भाजपविरुद्ध मजबुतीने लढा द्यायचा असेल तर काँग्रेसने मोठी जबाबदारी निभावली पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 05:44 AM2023-12-05T05:44:22+5:302023-12-05T05:45:03+5:30
केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून नावापुरते अस्तित्व आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये दोन्ही जनता दलांची आघाडी, तामिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावी आघाडी आदींचा विचार करावा लागणार आहे.
अठरावी सार्वत्रिक निवडणूक तोंडासमोर असताना पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतील घटक पक्षांना कंठ फुटला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करून निवडणुका जिंकू शकतात, हे सत्य असले तरी भाजपचा प्रभाव असलेल्या प्रदेशात काँग्रेसला पर्याय नाही. परिणामी, इंडिया आघाडीमधील घटक पक्ष त्या-त्या प्रदेशात प्रभावी असून पुरेसे नाही. ज्या प्रदेशात भाजपला एकहाती विजय मिळतो तेथे घटक पक्ष काही करू शकत नाहीत. भाजपचा लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर पराभव करायचा असेल तर काँग्रेसने रणनीती सुधारून लढले पाहिजे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांपैकी हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्ये भाजपने जिंकली आहेत.
लोकसभा निवडणुकीत याच राज्यांतून शिवाय महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकातून भाजपला तुफान यश मिळाले होते. विधानसभेच्या चारपैकी तीन राज्यांत तर काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सरळ सामना होता. यापैकी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये गेली पाच वर्षे काँग्रेसची सत्ताही होती. मध्य प्रदेशात मागील निवडणुकीत काँग्रेसलाच बहुमत मिळाले होते. मात्र, अंतर्गत वादाने पक्षात फूट पडली. त्याचा लाभ भाजपने उठवला आणि सरकार स्थापन केले. ते साडेतीन वर्षे चालवले. मात्र, या सरकारच्या कारभाराविषयी फारसे अनुकूल मत नव्हते. तरीसुद्धा काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसच्या या पराभवावरून काँग्रेसी नेते नाराज झाले असणार, यात दुमत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आकाराला येत असलेल्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष संतापले आहेत. तृणमूल काँग्रेसने तर हा भाजपचा विजय नसून काँग्रेसचे अपयश आहे, असाच सूर लावला आहे. त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया जनता दल, संयुक्त जनता दल, डावे पक्ष आदींनी व्यक्त केल्या आहेत.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आदी प्रदेशांत प्रभाव आहे, पण तेवढ्याने इंडिया आघाडी भाजपला देश पातळीवर पराभूत करू शकत नाही. ही आकडेवारी सांगते की, ज्या प्रदेशात काँग्रेसशिवाय इतर पक्षांचा अजिबात प्रभाव नाही, तेथे काँग्रेस पक्षालाच भाजपचा पराभव करावा लागणार आहे, हे कटू सत्य आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष त्या-त्या प्रदेशात लढण्यास समर्थ आहेत. त्यांना काँग्रेसच्या मदतीची फारशी गरजही भासणार नाही. किंबहुना काँग्रेस पक्ष घटक पक्षांचा प्रभाव असलेल्या प्रदेशात नगण्य आहे. केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून नावापुरते अस्तित्व आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये दोन्ही जनता दलांची आघाडी, तामिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावी आघाडी आदींचा विचार करावा लागणार आहे. शिवाय आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम या प्रमुख पक्षांनी कोणाच्या बाजूने जायचा निर्णय घेतलेला नाही. तेथेही काँग्रेसलाच लढा द्यावा लागणार आहे.
काँग्रेस भाजपचा पराभव करायला आघाडीत घेत नाही आणि काँग्रेसशिवाय देशपातळीवर आघाडीदेखील होत नाही. तेलंगणासह चार राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला, तरी काँग्रेसला एकूण मतदान भाजपपेक्षा अधिक आहे. भाजपने तीन राज्यांत बहुमत प्राप्त केले असले, तरी त्या निवडणुका एकतर्फी झालेल्या नाहीत. शिवाय काँग्रेसने तेलंगणामध्ये आश्चर्यकारकरीत्या सत्ता मिळवली आहे. भाजपने ४ कोटी ८१ लाख २९ हजार ३२५ एकूण मते या चार राज्यांत मिळवली असली, तरी काँग्रेसने त्यापेक्षा ९ लाख ४० हजार १३७ मते अधिकची मिळवली आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपला दोनच टक्के अधिक मतदान मिळाले आहे. छत्तीसगडमध्ये चार टक्के, तर मध्य प्रदेशात आठ टक्के जास्त मते भाजपला मिळाली आहेत. परिणामी, ९५ अधिक जागा मिळवून भाजपने तडाखा दिला आहे. असे असले तरी इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आघाडी करताना किंवा जागा वाटप करताना काँग्रेसला वाकुल्या दाखविण्यास जागा निर्माण झाली आहे. अखेर आपली लोकशाही व्यवस्था प्रातिनिधिक स्वरूपाची असल्याने मते जास्त असली तरी प्रतिनिधींचे बहुमत असावे लागते.
तेलंगणामध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य असल्याने ही आकडेवारी कमी-अधिक दिसते. इंडिया आघाडीला देश पातळीवर भाजपविरुद्ध मजबुतीने लढा द्यायचा असेल तर काँग्रेसने मोठी जबाबदारी निभावली पाहिजे. काँग्रेसने अधिक आक्रमक व नियोजनपूर्ण नेतृत्व करायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही.