभूमीवर, जी-२३ अशी नवी ओळख मिळालेले नाराज काँग्रेस नेते जम्मूमध्ये एकत्र येतात. शांती संमेलन नावाने पक्षाला बळकटी देण्याच्या नावाखाली मेळावा घेतात. त्याचवेळी राहुल गांधी मात्र देशाच्या दुसऱ्या टोकावर, दक्षिणेकडे केरळमध्ये मच्छिमार व अन्य कष्टकऱ्यांसोबत असतात. पश्चिम बंगालची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बऱ्याच नेत्यांचे, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरींचे लक्ष तिकडे असते. हा पक्ष व त्यांचे नेते कसे दहा दिशांना तोंड करून ऐक्याच्या गप्पा मारतात, यावर प्रकाश टाकणारेच हे सारे आहे.
जम्मूच्या शांती संमेलनात आझाद यांच्यासोबतच कपिल सिब्बल, आनंद शर्मा, भूपिंदर हुडा, राज बब्बर प्रभुतींनी केलेली वक्तव्ये फारशी गंभीरपणे घेण्याची गरज नाही. त्यातून मनोरंजनच अधिक होते. गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेतून निवृत्ती म्हणजे एकूणच जम्मू-काश्मीरचा अपमान असल्याचे चित्र या मेळाव्यात रंगविण्यात आले. त्यामुळे १९५० नंतर प्रथमच या प्रदेशाला राज्यसभेत प्रतिनिधित्व नसेल, असा शोध लावण्यात आला. आझाद इतके मोठे नेते असतील तर काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर का फेकला गेला? नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीच्या स्पर्धेत भाजप का आला, हे मात्र विचारायचे नाही. राज बब्बर यांनी तर नेत्यांच्या गटाला जे उपरोधाने 'जी-२३' म्हटले गेले, त्याचाही वेगळा अर्थ सांगितला. ते म्हणाले, की या नावाचा अर्थ 'गांधी-२३' आहे. अर्थातच हे गांधी म्हणजे सोनिया किंवा राहुल गांधी नव्हेत तर महात्मा गांधी आहेत.
खरेतर या नेत्यांच्या गांधी मायलेकांच्या विरोधात छुपा अजेंडा व वेगळ्या भूमिकेची कुणकुण, किंवा झालेच तर त्याला भारतीय जनता पक्षाची फूस, याची शंका राज्यसभेतील गुलाम नबी आझाद यांच्यावरील स्तुतीसुमनांपासूनच यायला लागली होती. दिल्लीभोवती गेले अडीच-तीन महिने ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी दीडशे-दोनशे जणांचा थंडीत कुडकुडून, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अनेकांनी आत्महत्या केल्या. तेव्हा न द्रवलेले पंतप्रधान मोदींचे हृदय गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीवेळी द्रवावे, हे कसेतरीच वाटते ना! त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी सहजपणे उत्तर व दक्षिण भारतीयांच्या मानसिकतेची तुलना केली तर त्यावर गहजब झाला. भाजपच्या नेत्यांनी तर त्यांच्यावर तुफान हल्ला चढविला. 'एएनआय' या सत्ताधारी पक्षाच्या प्रोपगंडा मशिनरीचा भाग असलेल्या वृत्तसंस्थेने त्यावर ज्या काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यात नेमके कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे 'जी-२३' गटातील सदस्यच असावेत, हा काही योगायोग नाही. 'एएनआय' इतक्या सहजपणे भाजपच्या हिताविरूद्ध जाणाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि सिब्बल, शर्मा यांनी संशय वाढविणाऱ्या संदिग्ध प्रतिक्रिया दिल्या की वृत्तसंस्थेने तेवढ्याच दाखवल्या, हे ते दोघेच जाणोत.
खरेतर शांती संमेलन नावाने ताकाला जाऊन भांडे लपविण्यापेक्षा व जे बोलायचे, बंड करायचे ते इतका वळसा घालून करण्यापेक्षा या सगळ्या मोठ्या काँग्रेस नेत्यांनी सरळ सरळ हे करावे, की आता पुढच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होईल तेव्हा सरळसरळ गुलाम नबी आझाद यांचा उमेदवारी अर्ज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल करावा. जेणेकरून हे स्पष्ट होईल की ज्या पक्षाच्या उर्जितावस्थेसाठी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व पक्षाला पुन्हा सत्तेपर्यंत पोचविण्यासाठी हे नेते इतके खस्ता खात आहेत, त्या पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना हे नेते खरेच किती हवे आहेत. कोणी सांगावे, कदाचित हीच आझाद, सिब्बल, शर्मा प्रभुतींची योजना असेल. राज्यसभा सदस्यत्व सहजपणे मिळेना तर पक्षाचे अध्यक्षपद कसे मिळेल, याची त्यांना कल्पनाही असेल. ...आणि तसे झाले तर आपोआप गुलाम नबी आझाद यांना राजकीय हौतात्म्य प्राप्त होईल. तसे झाले की भारतीय जनता पक्ष पुन्हा गळे काढायला मोकळा. भाजपच्या इशाऱ्यावर चालणार्या माध्यमांच्या नजरेतही आझाद हे प्रचंड क्षमतेचे व तरीदेखील काँग्रेस पक्षाकडून संधी न मिळणारे, अपमानित झालेले राष्ट्रीय नेते होतील. तसे एक उदाहरण पोलादीपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रूपाने भाजपने गेली काही वर्षे वापरले आहेच. गुलाम नबी आझाद त्याच वाटेवर असल्याचे दिसते.