काँग्रेसचा शोध संपेना; दररोज नव्या नावाची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 07:14 PM2019-03-22T19:14:39+5:302019-03-22T19:14:46+5:30
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँगे्रससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न कायमच आहे. पक्षाकडे असलेल्या पर्यायांमधून कोणाची निवड करावी, याबाबत खुद्द पक्षश्रेष्ठीच संभ्रमात असून, कार्यकर्त्यांकडून मात्र दररोज नव्या नावाची चर्चा केली जात असल्याचे चित्र आहे.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँगे्रससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न कायमच आहे. पक्षाकडे असलेल्या पर्यायांमधून कोणाची निवड करावी, याबाबत खुद्द पक्षश्रेष्ठीच संभ्रमात असून, कार्यकर्त्यांकडून मात्र दररोज नव्या नावाची चर्चा केली जात असल्याचे चित्र आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडे डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, डॉ. अरुण भागवत, डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. पुरुषोत्तम दातकर अशा अनेक नावांचा पर्याय आहे; मात्र डॉ. पाटील व गावंडे यांची नावे सर्वाधिक चर्चेत आली. डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी ठरल्याचे सांगण्यात येत असतानाच त्यांच्या सरकारी आरोग्य सेवेतील काही नियमांचा दाखला देत त्यांची उमेदवारी मागे पडल्याचीही चर्चा सुरू झाली. अर्थात, नेमका कोणता तांत्रिक मुद्दा आड येत आहे, याबाबत काँग्रेसच्या गोटातून कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नसल्याने उमेदवारीचा संभ्रम वाढला आहे, तसेच कासोधा म्हणजेच कापूस सोयाबीन धान परिषदेच्या माध्यमातून समोर आलेले प्रशांत गावंडे यांच्या मित्र परिवारातून त्यांचेच नाव अंतिम झाल्याचे सांगण्यात येत होते. दुसरीकडे अॅड. आंबेडकर हे सोलापुरातून उभे राहणार असल्याने अकोल्यात मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल, अशीही चर्चा रंगू लागली. काँग्रेसकडे असलेल्या पर्यायावर निवडीचे शिक्कामोर्तब होत नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत.
आशिष देशमुखांच्या नावानेही खाल्ली उचल
कासोधा परिषदेच्या निमित्ताने अकोल्यात ऊठबस वाढविलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांचेही नाव शुक्रवारी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चर्चेत होते. देशमुखांनी नागपुरातून उमेदवारी मागितली होती; मात्र तेथे उमेदवारी मिळत नसेल तर त्यांना अकोल्याचा पर्याय दिला जाईल, अशी अटकळ व्यक्त केल्या जात आहे. यासंदर्भात आशिष देशमुख यांना विचारले असता, त्यांनी अकोल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अकोल्यात उमेदवार ठरलेला आहे, त्यामुळे यादीची प्रतीक्षा करा, असे सांगत काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठरवतील तेथून लढण्यास तयार असल्याचे संकेत देत संभ्रम कायम ठेवला.