प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार -
भारतीय राजकारणातील सर्वांत बुजुर्ग पक्ष असलेल्या काँग्रेसच्या विजयापेक्षा तिचा पराभवच जास्त गाजतो. परवा हरयाणात, सगळ्या सर्वेक्षणांनी विजयाचा डंका पिटलेला असूनही, काँग्रेस हरली. काँग्रेसच्या दणदणीत विजयाचे भाकीत करणारे एक्झिट पोल पंडित आणि त्यांचे उलगडापटू कानकोंडे झाले. आजवर डोक्यावर घेतले गेलेले आपले अल्गोरिदमस् अर्थशून्य होऊन असे धाडकन कोसळले हे काही त्यांच्या पचनी पडेना. मग नेहमीप्रमाणे राष्ट्रीय नव्हे तर स्थानिक नेतेच पराभवाला प्रामुख्याने जबाबदार ठरवले गेले. पक्षाच्या मानहानीकारक पराभवासाठी गटबाजी, चुकीच्या उमेदवारांची निवड, मतदान यंत्रातील दोष, सामूहिक नेतृत्वाचा अभाव आणि जातींचे ध्रुवीकरण अशी नेहमीची कारणे पुढे करण्यात आली.
हुकमी विजयाने अशी हुलकावणी दिली याचे खापर एका गटाने भूतपूर्व मुख्यमंत्री हुडा यांच्यावर फोडले. इतर काहींनी शैलजा कुमारी आणि त्यांच्या गटाने आतून सुरुंग लावला असे म्हणत सारा दोष त्यांच्यावर ढकलला. काँग्रेसविरुद्ध भाजप नव्हे तर काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असाच मुख्य लढा होता. जाती-जमातीच्या मुखियांना सारी दारे खुली होती. केंद्रीय नेतृत्वाने त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आपल्या अधिकारांचा पुरेसा वापर केला नाही. आकसखोर विश्वासघातक्यांना लगाम न घातल्यामुळे किमान डझनभर जागी पक्षाचा पराभव झाला. गांधी कुटुंबीय आपल्या सत्तालोभी बंडखोरांना लगाम घालू शकले नाहीत म्हणूनच काँग्रेसने हरयाणा हातचा गमावला. राहुल गांधींसोबत फोटो काढून घ्यायला गर्दी; पण राहुल गांधी नसताना सामूहिक नेतृत्वाचा एकही फोटो नाही. पक्षाच्या महत्त्वाच्या सरचिटणीस असूनही प्रियांका गांधी प्रचारात क्वचितच दिसल्या.
भाजपचे नियंत्रण पूर्णतः मोदी आणि शहांच्या संघटनाबद्ध चमूच्या हाती आहे. याउलट काँग्रेसकडे अशी क्रमवार संरचना असलेली यंत्रणा नाही. राज्य आणि देशपातळीवरील पक्षपदाधिकाऱ्यांच्या, तसेच सत्ता असेल तेथे मुख्यमंत्री वा अन्य मंत्र्यांच्याही नेमणुका गांधी परिवाराच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली होतात. या अतिकेंद्रित निर्णयप्रक्रियेमुळेच सार्वत्रिक आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे. मात्र, काँग्रेस काहीशी खंगली असली तरी तिचे अस्तित्व संपलेले नाही.
काँग्रेसची मुळे ग्रामीण भागात घट्ट रुजलेली आहेत आणि गांधी घराण्याशी ती तितकीच घट्ट जोडलेली आहेत. या दोन्हीमुळेच काँग्रेस टिकून आहे. पक्षाच्या सामर्थ्यातील हा अंगभूत विरोधाभास होय. गांधी कुटुंबनिष्ठ लोकच गांधींच्या नावाने संघटना चालवतात. सोनिया हा सर्वांना एकत्र आणणारा दुवा आहे. राहुल गांधी हा धाडसी योद्धा आणि ठाम प्रवक्ता आहेत. प्रथम उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष म्हणून राहुल यांना पक्ष चालवण्यात अपयश आले, त्यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या शेलारमामांची निवड सोनियांनी केली. ते पक्षाचा दलित चेहरा असल्याने पक्षाला नवी झळाळी लाभली. काँग्रेस नेत्यांना हाताळण्याचे कौशल्य त्यांच्यापाशी होते.
राहुल यांच्याशी सहसंवाद कठीण वाटणाऱ्या अनुभवी विरोधी नेत्यांशी ते संबंध प्रस्थापित करू शकत होते. म्हणूनच त्यांची पदोन्नती करण्यात आली. मात्र, राहुल गांधींच्या दोन यात्रांनी ही परिस्थिती पालटून टाकली. सत्तारूढ पक्षाला अडचणीत टाकणारे प्रश्न ते सातत्याने विचारत आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यावेळी ९९ जागा जिंकल्या; परंतु पक्षाचे भविष्य म्हणून स्वत:ची प्रतिमा पद्धतशीरपणे निर्माण करण्याऐवजी राहुलनी निष्ठावंतांची फौज तयार करण्यावर अधिक भर दिल्यामुळे गेल्या दशकात काँग्रेसला अनेक राज्ये गमवावी लागली आहेत. त्यांची अनुपलब्धता आणि आत्ममग्न अभिजनता यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले, हे खरे आहे.
केवळ सोनिया गांधीच पक्षाला एकसंध ठेवून तो सुसंवादी पद्धतीने चालवू शकतील, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना ठामपणे वाटते. अंतर्गत गटबाजीने त्रस्त असलेल्या स्वत:च्या पक्षालाच नव्हे तर बहुतेक साऱ्या विरोधी पक्षांनाही एकत्रित करण्याचे काम सोनिया गांधीच करत आलेल्या आहेत. तब्बल १५ वर्षे त्या काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या. त्यांच्याच कारकिर्दीत पक्षाने सलग दोन वेळा केंद्रातील सत्ता मिळवली. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. शरद पवारांनी सोनियांच्याच परकीय असण्याच्या मुद्द्यांवर काँग्रेस सोडली होती. सोनियांनी त्यांनाही यूपीएमध्ये सामावून घेतले. राहुल यांच्याहाती सूत्रे दिल्यापासून गेल्या काही वर्षांत ही ऐक्यकारी भूमिका निभावणे त्यांनी सोडून दिले होते; परंतु हरयाणातील अनपेक्षित पराभवाने सोनियांना आता पुनश्च केंद्रस्थानी आणले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना गांधी सोडून अन्य कुणी आपला तारणहार वाटत नाही. सोनियांनीच पुन्हा सर्वांना एकवटण्याची भूमिका स्वीकारावी, असे सार्वमत आहे.
कर्नाटकातील सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील तणातणीत सोनियांनीच हस्तक्षेप केला. आंध्र व हिमाचलमधील परस्परविरोधी गटातही समझौता घडवून आणला. मे महिन्यात भाजपला निर्विवाद बहुमत मिळवू न देणाऱ्या इंडिया आघाडीच्या घडणीमागेही त्याच होत्या. हरयाणातील मानहानीमुळे काँग्रेसची सौदेबाजीक्षमता काहीशी क्षीण झालेली असताना आता केवळ सोनियाच पक्षाला पुन्हा झळाळी आणू शकतील. १३९ वर्षे लोटली... आज या महान पक्षाच्या कीर्तीवर राहुल यांचा हक्क जरूर आहे; पण ती कीर्ती सोनियांनीच राखायला हवी.