अखंड निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक; आम्ही आजन्म सोनियाजींचे ऋणी राहू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:26 AM2021-12-09T06:26:46+5:302021-12-09T06:27:10+5:30

आज देश गंभीर आर्थिक समस्यांना तोंड देत आहे, भांडवली शक्तींना देश विकला जात आहे, लोकशाही धोक्यात आहे. या स्थितीत केवळ सोनिया गांधी आणि राहुल  गांधी हे २००४ प्रमाणे भारताला पुन्हा वाचवू शकतात.

Congress President Sonia Gandhi Birthday: A symbol of unwavering loyalty and patriotism | अखंड निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक; आम्ही आजन्म सोनियाजींचे ऋणी राहू

अखंड निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक; आम्ही आजन्म सोनियाजींचे ऋणी राहू

googlenewsNext

डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्री

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना त्यांच्या जन्मदिनी आदरपूर्वक, मन:पूर्वक शुभेच्छा देताना मला देशातील कोट्यवधी काँग्रेसजनांच्यावतीने त्यांचे आभार मानायचे आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित विनंतीला मान देत अतिशय खडतर परिस्थितीतून जात असलेल्या काँग्रेस पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली व पक्षाचे पुनरूज्जीवन केल्याबद्दल आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते आजन्म त्यांचे ऋणी राहू. भविष्यातही आमचे नेतृत्व करीत राहण्याची आणि आम्हाला मार्गदर्शन करीत राहण्याची विनंती मी त्यांना करीत आहे.

सोनियाजींचा वाढदिवस साजरा करताना, मला अजूनही आठवते ती नागपूर येथील संविधान बचाव रॅली! या रॅलीने सोनियाजींच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता व स्वीकारार्हता प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रियाही या रॅलीने गतिमान केली. त्यांच्या बहुआयामी, धाडसी व करारी नेतृत्वानेच काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राजकीय संजीवनी दिली आणि पुढेही मिळेल.

धर्मनिरपेक्ष राजकीय नेतृत्वाच्या देशातील सर्व छटांना देशाच्या सत्तेत प्रतिनिधित्व मिळेल, यासाठी सोनियाजींनी विशेष प्रयत्न केले. भारताप्रति अखंड निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून  सोनियाजी ओळखल्या जातात. २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव करणे जवळपास अशक्य वाटत होते. एनडीए पुन्हा सत्तेत येणारच, अशी खात्री अनेकांना वाटत होती. मात्र “काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ” ही त्यांची घोषणा फील गुड व इंडिया शायनिंगवर भारी पडली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे विविध पक्ष एकत्र येऊन संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) अस्तित्वात आली. विविध पक्षांना, एकमेकांचे विरोधक असलेल्या पक्षांनाही देशाच्या हितासाठी एकत्र आणण्याची क्षमता सोनिया गांधी यांच्यात असल्याचे प्रशस्तीपत्र माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही जाहीररित्या दिले आहे.

कोणत्याही सरकारी पदापेक्षा भारत देश आणि पक्षाचे हित सर्वोच्च आहे, हे त्यांनी आपल्या वैयक्तिक उदाहरणाने दाखवून दिले आहे.  महात्मा गांधी रोजगार हमी (मनरेगा) कार्यक्रम आणि साठ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी योजना यांचे श्रेय प्रामुख्याने सोनिया गांधी यांनाच जाते. आघाडी सरकारच्या समान किमान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणून, त्यांनी माहितीचा अधिकार, ग्रामीण रोजगार हमी योजना, शिक्षणाचा अधिकार आणि अन्न सुरक्षा कायदा, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन आणि वन हक्क कायदा देशात लागू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध पक्षांना एकत्र आणून युपीए सरकार स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीच शिवाय धर्मनिरपेक्षतेचे रक्षण आणि कल्याणकारी धोरणे याला युपीए सरकारचे प्राधान्य राहील, याची काळजी घेतली.

सोनियाजींच्या नेतृत्वाखाली यूपीएने दशकभर ‘आम आदमी’च्या हितासाठी शासन केले. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशातील २७ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले.  त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने दलित, आदिवासी, ओबीसी, उपेक्षित लोक आणि महिलांना सर्व प्रकारच्या संधी दिल्या आहेत. सोनियाजी नेहमीच दलितांच्या बाजूने उभ्या राहिल्या. दलित नेत्यांना काँग्रेस पक्षात वा सत्तेत महत्त्वाची पदे मिळतील याची त्यांनी काळजी घेतली. मीरा कुमार यांना १५ व्या लोकसभेचे अध्यक्ष केले. मनमोहन सिंग सरकारमध्ये सुशीलकुमार शिंदे या दलित समाजातील महत्त्वाच्या नेत्याला ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री करण्यात आले. यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही संधी देण्यात आली होती. यूपीए सरकारच्या काळात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची त्यांनी निवड झाली. अशाप्रकारे सोनिया गांधींमुळे प्रथमच एक मराठी आणि महाराष्ट्रीयन व्यक्ती राष्ट्रपतीपदावर पोहोचली. 

आज देश गंभीर आर्थिक समस्यांना तोंड देत आहे, भांडवली शक्तींना देश विकला जात आहे, लोकशाही धोक्यात आहे.  या स्थितीत केवळ सोनिया गांधी आणि राहुल  गांधी हे २००४ प्रमाणे भारताला पुन्हा वाचवू शकतात. मला आणि सर्व काँग्रेसजनांना विश्वास आहे की, ते पुन्हा एकदा सर्वांना सोबत घेऊन भारताला या संकटातून बाहेर काढतील. सोनियाजी निडर आणि कठोर परिश्रम घेणाऱ्या नेत्या आहेत. सोनियाजींच्या नेतृत्वामुळे धर्मांध आणि फॅसिस्ट शक्ती काँग्रेसला गप्प करू शकणार नाहीत आणि देशातील संविधान व धर्मनिरपेक्षता संपवू शकणार नाहीत. सोनियाजींना निरामय दीर्घायुष्य लाभो, या शुभेच्छांसह...

Web Title: Congress President Sonia Gandhi Birthday: A symbol of unwavering loyalty and patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.