कॉँग्रेस हा मुळातला सत्याग्रही चळवळी करणाऱ्यांचा पक्ष. तो एकेकाळी उन्हातान्हात वावरणाऱ्यांचा व त्याच वर्गाचे प्रतिनिधित्व करणाराही होता. १९३० यावर्षी गांधीजींनी ७८ लोकांना सोबत घेऊन काढलेली दांडी यात्रा अशीच उन्हातान्हातली होती. त्या पक्षाचे नेतेही तेव्हा तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करणारे आणि सामान्य माणसांच्या जवळ असणारे होते. तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जागा मिळेल की नाही हे शोधत खांद्यावर वळकटी घेऊन प्लॅटफॉर्मवर धावताना दिसलेले राजगोपालाचारी आजही वर्धेकरांच्या स्मरणात आहेत आणि पाटण्याच्या रस्त्यावर हातगाडीवर ठेवलेली खादी विकत हिंडणारे राजेंद्रबाबू तिथल्या लोकांच्या आठवणीत आहेत. काँग्रेसचे हे चित्र बदलले ते तिच्या हाती सत्ता आल्यानंतर. प्रथम खादीतली काँग्रेस सफारी सुटात आलेली दिसली. तिची वस्त्रे उंची व शानशौक आणि श्रीमंती असे सारेच नंतर वाढलेले दिसले. राजीव गांधींनी तिला पुन्हा खादीधारी बनविण्याचा प्रयत्न केला. पण तो फार काळ यशस्वी झाला नाही. राहुल गांधी साधे राहतात पण उरलेली काँग्रेस शानशौकीत वावरताना दिसते. २००९ ची लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळ्यात पार पडली. त्यावेळी ११५ फॅ. उष्णतामान असलेल्या नागपुरात सोनिया गांधी आल्या आणि त्यांनी भर उन्हात आपला रोड शो केला. प्रत्येक चौकात हजारोंच्या संख्येने लोकांनी त्यांचे स्वागत केले. त्याही प्रत्येक चौकात उतरल्या आणि लोकांना भेटल्या. तेव्हाचा उन्हाचा तडाखा त्यांनाही जाणवत असलेला दिसला पण त्यांच्या चर्येवरचे हास्य आणि समाधान त्याला मिटविता आले नाही. त्यांच्यासोबतचे काँग्रेसवाले मात्र चौकात उतरताना कुठे दिसले नाहीत. आपापल्या वातानुकूलित गाड्यांची तावदानेही त्यांनी तेव्हा खाली केली नाहीत. परिणामी नेत्या उन्हात आणि अनुयायी मजेत असे तेव्हाचे चित्र लोकांना दिसले. सत्याग्रह, चळवळी, लोकसहभाग आणि त्याचबरोबर उन्हाचा सहवास हा अनुभवच नेत्यांचे जनतेशी असलेले नाते पक्के करतो या वास्तवाचा विसरच मध्यंतरी साऱ्यांना पडल्याचे दिसले. परवा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या १९ आमदारांनी व अन्य नेत्यांनी शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करण्यासाठी जी संघर्ष यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात काढली तीत दीर्घकाळानंतर त्या पक्षाचे ते जुने व लोकाभिमुख स्वरूप पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांत पक्षाच्या पुढाऱ्यांनी व कार्यकर्ते म्हणविणाऱ्यांनी लोकांशी असलेला त्यांचा संपर्क संपविल्यागत झाला होता. जनतेत आस्था होती, तिच्या मनात काँग्रेसच्या इतिहासाविषयी, त्या पक्षाच्या नेत्यांविषयी व विशेषत: टिळक-गांधी आणि नेहरूंविषयी आदर होता व तो अजून आहे. मात्र त्या संबंधांचा काँग्रेसच्या अलीकडच्या लोकांनाही विसरच पडला होता. निवडणूक काळात त्यांची छायाचित्रे एकदा लावली की मग ती बाजूला ठेवायच्याच कामाची तेवढी उरत. त्यांच्या या विस्मरणानेच जनतेला त्यांच्याकडे काही काळ पाठ फिरवाविशी वाटली. ज्यांना आपला इतिहास आठवत नाही त्यांचे वर्तमान जनताही लक्षात घेत नाही. २०१४ ची लोकसभा निवडणूक व नंतरची विधानसभा व आताची जिल्हा परिषद या साऱ्या निवडणुकीत सपाटून आपटी खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या सानथोर माणसांना जनतेचे स्मरण झाले असेल आणि तिच्यासोबत पुन्हा उभे राहावेसे वाटले असेल तर ते स्वाभाविक व स्वागतार्ह मानावे असे आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न विराट आणि उग्र आहेत आणि कधीचे वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या आहेत, बेरोजगारी आहे, महागाई वाढती आहे आणि नोटाबंदीच्या जाचातून जनता अजून बाहेर पडली नाही, शिक्षण संस्थांच्या दुकानदाऱ्या चालू आहेत, त्यातली दुरवस्था कायम आहे, पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, झालेच तर जनतेत एकूणच असंतोष आहे. यासाठी आपण कधीतरी उभे राहावे असे काँग्रेसवाल्यांना आजवर वाटले नाही. मुळात हे जनतेचे खरे प्रश्न आहेत याचीही जाणीव त्यांनी कधी ठेवली नाही. परिणामी मेळघाटात हजारो मुले कुपोषणाने मरत राहिली, नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना शेकडो आदिवासी आणि पोलीस बळी पडत राहिले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची संख्या कित्येक हजारांवर गेली. आता सत्ता गेल्यानंतर आणि आपण काहीतरी हातपाय हलविले पाहिजेत याची जाणीव झाल्यानंतर ती सुस्त माणसे जनतेसोबत आली असतील तर त्याचेही स्वागत केले पाहिजे. लोकशाहीला विरोधाशिवाय कळा नाही आणि स्थैर्यही नाही. काँग्रेसच्या सुस्ताव्याच्या काळात भाजपाचे लोक पार सैरभैर झाले आहेत. खोट्या घोषणा करीत आहेत, देव आणि धर्माचे झेंडे नाचवून माणसांचे प्रश्न नजरेआड करीत आहेत. काँग्रेसचे १९ आमदार आणि त्या पक्षाचे पुढारी व कार्यकर्ते एवढ्या वर्षांनंतर एकत्र रस्त्यावर आले असतील आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा व त्यांचा सातबारा कोरा करा असे म्हणत राज्यभर संघर्ष यात्रा नेत असतील तर ती एक चांगली सुरुवात आहे असे म्हटले पाहिजे. झालेच तर सारे पुढारी, आमदार आणि दोन माजी मुख्यमंत्री मानपान किंवा पहिले वा दुसरे स्थान हे विसरून या यात्रेत आले हे विशेष. आता या गोष्टीचे अनुकरण सर्वत्र व्हावे. पक्षासोबत लोक आहेत, त्यांच्याशी अधिक जुळणे गरजेचे आहे. तो प्रयत्न व्हावा. गेलेल्यांना परत आणावे आणि आहे त्यांची एकजूट भक्कम करावी व पक्षाच्या पुण्याईचा योग्य वापर व्हावा.
कॉँग्रेसवाल्यांना जाग आली
By admin | Published: April 03, 2017 12:07 AM