शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Congress: आदळआपट करू नका, सत्याला सामोरे जा !

By विजय दर्डा | Updated: August 29, 2022 05:59 IST

Congress Politics: विनाशाच्या कडेलोटापर्यंत गेलेल्या काँग्रेस पक्षाला वाचवायचे असेल, तर गुलाम नबी आझाद यांच्या आरोपांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे!

-  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

गुलाम नबी आझाद यांच्या पत्रावरून काँग्रेस पक्षात सध्या आदळआपट सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना आपल्या कह्यात घेणारे लोक आझाद यांनाच दूषणे देत आहेत. त्यातले कोणी म्हणते आहे, राज्यसभेची जागा न मिळाल्यामुळे आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला. दिल्लीतले घर त्यांना वाचवायचे आहे, असेही काहींचे म्हणणे! म्हटले तर वरकरणी या गोष्टी खऱ्या वाटूही शकतील. पण तेवढेच सत्य आहे का, आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या दुर्गतीबद्दल खुलेपणाने जे काही म्हटले आहे ते चुकीचे आहे का?

एक पत्रकार म्हणून मी नेहमीच असे मानत आलो आहे  की, लोकशाहीच्या भल्यासाठी सशक्त विरोधी पक्षाची नितांत गरज असते. असतेच! ही भूमिका बजावण्याची ताकद सध्या केवळ काँग्रेस पक्षात आहे. अशावेळी जर नाकासमोर सूत धरलेली काँग्रेस अतिदक्षता विभागात असेल तर त्यामुळे पक्ष कार्यकर्ता चिंतेत असणारच. कार्यकर्तेच कशाला,  लोकशाहीवर विश्वास असणारा प्रत्येक जण सध्या चिंतेत आहे. नेहरू, गांधी कुटुंबाविषयी काँग्रेसजनांचा विश्वास, त्यांच्याबद्दल वाटणारा आदर याविषयी शंका घेण्याचे काही कारण नाही; पण जेव्हा कुटुंब संकटात असेल, अशा परिस्थितीत नेतृत्व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यात अपयशी होत असेल, तर कुटुंबातल्या लोकांना याविषयी बोलावे तर लागेल! बरोबर दोन वर्षांपूर्वी गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी याच विषयावरून आत्मपरीक्षणाचा मुद्दा काढला तेव्हा त्यांना बंडखोर ठरवले गेले. त्यांच्यावर चोहीकडून हल्ले सुरू झाले. पक्षश्रेष्ठींच्या अवतीभवती असणाऱ्या चौकडीने असे भासवायला सुरुवात केली की ‘जी २३’ गटातले हे नेते काँग्रेस पक्षाचे शत्रूच आहेत!

- शेवटी काय झाले? मोठा जनाधार असलेले काँग्रेस पक्षाचे नेते एकेक करून  पक्ष सोडून गेले. राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद, आर. पी. एन. सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला. कपिल सिब्बल आणि अश्विनी कुमार, तर गेलेच; पण हरियाणातील वीरेंद्र सिंह, राव इंद्रजित सिंह, आसाम काँग्रेसमधले मोठे नेते हेमंत बिस्वा सरमा भाजपवासी झाले. अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खंडू आधी काँग्रेसमध्ये होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री नारायण राणेही भाजपत सामील झाले. जे पक्ष सोडून गेले त्यांचे वर्णन ‘सत्ता लोभी’ म्हणून केले गेले; परंतु हे प्रकरण पक्षसंघटनेत काहीतरी नक्कीच बिनसले आहे; याचेच तर निदर्शक होते.

गुलाम नबी आझाद यांच्याबद्दलच बोलायचे तर मी त्यांना खूप वर्षांपासून व्यक्तिगतरीत्या ओळखतो. आझाद यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला; परंतु जम्मू-काश्मीरमधून ते शक्य नव्हते, तेव्हा इंदिराजींनी माझे बाबूजी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा यांना फोन केला. विदर्भातून एखाद्या जागेवरून आझाद यांना संसदेत पाठवण्याची व्यवस्था करता येईल काय, असे त्यांनी विचारले. अखेर विचारांती गुलाम नबी आझाद यांना तत्कालिन वाशिम लोकसभेची जागा देण्यात आली आणि तिथून निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. केवळ इंदिराजींनाच गुलाम नबी हवे होते असे नव्हे; तर राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्याही ते जवळचे होते. गुलाम नबींच्या विवाहाच्या वेळी संजय गांधी विमान चालवत वरात घेऊन काश्मीरला गेले होते. आझाद आजारी होते तेव्हा राजीव गांधी त्यांना एकदा नव्हे तीनदा भेटायला गेले होते.

