परदेशात जाऊन भारताची बेइज्जती कोण करते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 08:12 AM2023-03-15T08:12:20+5:302023-03-15T08:14:33+5:30
विदेशात असताना राहुल गांधी पातळी सोडून काही गैर बोलल्याचे दिसत नाही. असे असेल तर भाजपला इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?
योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया, जय किसान आंदोलन
‘दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही’ अशी एक म्हण आहे. राहुल गांधी यांनी इंग्लंड दौऱ्यात केलेल्या वक्तव्यांवर जो वादंग माजला आहे, तो पाहून या म्हणीची आठवण होते.
देशाच्या अंतर्गत विषयांच्या बाबतीत परदेशामध्ये टिप्पणी करताना मर्यादा सांभाळली पाहिजे यात शंका नाही. विरोधी पक्षाचे नेते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी ही मर्यादा अतिशय कसोशीने निभावली होती. अर्थात, कुठल्याच पक्षाचा नेता आज वाजपेयींची उंची गाठू शकत नाही. शिवाय इंटरनेट आणि वैश्विक माध्यमांच्या या जमान्यात घरातली गोष्ट घरातच कशी झाकून राहील? - ती आपोआपच बाहेर फुटते. तरीही किमान तीन मर्यादा पाळल्या जाऊ शकतात. पहिला संकेत.. राजकीय पक्षांनी परस्परांवर टीका करावी, परंतु देशाबाहेर करू नये; दुसरे म्हणजे सरकारच्या कारभारावर टिप्पणी जरूर करावी, पण ज्यातून संपूर्ण देशाची मान खाली जाईल, असा विखार त्यात असता कामा नये. आणि तिसरे असे की, आपल्या देशात काहीही असो; अन्य कुणा देशाने त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करता कामा नये. आपणही अन्यांच्या व्यवहारात हस्तक्षेप करू नये.
पहिल्या निकषानुसार राहुल गांधी पातळी सोडून काही गैर बोलले, असे दिसत नाही. भारतीय संसदेत विरोधी नेत्यांचा माईक बंद केला जातो आहे, सरकारी संस्था विरोधी नेत्यांवर छापे टाकत आहेत, तसेच विरोधकांवर पेगाससच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे हे त्यांनी बोलून दाखवले. आता हे तर सर्व जगजाहीर आहे. म्हणजे गोपनीय अशी कोणतीही गोष्ट राहुल गांधी यांनी उघड केली नाही. भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये लोकशाहीवर याच पद्धतीने हल्ले होत आहेत. जर एखाद्या देशाचा खासदार दुसऱ्या देशाच्या खासदारांशी संवाद करील तर तो या गोष्टीवर बोलणार नाही तर कशावर बोलेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ साली बर्लिनमध्ये जाहीर सभेत एक भाषण केले होते. राजीव गांधी यांच्यावर वार करताना मोदी म्हणाले होते ‘ एका रुपयातले फक्त १५ पैसे शेवटपर्यंत पोहोचायचे, ते दिवस आता राहिलेले नाहीत!’- पुढे त्यांनी अत्यंत अशोभनीय पद्धतीने लोकांना विचारले, ‘आता सांगा, ८५ पैसे खाऊन टाकणारा कोणता ‘पंजा’ होता?’ - परदेशामध्ये वापरलेल्या या सवंग भाषेबद्दल पंतप्रधानांनी ना कधी माफी मागितली, ना त्यावर काही उत्तर दिले.
भारतातील लोकशाही संस्थांचे अध:पतन होत असल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाबाहेर जाऊन चिंता व्यक्त केल्यामुळे देशाची प्रतिमा बिघडते असे भाजपचे प्रतिनिधी म्हणतात. भारतात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या शक्ती राहिल्या नाहीत किंवा लोकशाही व्यवस्था चालवणे भारताच्या आवाक्याबाहेर गेले आहे, असे राहुल गांधी म्हणाले असते तर या आक्षेपात तथ्य होते; परंतु त्यांनी तसे काहीही म्हटले नाही. उलट भारतातीय जनमानसात लोकशाहीबद्दल असलेली आस्था त्यांनी अधोरेखित केली. २०१५ मध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, एक काळ असा होता, जेव्हा लोक म्हणत, ‘माहीत नाही मागच्या जन्मी असे काय पाप केले, ज्यामुळे भारतात जन्माला आलो!’ - आधीच्या सरकारवर हल्ला करताना परदेशात जाऊन ही अशी भाषा वापरणे, हा मर्यादाभंग नव्हे?
तिसरा निकष विदेशी हस्तक्षेपाला आमंत्रण देण्याबद्दलचा आहे. आणीबाणीच्या काळात तत्कालीन जनसंघाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी अमेरिका आणि इतर देशांकडे भारतातील लोकशाही वाचवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. तातडीच्या प्रसंगात अपवाद म्हणून असे केले पाहिजे की नाही हा वादाचा मुद्दा होय, परंतु तूर्तास तर असे काहीही झालेले नाही. इंग्लंडच्या खासदारांनी भारतीय लोकशाहीचे रक्षण करावे, असे राहुल गांधी यांनी कोठेही म्हटलेले नाही. अर्थात, असा आरोप मोदी यांच्यावरही नाही हेही उघड आहे. मात्र अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात २०१९ मध्ये झालेल्या सभेत ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देऊन मोदी यांनी विनाकारण अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रकार केला होता, हे कसे विसरता येऊ शकेल?
वरील तीनही निकषांवर राहुल गांधी दोषी ठरत नसतील तर भाजपला इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? एक तर अडचणींच्या प्रकरणापासून लक्ष दूर नेण्यासाठी हा वाद माजवला जात आहे. किंवा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला आहे. अर्थात, भारताची लोकशाही प्रतिमा केव्हा ढासळते? - भारत सरकारने बीबीसीच्या माहितीपटावर बंदी आणली असून बीबीसीवर छापे घातले आहेत, हे दुनियेला कळते तेव्हा! भारतीय अर्थव्यवस्थेची प्रतिमा केव्हा डागाळते? - शेअर बाजारातील गडबड घोटाळा रोखण्यासाठी भारत सरकार किंवा त्याच्या संस्थांनी काहीही केले नाही, असे हिंडेनबर्ग अहवाल सांगतो तेव्हा! सशक्त देश म्हणून भारताची प्रतिमा केव्हा बिघडते? - चीनने भारताचा २००० चौरस किलोमीटर भूप्रदेश गिळंकृत केला, पण भारत सरकारने चकार शब्द काढला नाही हे सगळी दुनिया उपग्रहाच्या माध्यमातून पाहते, तेव्हा!
राहुल गांधी यांनी देशाच्या इज्जतीवर बट्टा लावला, असा आरोप संसदेत करण्याऐवजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनने केलेल्या कब्जाच्या बाबतीत वेळीच काही वक्तव्य केले असते, तर देशाची इज्जत नक्की वाढली असती!
yyopinion@gmail.com
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"