...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:39 AM2019-03-11T05:39:59+5:302019-03-11T05:43:55+5:30
देशात असलेले संशयाचे वातावरण दूर करणे नितांत गरजेचे आहे. जो कोणी आहे व जसा आहे तो इथलाच, याच देशातील आहे, याची जाणीव सदैव ठेवावी लागेल.
- विजय दर्डा
मला अटल बिहारी वाजपेयींचा एक किस्सा आठवतो. पंतप्रधान झाल्यानंतर एक दिवस संसद भवनातील पं. जवाहरलाल नेहरू यांचा फोटो गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे कृत्य कोणी केले, असा त्यांनी लगेच प्रश्न केला. याची जबाबदारी कोणी घेतली नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी गायब झालेला नेहरूंचा फोटो पुन्हा होता त्या जागेवर लागलेला दिसला! नेहरूजी पंतप्रधान असताना ते विरोधी बाकांवर बसलेल्या अटलजींना बोलण्याची पूर्ण संधी देत असत. हल्लीचे राजकारण याच्या नेमके विपरीत झाले आहे. परस्परांविषयीचा आदर व सन्मान तर बिलकूल राहिलेला नाही. हल्ली दुसऱ्याला कमी लेखण्याचीच चढाओढ सुरू असते. ढळढळीत खोटे बोलले जाते. पण जागरूक जनता सर्व जाणते याचा राजकीय नेत्यांना विसर पडतो.
असेच एक धादांत असत्य हल्ली देशाच्या राजकारणाचे अविभाज्य अंग बनू पाहत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशाचा विकासच झाला नाही, असे भाजपाचे बडे नेते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. विकास फक्त भाजपानेच केला, असा त्यांचा दावा आहे. प्रश्न असा पडतो की, सत्तेच्या प्रदीर्घ काळात काँग्रेसने काहीच केले नसेल तर देश आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला कसा? स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश शून्याच्या स्थितीत होता. तेथपासून आताच्या स्थितीपर्यंत देशाला आणणे हे काय सोपे काम होते? पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी औद्योगिक क्रांती व वैज्ञानिक दृष्टिकोन याआधारे देशाच्या विकासाचा भक्कम पाया घातल्याने आपण त्यांचे ऋण मानायला हवे. औद्योगिक कारखाने व पाटबंधारे प्रकल्प हीच विकासाची मंदिरे असल्याची भावना त्यांनी देशात रुजविली. आज भारताची जी औद्योगिक ओळख आहे ती नेहरूजींची देन आहे, हे कोणी नाकारू शकत नाही.
जय जवान, जय किसानची घोषणा करणाºया लाल बहादूर शास्त्रींना आपण कसे विसरू शकू? शास्त्रीजींच्या आवाहनावरून त्या वेळी देशाने एक वेळचे जेवण सोडले होते. ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांचेही आपल्याला स्मरण ठेवावेच लागेल. त्यांनी देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे व नद्यांवर मोठ्या संख्येने पूल बांधण्याचे केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते साकारही केले. हल्ली आपण जी दळणवळणाची आधुनिक साधने सराईतपणे वापरतो त्यातील राजीव गांधींचे योगदान विसरून कसे चालेल? आॅटोमोबाइल उद्योगाचे स्वप्न पाहणाºया संजय गांधींनाही आपण कसे दुर्लक्षित करू शकतो? शेतकऱ्यांना स्वाभिमानाने उभे करणारे चौधरी चरणसिंग व देशाला नाजूक आर्थिक स्थितीतून सावरणारे चंद्रशेखर यांनाही विसरून कसे चालेल? जगभरातील देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध जोडणारे इंद्रकुमार गुजराल व खुली अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारे डॉ. मनमोहन सिंग यांना कमी लेखून कसे चालेल?
मला आठवते की, एक काळ असा होता की, गरिबांच्या घरी दोन्ही वेळेला चूल पेटेल की नाही याची शाश्वती नसायची. त्यांना वर्षाला किमान १०० दिवस कामाची हमी देणारी रोजगार हमी योजना काँग्रेसनेच सुरू केली. इस्पितळे नव्हती, असतील तर तेथे औषधे व डॉक्टर नसायचे. मी लहानपणी आजोळी जायचो. तेथे जाण्यासाठी संपूर्ण एक दिवस प्रवास करायला लागायचा. आज तेच अंतर एक-दीड तासात कापता येते. गावोगाव रस्त्यांचे जाळे विणणारे अटलजी आपण कसे विसरू?
जे लोक काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणतात त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळी देशाची स्थिती काय होती, हे जरा आठवून बघावे. सर्व लोकांना पोटभर जेवण मिळेल, एवढे अन्नधान्य नव्हते. फळफळावळ तर दूर राहो. त्या काळात कोणी फळे घेऊन जाताना दिसला की त्याला ‘घरात कोणी आजारी आहे का?, असे विचारले जायचे. त्या स्थितीपासून देशाला आजच्या स्थितीपर्यंत आणणे हा काही खेळ नव्हता. पण काँग्रेसने ते करून दाखविले. माहिती अधिकार, अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा हक्क असे अनेक कालजयी निर्णय काँग्रेसनेच घेतले. आता आपण संसदेत चाललेले कामकाज थेट पाहू शकतो, हेही काँग्रेसनेच शक्य केले. राष्ट्रवादाबद्दल बोलायचे तर इंदिरा गांधींना विसरून चालणार नाही. संपूर्ण जगाची पर्वा न करता त्यांनी ज्याप्रकारे पाकिस्तानचे दोन तुकडे केले ते मोठे हिमतीचे काम होते. त्या वेळी पाकिस्तानचे सुमारे एक लाख सैनिक शरण आले होते!
असे असूनही काँग्रेसने काहीच केले नाही, असे कसे म्हणता येईल! पण तरीही बिनदिक्कतपणे असे बोलले जाते. आहे की नाही कमाल! आपले नशीब उजळविण्याचा अधिकार प्रत्येकाला नक्कीच आहे. पण इतरांना खाली खेचणे ही तद्दन बेईमानी आहे. मोदी चांगले काम करत असतील तर आपण त्याला चांगले म्हटलेच पाहिजे. मी काँग्रेसी आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उत्तम काम करत आहेत, असे मी नि:संकोचपणे म्हणेन. भले विचारसरणी वेगळी असेल. पण त्याचा अर्र्थ आपण इतरांना कमी लेखावे, असा नाही. आज नेमके तेच होत आहे व त्यामुळे समाज विघटित होत चालला आहे. समाजात शांतता, आपुलकी, सौहार्द नसेल तर घर कसे असेल याचा विचार करा. देशात असलेले संशयाचे वातावरण दूर करणे नितांत गरजेचे आहे. जो कोणी आहे व जसा आहे तो इथलाच, याच देशातील आहे, याची जाणीव सदैव ठेवावी लागेल. राजकारणाची ही मोठी जबाबदारी आहे.
(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)