- आझाद यांनी हा सन्मान आणि विश्वास आपल्या कामाने मिळवला होता. तालुका पातळीवरून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे आझाद युवक काँग्रेसमध्ये उच्च पदावर पोहोचले. वेगवेगळ्या खात्यांची मंत्रिपदे, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रिपद भूषवून त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची ओळख करून दिली. ते सभागृहात विरोधी पक्षनेता असताना मी संसदेत होतो. अत्यंत शालीन आणि जाणकार असलेल्या आझाद यांचे वैशिष्ट्य हे की आपल्या बोलण्याने त्यांनी कधीही कोणाला दुखावले नाही. याच कारणाने विरोधी पक्षांशी त्यांचे संबंध सदैव सौहार्दाचे राहिले. गुलाम नबी यांना संसदेतून निरोप देण्यात आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.

‘अंतर्गत निवडणुकांच्या नावाने नेतृत्व धोका देत आहे, सोनिया गांधी आता केवळ नावाला नेत्या राहिल्या आहेत, राहुल गांधी यांचे स्वीय सचिव आणि रक्षक निर्णय घेत आहेत, राहुल यांनी सगळी व्यवस्था जमीनदोस्त करून टाकली आहे,’ असे काँग्रेसमधला एक समर्पित आणि गांधी परिवारावर निष्ठा ठेवणारा नेता म्हणत असेल तर या गोष्टी निराधार आहेत, असे कसे म्हणणार? काँग्रेसला जवळून ओळखणाऱ्या आणि जाणणाऱ्या लोकांना हे ठाऊक आहे की अहमद पटेल आणि आझाद हे दोघेही सोनिया यांच्या अत्यंत जवळचे होते. पण त्यांना बाजूला केले गेले. 

राहुल गांधी यांना भेटणे हल्ली कुठे सोपे राहिले आहे? लोक सांगतात की राहुल गांधी यांच्या अंतस्थ वर्तुळात एक पूर्व बँकर अलंकार सवाई आहेत जे प्रत्येक दौऱ्यात सामील असतात. एसपीजीचे एक पूर्व अधिकारी के. व्ही. बायजू राजकीय नेमणुकांचे निर्णय घेतात, के. के. विद्यार्थी नावाचे एक सज्जन आलेल्या ई-मेल्सना उत्तर देतात आणि इतर काही कामे करतात... यातल्या किती जणांना काँग्रेसजन ओळखतात? काँग्रेस पक्षासाठी ही स्थिती धोकादायक नाही का?  

अलीकडे एक दिवस मला विचारण्यात आले की ‘लोकमत’मध्ये भाजपच्या इतक्या बातम्या कशा येतात? मी म्हणालो, व्यक्तिगत पातळीवर मी एका विचारांचा असलो तरी ‘लोकमत’ हे लोकांचे वृत्तपत्र आहे; काँग्रेसचे मुखपत्र नाही! माझ्या वडिलांनी हेच सांगितले आणि शिकवले होते की वृत्तपत्राची बांधिलकी वाचकांप्रति असते. पक्षाच्या नेत्यांनीही पक्षाशी निष्ठा दाखवली पाहिजे. पण आता नेमके याच्या उलटे होत चालले आहे. अशोक गहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल, पृथ्वीराज चव्हाण असे काही नेते सोडले तर किती नेते असे आहेत की जे पक्षाला मजबूत करण्याचे काम करताना दिसतात? आणि मुख्य म्हणजे, अशा नेत्यांना पक्षात मानसन्मान मिळतो का? की त्यांच्या रस्त्यावर काटे पसरले जातात? त्यांच्या वाटेवर काटेच असणार असतील, तर तसे का होते आहे? 

राजकीय पक्ष ही काही साधुसंतांची संघटना नसते. नेते वेगवेगळ्या पद्धतीने पक्ष बळकट करत राहतात. सत्तेवर असताना काँग्रेसने स्वतःला बळकट केले नाही किंवा आजही तसे होत नसेल,  तर त्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा संघाला दोषी ठरवता येणार नाही. ते अखंड परिश्रमाने त्यांचा पक्ष बळकट करत आहेत आणि इकडे काँग्रेस स्वतःलाच नष्ट करण्याच्या उद्योगात आहे. 

या सगळ्या परिस्थितीत काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता सर्वाधिक बेचैन आहे. आपल्या पक्षात नेमके काय आणि का चालले आहे, हेच त्याला कळेनासे झालेले आहे. शिवाय, त्याचे म्हणणे कोणी ऐकत नाही ते दु:ख वेगळेच! काही लोकांनी पक्ष कडेलोटाला आणून ठेवला, असेच तो हल्ली ऐकत असतो.- कधी नव्हती, एवढी आज काँग्रेसला सत्य ऐकण्याची गरज आहे. सत्याकडे कानाडोळा होता कामा नये. काँग्रेसच्या मूलाधाराला पक्षाचेच काही नेते कमजोर करत आहेत, हे कडू असले, तरी तेच वास्तव आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादSonia Gandhiसोनिया गांधी