काँग्रेसला चांगले दिवस येतील, शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट पथ्यावर पडू शकते; पण...

By यदू जोशी | Published: August 11, 2023 01:09 PM2023-08-11T13:09:00+5:302023-08-11T13:09:35+5:30

शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. धर्मनिरपेक्ष मते काँग्रेसकडे एकवटतील; पण नेते ‘विचारा’ने वागतील का?

Congress will have better days, Shiv Sena, the split in NCP may fall by the wayside; But... | काँग्रेसला चांगले दिवस येतील, शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट पथ्यावर पडू शकते; पण...

काँग्रेसला चांगले दिवस येतील, शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट पथ्यावर पडू शकते; पण...

googlenewsNext

-यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद हे दोन्ही विदर्भाकडे राहणार नाहीत आणि दोन्ही पदे ओबीसींकडे राहणार नाहीत, त्यामुळे नाना पटोले यांच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. युवक काँग्रेस (कुणाल राऊत), महिला काँग्रेस (संध्या सव्वालाखे) आणि अल्पसंख्याक मोर्चा (आ. वजाहत मिर्झा) अशी पक्षसंघटनेतील तीन प्रदेशाध्यक्ष पदेदेखील विदर्भाकडेच आहेत. हा तर्क देऊन पटोले यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत लॉबिंग होत आहे. वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे अशी दोन नावे विरोधी पक्षनेते पदासाठी होती. थोपटे यांना हे पद द्या, म्हणून ३० आमदारांनी सह्यादेखील केल्या होत्या; पण जमले नाही. पक्षातील सिनिअर लॉबी जिंकली. 

ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्यासाठी वजन वापरले. वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेतेपद दिले की पटोले यांचे रिटर्न तिकीट काढण्याचा मार्ग मोकळा होईल, हा विचार करून नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांनी विजूभाऊंची बाजू घेतली असणार. याच विचारातून मग बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनीही विजूभाऊंच्या पारड्यात वजन टाकले असेल. तरीही पटोले यांना बदलणे एवढे सोपे नक्कीच नाही. ते राहुल गांधींच्या मर्जीतले आहेत. ‘मी भाजपला हेडऑन घेतो, जोरदार शाब्दिक हल्ले चढवतो,’ असे इम्प्रेशन त्यांनी दिल्लीत जमवले आहे. दुसरीकडे सकाळी सकाळी फक्त बाइट देऊन भाजपला राज्यात संपवता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्याविरोधात दिल्लीत मोर्चेबांधणी करणारे करत आहेत. ‘निवडणुकीपर्यंत मीच अध्यक्ष राहणार,’ असे नानाभाऊ सांगत आहेत; दिल्लीने मात्र काहीही सांगितलेले नाही. 

- विदर्भाला मिळालेली पदे दिसतात; पण विदर्भानेच काँग्रेसला जास्त यश मिळवून दिले मग दोन्ही पदे विदर्भाकडेच राहायला काय हरकत आहे, हा युक्तिवाद पटोलेंच्या मदतीला धावून जाऊ शकतो. तरीही जातीय व प्रादेशिक संतुलनाचा भाग म्हणून त्यांना हटवायचे ठरले तर मराठा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या समीकरणातून प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा दिला जाईल. कोल्हापूरचे आ. सतेज (बंटी) पाटील, धुळ्याचे आ. कुणाल पाटील अशी काही नावे त्यादृष्टीने चर्चेत आहेत.

या आधीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार भाजपमध्ये वा भाजपसोबत गेले. त्यामुळे आता भाजपच्या अंगावर जाईल आणि त्यांचे अंग बनणार नाही, या अपेक्षेने वडेट्टीवार यांना काँग्रेसने संधी दिली आहे. भाजपच्या जबड्यात हात घालून त्यांचे दात मोजणारा नेता, अशी वडेट्टीवार यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिमा आहे, ती त्यांना राज्यात न्यावी लागेल. वैयक्तिक स्वार्थासाठी ते पक्ष कॉम्प्रमाइज करत नाहीत, असे चंद्रपूरमध्ये बरेचदा दिसले; पण आता राज्यात दाखवावे लागेल. 

कोकणात काँग्रेसचा एकही आमदार नाही, उत्तर महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही एक- दोन गड सोडले तर सगळे ढासळले आहेत. पक्षसंघटना अनेक ठिकाणी खिळखिळी आहे. मात्र, शिवसेना आणि मुख्यत्वे राष्ट्रवादीत पडलेली फूट काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. धर्मनिरपेक्ष मते काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात एकवटतील, असे दिसत आहे. शरद पवार हे भाजपविरोधात शड्डू ठोकून असले तरी त्यांचा पक्ष पूर्वीसारखा भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असे या मतदारांना वाटते आणि हे काँग्रेसच्या पथ्यावर पडेल. अर्थात पवार हे काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांच्यासोबतच राहतील, असे आजचे चित्र आहे. फुटीपूर्वीचे आठवा, विदर्भाचेच उदाहरण द्यायचे तर भंडारा- गोंदिया, अमरावती, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा अशा पाच जागा ते मागत होते. आता फुटीनंतरच्या शरद पवार गटाची तेवढी बार्गेनिंग पॉवर राहणार नाही, ही बाबही काँग्रेसला जागावाटपात जादा जागा देऊन जाऊ शकेल. शिवसेनेतील फुटीचा असाच फायदा काँग्रेस घेऊ शकेल. महाविकास आघाडीत काँग्रेस हा एकच अभेद्य पक्ष उरला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आज पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, या मुद्यावर काँग्रेसचे नेते पक्षासाठी आघाडीच्या वाटपामध्ये किती जागा खेचून आणतात हे महत्त्वाचे असेल. 

अभेद्य काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांवर भाजपची नजर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करू, असे भाजपचे नेते खासगीत सांगतात. वडेट्टीवार यांच्यावरही मध्यंतरी जाळे टाकले गेले होते; पण ते फसले नाहीत. फडणवीस आमचे विरोधक आहेत; पण वैयक्तिक मित्र आहेत असे सांगणारे काही काँग्रेस नेते आहेत. ते संशयित आहेत.  

Why Maharashtra Congress is unravelling — family feuds, too many power centres, BJP factor – ThePrint – Select

काँग्रेसचे असे काही आमदारही आहेत जे आपण भाजपच्या तिकिटावर लढणार, असे खासगीत सांगतात. त्यांची यादी पटोलेंकडे असेलच. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर त्यापैकी विरोधात असलेल्या गटांची  भीती आज भाजपला राहिलेली नाही. भाजपला भीती वाटत असेल ती नक्कीच काँग्रेसची. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसला वाढण्याची मोठी संधी मिळताना दिसते; पण प्रत्येक नेत्याचा एक गट असलेल्या या पक्षातील नेते एकत्रितपणे पक्ष वाढवतील का, याबाबतही शंका आहे. मध्यंतरी काँग्रेसच्या आमदारांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणावळ झाली, त्याचे बिल प्रदेश काँग्रेसची एफडी मोडून दिले, अशी माहिती आहे. श्रीमंत नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेसची ही गरिबावस्था आहे. साखर कारखाने, अन्य उद्योगधंदे, शिक्षण संस्थांमधून होणाऱ्या भक्कम कमाईचा तीन टक्के सीएसआर (काँग्रेस सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) फंड नेत्यांनी पक्षासाठी दिला तर ही वेळ येणार नाही!

Web Title: Congress will have better days, Shiv Sena, the split in NCP may fall by the wayside; But...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.