मोहन जोशी, माजी आमदार
राज्यात वाढत चाललेला जातीयवाद, धर्मांधता, वाढती राजकीय गुन्हेगारी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे होते. ही आपलीच नैतिक, राजकीय, सामाजिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेत काँग्रेस पक्षाने अशा घटना घडलेल्या ठिकाणीच दोन दिवसांची सद्भावना यात्रा काढली. त्याविषयी...
विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व बदलले व गांधीवादी, सर्वोदयी विचाराचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती सुकाणू देण्यात आले. प्रांताध्यक्ष होताच त्यांनी ‘सद्भावना यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला. मागील तीन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील घटनांनी राज्याची देशात नाचक्की होत आहे. जाती-जातीत विष कालवण्याचे काम एका बाजूने केले जात असताना, सर्वांना बरोबर घेऊन ही यात्रा काढण्याचा धाडसी निर्णय हर्षवर्धन यांनी घेतला व तो यशस्वीपणे पार पाडला. बीड जिल्ह्यातील या घटनेचे केंद्रबिंदू असलेल्या मस्साजोग गावातूनच सद्भावना यात्रा काढण्याचा निर्णय झाला. यात्रेत २०० ते ३०० लोक तरी येतील का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. पण, चांगल्या कार्यात महाराष्ट्रातील लोक नक्कीच सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास होता. तो खरा ठरला. मार्च महिन्यातील कडक उन्हात ४ ते ५ हजार लोकांनी या यात्रेत सहभाग घेतला. मार्गावर जागोजागी, गावागावात या सद्भावना पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या यात्रेची गरज होती हे अनेकांनी बोलून दाखवले. एका फळ विक्रेत्या महिलेने हर्षवर्धन सपकाळ यांना या यात्रेबद्दल धन्यवाद दिले. लोकांना वाद नको आहे, भाईचारा हवा आहे, सामाजिक तेढ नको, द्वेष, मत्सर नको आहे, तर सामाजिक सद्भाव हवा आहे, हे स्पष्ट जाणवले.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या पूज्य संतांचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी आदर्शांनी देशाला नेहमीच मार्गदर्शन केले आहे, परंतु अलीकडच्या काळात राज्याची सामाजिक जडणघडण बिघडत चालली आहे. यामागे ज्या शक्ती आहेत, त्या अत्यंत विखारी, विकृत व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. एखाद्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या करून त्याच्यावर लघुशंका करणे, हसणे हा अत्यंत माणुसकीशून्य प्रकार आहे. या हत्येनंतर दोन जातीत तणाव निर्माण झाला. समाजासमाजात मोठी दरी निर्माण झाली. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा पाहता, एकता मजबूत करण्याची आणि महाराष्ट्र धर्माचे पुनरुज्जीवन करण्याची नितांत गरज आहे.
बीड जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातच सद्भावना आणि बंधुता वाढावी, समाजात निर्माण झालेली दरी नष्ट व्हावी, हा या सद्भावना यात्रेचा हेतू होता. तो काही अंशी का होईना सफल झाला. काँग्रेस पक्षाला स्थापनेपासूनच जाती भेदाच्या पलीकडे पाहण्याचा वारसा लाभलेला आहे. समाजातील तळाच्या माणसाचा विचार हा महात्मा गांधीजींचा आदर्श काँग्रेस पक्ष नेहमीच पाळत आला आहे. सामाजिक सद्भावनेचा तोच वारसा आपल्या संविधानातही आलेला आहे. बीडसारख्या घटनांनी त्याला ठेच पोहचते. सद्भावना यात्रेची सुरुवात करण्याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन स्थानिक दुकानदारांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने एक बेकायदेशीर ठराव करून मढीच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही असे म्हटले होते आणि सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थनही केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या दुकानदारांशी चर्चा करून, ‘घाबरू नका, काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे’, असा विश्वास दिला.
कानिफनाथांची समाधी, भगवानगड येथे संत श्री भगवानबाबा आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घातले. सद्भावना यात्रा ही काँग्रेस पक्षाने आयोजित केली असली, तरी ती राजकीय पदयात्रा नाही, तर एक सामाजिक उपक्रम म्हणून हाती घेतली होती. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहता अशा प्रकारच्या सद्भावना यात्रेची नितांत गरज होती. मस्साजोग ते बीड या ५१ किलोमीटरच्या सद्भावना यात्रेने महाराष्ट्रात सामाजिक सद्भावनेचा जागर सुरू केला आहे, आता हा जागर थांबणार नाही.