काँग्रेसच ‘पंजाब केसरी’! शेतकरी आंदोलनामुळे 'हात' उंचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:25 PM2021-02-19T17:25:31+5:302021-02-19T17:26:52+5:30

भटिंडा अकाली दलाचा पारंपरिक गडही उद्‌ध्वस्त झाला आहे. याशिवाय अबोहर, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, बाटला, मोहाली या सातही महापालिकांमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे.

Congress is 'Punjab Kesari'! The farmers' agitation raised their hands in punjab | काँग्रेसच ‘पंजाब केसरी’! शेतकरी आंदोलनामुळे 'हात' उंचावला

काँग्रेसच ‘पंजाब केसरी’! शेतकरी आंदोलनामुळे 'हात' उंचावला

Next
ठळक मुद्देभटिंडा अकाली दलाचा पारंपरिक गडही उद्‌ध्वस्त झाला आहे. याशिवाय अबोहर, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, बाटला, मोहाली या सातही महापालिकांमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे.

पंजाब प्रांताला युद्ध असो की कुस्ती, निवडणुका असोत की जनआंदोलन, मनापासून लढण्याची हौस असते आणि ‘पंजाब केसरी’ किताब जिंकण्याची ईर्ष्य‌ाही असते. केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक तीन वादग्रस्त कायद्यांविरुद्ध याच प्रांतातून प्रखर विरोध सुरू झाला. गेली सहा महिने पंजाबचा शेतकरी या कायद्याविरोधात रस्त्यावर येऊन लढतो आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील शहर भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महापालिका आणि  १०९ नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी गेल्या रविवारी मतदान झाले. त्याचा निकाल जाहीर झाला आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षानेच  ‌‘पंजाब केसरी’चा बहुमान पटकाविला आहे, हे स्पष्ट झाले. काँग्रेस विरुद्ध अकाली दल, भाजप आणि आप अशी निवडणूक झाली. एकूण २३० प्रभागांपैकी पंधराशेहून अधिक प्रभागांत काँग्रेसच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. आठपैकी सात महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत काँग्रेसने मिळविले.

मोहाली महापालिकेत पन्नासपैकी ३७ जागा काँग्रेसने आणि उर्वरित तेरा जागा अपक्षांनी जिंकल्या. भाजप, अकाली दल आणि  ‘आप’ला एकाही जागेवर विजय नोंदविता आला नाही. पंजाबमध्ये चार वर्षांपूर्वी भाजप-अकाली दल आघाडीचा पराभव करून काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जाते. पुढील वर्षाच्या प्रारंभी विधानसभेच्या निवडणुका आहेत. तत्पूर्वी, झालेल्या शहरी भागात काँग्रेसने सर्वच विरोधी राजकीय पक्षांना भुईसपाट केले आहे. केंद्र सरकारने गेल्या सप्टेंबर महिन्यात कृषिविषयक तीन कायदे केले. त्यावरून पंजाब आणि शेजारच्या हरयाना तसेच उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यांचे आंदोलन सहा महिन्यांहून अधिक काळ चालू आहे. दरम्यान, भाजपचा अनेक वर्षे मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अकाली दलाचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री सुखविंदरसिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या भटिंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. या भटिंडा महानगरपालिकेत अकाली दलाचा सुपडा साफ झाला. अकाली दलाकडे भटिंडा महापालिकेची सत्ता सलग त्रेपन्न वर्षे होती. पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. सुखविंदरसिंग बादल यांचे ते चुलतबंधू असून, ते भटिंडामधून विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. या चुलतभावांमधील प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून सारा पंजाब पाहत होता.

भटिंडा अकाली दलाचा पारंपरिक गडही उद्‌ध्वस्त झाला आहे. याशिवाय अबोहर, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, बाटला, मोहाली या सातही महापालिकांमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे. मोगा महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नसले तरी सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसच  मोठा पक्ष ठरला आहे. आठ महानगरपालिकांसह १०९ नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी केवळ पाच नगरपालिकांमध्ये अकाली दलाने, तर चौदा पालिकांमध्ये अपक्षांनी बाजी मारली आहे. उर्वरित ९० पालिकांमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अकाली दलाने भाजपची साथ सोडून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असला तरी वाळलेल्या लाकडाबरोबर ओलेही लाकूड जळते म्हणतात, तसे पंजाबमधील सध्याच्या वातावरणात भाजपबरोबरच अकाली दलाचेही झाले आहे. आम आदमी पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण ‘आप’ला शहरी मतदारांनीही साफ नाकारले. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे  केवळ पाच नगरसेवक निवडून आले आहेत. १०९ पैकी एकाही पालिकेत बहुमत मिळालेले नाही. भाजपचा गड मानला जाणाऱ्या पठाणकोटमधील मतदारांनीही भाजपला नाकारले आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये पराभवच पाहिला होता. त्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या लढाऊ भूमीवर विजयी केसरी किताब मिळविणे महत्त्वाचे आहे. त्याचा परिणाम उत्तर भारतातील जनमानसांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंजाबच्या शेजारच्या हरयाना राज्यात तसेच उत्तर प्रदेशातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग वाढत आहे. शहरी मतदार होता. ग्रामीण भागात याहून अधिक असंतोष भाजपविरुद्ध व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय पेट्रोल-डिझेलच्या दराच्या कडाक्याने नाराजी वाढली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. भाजपला अद्दल, तर काँग्रेसला उभारी देणारा हा निकाल आहे.

Web Title: Congress is 'Punjab Kesari'! The farmers' agitation raised their hands in punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.