‘काँग्रेस हाच पर्याय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:11 AM2018-02-23T03:11:28+5:302018-02-23T03:11:37+5:30
मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरेल हे शरद पवारांचे भाकीत जेवढे खरे तेवढेच ते मरगळलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे.
मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरेल हे शरद पवारांचे भाकीत जेवढे खरे तेवढेच ते मरगळलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. देशातील अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांची सरकारे सत्तारूढ आहेत. मात्र कितीही प्रयत्न केले आणि केवढ्याही दंडबैठका मारल्या तरी मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षाला, मायावतींच्या बसपाला, पटनायकांच्या बिजू (द)ला, नितीशकुमारांच्या जदला किंवा दक्षिणेतील द्रमुक, अण्णाद्रमुक, तेलंगण राष्टÑ समितीला, तेलगू देसमला, शिवसेना व खुद्द पवारांच्या राष्टÑवादी काँग्रेसला कधी अखिल भारतीय होता येणार नाही. ते डाव्यांना जमणारे नाही आणि अकाली दल किंवा नॅशनल कॉन्फरन्स वा मुफ्तींच्या पीडीपीलाही ते त्याच्या नैसर्गिक मर्यादांमुळे जमणार नाही. काँग्रेस पक्ष आज पराभूत अवस्थेत असला तरी त्याचे कार्यकर्ते व चाहते गावोगावी व खेडोपाडी आहेत. त्याचा इतिहास व त्यातील नौरोजी ते नेहरूंपर्यंतच्या नेत्यांची कर्तबगारी कुणाला पुसून टाकता येणारी नाही. शिवाय राहुल गांधींच्या स्वरूपात त्या पक्षाला राष्टÑीय पातळीवर तरुण नेतृत्व लाभले आहे आणि ज्योतिरादित्य शिंदे किंवा सचिन पायलट यांच्यासारख्या तरुणांनी त्यांची राज्यपातळीवरील धुराही चांगलीच सांभाळली आहे. पराभवाची मरगळ जायला काही काळ जाणे भाग असले तरी ती जायला सुरुवातही झाली आहे. मोदींचे सरकार आर्थिक आघाडीवर मोठ्या घोषणा व गर्जना करीत असले तरी त्या जमिनीवर उतरताना दिसत नाहीत आणि देशाची सामाजिक स्थिती उंचावली असली तरी तिने त्यांच्यातील विषमतेची दरीच अधिक रुंदावली आहे. याच काळात देशातील अल्पसंख्य, दलित व अन्य मोठे समाजवर्ग सरकारविरुद्ध संघटित झाले आहेत आणि भाजपाला संघाने दिलेल्या एकारलेल्या धार्मिकतेची जोड त्या पक्षाला टीकेचे लक्ष्यही बनविणारी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता व बंधुतेसारखी मूल्ये धर्माचे नावे सांगत तुडविली जाताना दिसली आहे. या बाबी सामान्य नागरिकांवरही परिणाम करणाºया आहेत. त्याचमुळे पवारांचे भाकीत सत्याच्या व भविष्याच्या जवळ जाणारे आहे. पवारांनी ही मुलाखत मनसेच्या राज ठाकरे यांना दिली. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला २५ हजारांहून अधिक श्रोते व प्रेक्षक हजर होते. ही बाब पवारांचे सत्तेत नसतानाचेही जनमानसातील वजन व मोठेपण अधोरेखित करणारी आहे. गेली ६० वर्षे महाराष्टÑ व देश यात राजकारण करणाºया पवारांचा अनुभव व आकलन राष्टÑव्यापी आहे. त्याच बळावर त्यांनी या मुलाखतीत मोदींना चार खडे बोल सुनावले आहेत. ‘आपण देशाचे पंतप्रधान आहोत, गुजरातचे मुख्यमंत्री नाहीत ही गोष्ट मोदी अजून लक्षात घेत नाहीत’, असे सांगताना कोणत्याही विदेशी पाहुण्याला मिठी मारण्याचे त्यांचे वर्तन व पुढे त्याला फक्तअहमदाबादला नेण्याचे धोरण त्यांच्या या ‘प्रादेशिक’ दृष्टीवर प्रहार करणारे आहे असे ते म्हणाले आहेत. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सहकारी बँकांचे कंबरडे मोडले, सहकारी उद्योगांचे क्षेत्र मोडीत काढले, त्याच्या नोटाबंदीमुळे गरीब माणूस नागवला गेला, त्याच्या जुन्या नोटांचा परतावा त्याला अद्याप सर्वत्र मिळाला नाही. जीएसटीच्या माºयाने व्यापारी वर्ग जेरीला आला आहे आणि आता त्यात नवनव्या आर्थिक घोटाळ्यांची भर पडत आहे असे सांगून पवार म्हणाले, दरवेळी जुन्या मनमोहनसिंग सरकारला व काँग्रेसच्या राजवटीला बोल लावून मोदींना व भाजपाला स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. आपल्या नाकर्तेपणाचे खापर जुन्यांच्या माथ्यावर फोडत राहण्याच्या त्यांच्या उद्योगातील फोलपण आता लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. पवारांच्या या मुलाखतीने व त्यातील स्पष्टोक्तीने त्यांची यापुढची वाटचाल कशी असेल हेही जनतेला दाखविले आहे. काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येणे अवघड नाही व त्यांना संयुक्तपणे भाजपाला पराभूत करणेही जमणारे आहे, हा त्यांचा राज्याला व देशाला सांगावा आहे.