- किरण अग्रवाल
काँग्रेसतर्फे अकोल्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊन गेल्याने पक्षासाठी आश्वासक ठरू पाहणाऱ्या वातावरणाला त्यातून गालबोट लागून गेले आहे. मतभेद कुठे नसतात, पण ते नको तिथे प्रदर्शित होतात तेव्हा नुकसानीस निमंत्रणच देऊन जाणारेच ठरतात.
काँग्रेस पक्षाच्या राजकीय नुकसानीसाठी विरोधकांची गरज नसतेच मुळी, स्वकीयच त्यासाठी पुरेसे असतात; हे जे काही बोलले जाते ते चुकीचे नसल्याचा प्रत्यय अकोलेकरांनी पुन्हा एकदा आणून दिला आहे. एकीकडे पक्षाचे नेते ''मोहब्बत की दुकान'' लावत असताना, दुसरीकडे स्थानिक नेते मात्र ''नफरत की दुकान'' चालू ठेवू पाहतात तेव्हा सामान्य कार्यकर्ते व पुन्हा या पक्षाकडे आकर्षित होऊ पाहणारे मतदारही संभ्रमित झाल्याखेरीज राहात नाहीत.
मोर्चे काढून किंवा आंदोलने करून काँग्रेसची प्रतिमा उंचावण्याएवढी शक्ती अकोल्यातील पदाधिकाऱ्यांत उरलेली नाही हे खरेच, त्याची कारणे येथल्या गटबाजीत दडलेली आहेत. दुसऱ्याकडे बोट दाखविताना उर्वरित चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात याचा विचारच कुणाकडून केला जात नसल्याने ही दूरवस्था ओढवली आहे, पण त्यातून बोध घेताना कोणी दिसत नाही. चार दोन लोकांना सोबत घेऊन निवेदनबाजी करण्यात धन्यता मानणारी स्थानिक चमू पत्रकार परिषदेप्रसंगी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधिंसमोरही जेव्हा आपल्या अंतर्गत नाराजीचे प्रदर्शन घडविण्यात मागे पुढे पाहत नाही तेव्हा अशांना पक्षापेक्षा आपले स्वतःचे सवतेसुभे सांभाळणेच किती प्रिय वाटते हेच लक्षात यावे.
अकोल्यातील काँग्रेसला नेत्यांची व पक्ष संघटनात्मक मजबुतीची मोठी परंपरा राहिली आहे. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी अठरापगड जातीतील एकगठ्ठा मतदार पक्षाच्या पाठीशी राहात आला आहे. गाय वासरू निशाणी असतानापासून ते आताच्या पंजापर्यंत हा मतदार काँग्रेसचा फिक्स आहे, म्हणूनच तर इतिहासात असगर हुसैन व वसंत साठे यांच्यासारखे नेते या मतदारसंघातुन निवडून गेले आहेत. राज्यात विविध मातब्बर मंत्री अकोल्याने दिले आहेत, पण ही स्थिती आता लयास गेल्यानेच ''कमळ'' फुलले आहे. अर्थात अशातही अलीकडे राजकीय स्थिती झपाट्याने बदलू पहात आहे, पण विरोधकांच्या बेफिकीरीचे प्रदर्शन मांडण्याऐवजी स्थानिक काँग्रेस नेत्यांचीच अरेरावी समोर येत आहे आणि त्यावर विरोधकांनी फोकस करण्यापूर्वी स्वकीयांनाच गावभर दवंडी पिटण्यात आनंद होतो म्हटल्यावर कमजोरीत कमजोरी वाढणे स्वाभाविक आहे.
महत्वाचे म्हणजे, साधे कुणी कुठे उभे राहून फोटो काढायचा यावरून झालेला वाद थेट पिस्तूल काढले गेल्याच्या आरोपापर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा त्यातून स्थानिक नेतृत्वाचे ''निर्नायकी''पणही अधोरेखित होऊन जाते. कुणी कुणाचे ऐकणाराच येथे नाही. सारेच नेते आहेत. पॅराशुट नेत्यांच्या पक्षातील घुसखोरीचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आणला गेला, पण ते कुठे नाही? उलट याबाबत भाजपाला मार्क द्यायला हवेत, की एवढे मित्रपक्ष सोबत घेतल्याने मूळ पक्षाच्या कार्यकर्त्यांची अडचण होऊन बसली आणि संधीही नाकारली जातेय, पण ते निष्ठा व शिस्तीचे किमान जाहीरपणे उल्लंघन करताना दिसत नाहीत. काँग्रेसमध्ये मात्र हाती काही नसतांना हमरीतुमरी होते आहे. रिकाम्या ताटाचाच खणखणाट जास्त असतो तसे हे झाले.
बरे ''पॅराशुट'', म्हणजे बाहेरून येऊन सुगीचे दिवस अनुभवणाऱ्या प्रवृत्तीबद्दल बोलायचे तर हमरीतुमरी करणारेच काय, अगदी जिल्हा नेतृत्वाकडेही त्यासंदर्भाने बघता यावे. ''असे'' नेतृत्व व्यासपीठावर व निष्ठावान, जुने मात्र अंग चोरून समोर सतरंजीवर बसलेले दिसतात. पक्ष मोडकळीस आला आहे तो त्याचमुळे. मोजक्या, मर्यादितांची निवेदनबाजी करतांना साधे पक्षाच्या फ्रंटल शाखा प्रमुखांना सोबत घेण्याची तसदी घेतली जात नाही म्हटल्यावर पक्ष विस्तारणार कसा? नानाभाऊ पटोले किंवा अन्य कोणी वरिष्ठ नेते आले की गौर मांडल्यागत एका रांगेत बसलेले दिसणारे स्थानिक नेते वरिष्ठांची पाठ फिरताच एकमेकांच्या दाराकडेही ढुंकून पाहत नाहीत, ही वास्तविकता आहे.
सारांशात, काँग्रेसला ''अच्छे दिन'' येऊ घातल्याची प्रक्रिया गतिमान होऊ पाहत असताना स्थानिक पातळीवरील स्वकीयांकडूनच परस्परांचे फुगे फोडण्याचे प्रकार थांबत नसल्याने ते पक्षासाठीच नुकसानदायी ठरले तर आश्चर्य वाटू नये. मदन भरगड यांनी असे का केले व डॉ. अभय पाटील यांनी खरेच तसे काही केले का, हा एवढ्यापुरता मुद्दा नाहीच, मुद्दा आहे तो स्थानिक नेत्यांना पक्ष वाढविण्यात सारस्य नसेल तर किमान तो खुंटविण्याचे पातक तरी ते टाळू शकतील का, एवढाच!