Congress: आजचा अग्रलेख: काँग्रेस धाडस दाखवेल? काय असेल पुढची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:14 AM2022-04-06T06:14:13+5:302022-04-06T06:14:53+5:30

Congress News: काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी सोमवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना, अनेक नेते आणि कार्यकर्ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने नाराज झाले आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक सूचना समोर आल्या आहेत, त्यांचा स्वीकार करून, एक मजबूत पक्षसंघटन उभे करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.

Congress: Today's Editorial: Will Congress show courage? What will be the next strategy | Congress: आजचा अग्रलेख: काँग्रेस धाडस दाखवेल? काय असेल पुढची रणनीती

Congress: आजचा अग्रलेख: काँग्रेस धाडस दाखवेल? काय असेल पुढची रणनीती

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना एक महत्त्वपूर्ण सत्य सांगून गेले की, राष्ट्रीय राजकारणात भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. विनाकाँग्रेस पर्याय देण्यासाठी तयार होणारी आघाडी पुरेशी असणार नाही. कारण तोच पक्ष (काँग्रेस) राष्ट्रव्यापी आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी सोमवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना, अनेक नेते आणि कार्यकर्ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने नाराज झाले आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक सूचना समोर आल्या आहेत, त्यांचा स्वीकार करून, एक मजबूत पक्षसंघटन उभे करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणाचे आकलन समांतर आहे. काँग्रेसचे संघटन पातळीवर प्रचंड दुर्लक्ष झाले आहे, हेही त्यांनी मान्य केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत हा आढावा घेताना, त्यांनी ‘मनरेगा’ आणि अन्नसुरक्षा कायद्याचा उल्लेख केला. कोरोना संसर्गाच्या काळात या दोन योजनांमुळे कष्टकरी जनतेला आधार मिळाला. भाजपच्या उत्तर प्रदेशातील यशाच्या मागेही अन्नसुरक्षा योजना आणि मनरेगाद्वारे गरीब जनतेला रोजगार देणे या योजना होत्या. उत्तर प्रदेशात गरिबीचे प्रमाण खूप आहे. बेरोजगारी अधिक आहे. मोठ्या संख्येने असणाऱ्या या जनतेला सरकारच्या मदतीचा हात मिळाला. त्याचा खुबीने प्रचार करून, या योजना पुढेही चालू राहतील, असे आश्वासित करावे लागले. याचे उदाहरण देताना काँग्रेस पक्षाने आखलेल्या या दोन्ही योजनांची गरिबांना खूप मदत झाली. मात्र, या योजना प्रत्यक्षात गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचविणाऱ्या राजकीय पक्ष आणि त्यांच्या सरकारला जनता प्रतिसाद देणार हे स्वाभाविक आहे. याचा प्रचार आणि प्रसार करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडतो.

श्रीमती सोनिया गांधी यांनी पक्ष संघटनेची फेररचना करण्याचा मनोदयही या बैठकीत व्यक्त केला. वास्तविक, याला खूप वेळ निघून गेला आहे. पक्षातील एकसंघता किंवा संघटित ताकद उभी करण्यात सत्तास्पर्धेचा मोठा अडसर ठरतो, याच्याकडे लक्ष वेधून त्यावर प्रहार करायला हवा. पंजाबमध्ये पहिली चार वर्षे उत्तम शासन देणाऱ्या काँग्रेसने शेवटच्या वर्षांत गटबाजीचा खेळ करत सत्ता घालविली, पंजाबच्या जनतेला पर्याय हवा हाेता. काँग्रेसला अकाली दल हा पर्याय असायचा, पण त्या पक्षाची भ्रष्टाचाराने इतकी बदनामी झाली आहे की, जनतेने त्यांचा विचारही केला नाही. आम आदमी पक्षाने ही रिक्त जागा आणि भावना भरून काढली. आजही अनेक राज्यांत भाजपला पर्याय काँग्रेसशिवाय दुसरा राजकीय पक्षच नाही. पश्चिम भारतात हीच स्थिती आहे. उत्तर भारतात वाताहात झाली आहे. दक्षिण आणि पूर्व भारतात काँग्रेसला आघाडीचा प्रयोग करावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती असली, तरी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांनी एकता दाखवून देण्याची गरज आहे. आपला जन्म सत्तेवर बसण्यासाठीच आहे, या भावनेतून बाहेर यावे लागेल, शिवाय काँग्रेसमधील तिसऱ्या पिढीकडे आता नेतृत्व द्यावे लागेल. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याची गरज होती. कॅप्टन अमरसिंग आणि नवज्योत सिंधू यातून कॅप्टनचीच निवड करणे आवश्यक होते. महाराष्ट्रातही तरुण रक्ताला वाव देणे आवश्यक आहे. तीच ती तोंडे पाहून जनतेला वीट आला आहे. त्या नेतृत्वाकडे नव्या समाजातील तरुणांना सांगण्याजोगे काही उरलेले नाही. परिणामी, अरविंद केजरीवाल यांची भाषा आश्वासक वाटते.

सोनिया गांधी यांच्या मतानुसार भाजपचे सरकार आणि नेतृत्व ध्रुवीकरणावर चालते. हा धोका काँग्रेसला नव्हे, तर देशालाच आहे. अशा ध्रुवीकरणाची वैचारिक भूमिकेतून मांडणी करणारी राज्यघटना असताना, ती पुढे घेऊन जाण्याचे धाडस काँग्रेसच्या प्रदेशा-प्रदेशातील नेतृत्वाने दाखवायला हवे. गुजरातमध्ये जनतेला पर्याय हवा आहे. तो देण्याचे सामर्थ्य काँग्रेस निर्माण करीत नाही. त्यासाठी संघटन कौशल्य पणाला लावणे आवश्यक आहे. त्याकडे सोनिया गांधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ते आपण करणार आहोत, असे ठामपणे त्या सांगत आहेत. त्यासाठीचे निर्णय तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. भाजपला पर्याय देण्याचा केवळ विषय नाही, प्रभावी विरोधी पक्ष म्हणूनही संसदीय लोकशाहीत महत्त्वाची भूमिका काँग्रेसला निभवावी लागणार आहे. सोनिया गांधी यांची भूमिका आश्वासक वाटते!

Web Title: Congress: Today's Editorial: Will Congress show courage? What will be the next strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.