स्मिता पाटील वळसंगकर, कौटुंबिक समुपदेशक
तो आणि ती... एकाच परिसरात राहणारे. अधूनमधून एकमेकांना भेटणारे ते अलीकडे सारखे एकत्र दिसायला लागले होते. अठरा वर्षांच्या आतलीच होती दोघं. आम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहोत, असं मित्र-मैत्रिणींना सांगायचे. अचानक एके दिवशी मुलीच्या पालकांनी तक्रार केली आणि 'पॉक्सो' अंतर्गत मुलग्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आलं. या सगळ्या उलथापालथीला कारण काय? तर हे दोघे शरीराने जवळ आले आणि ते पालकांना कळलं. मुलग्याचं असं म्हणणं होतं की, आम्ही दोघांनी सहमतीने 'हा अनुभव' घेऊन बघितला, तरीसुद्धा मी एकटाच का दोषी ? मुलाला काही कळेचना. एका गंभीर गुन्ह्याचा ठपका त्याच्यावर मारला गेला.
आयुष्याची काळजी वाटायला लागली. गेली अनेक वर्षे मुलांबरोबर काम करणाऱ्या एका कार्यकत्यनि सांगितलेली ही घटना.अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी पॉक्सो कायदा करण्यात आला. त्या कायद्यातल्या तरतुदींमुळे काही वेळा अल्पवयीन मुलग्यांवर अन्याय होतानाही दिसत आहे. त्यामुळे विधि आयोगाने सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या किमान वयोमर्यादेबाबत केंद्राकडून सूचना मागविल्या आहेत. सध्या ही मर्यादा १८ वर्षे आहे. ती १६ वर्षे करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विधि आयोगाने महिला आणि बालविकास मंत्रालयाकडेही त्यांचे मत मागितले आहे. याबाबतीत मुलांची बाजू आपण पालक म्हणून विचारात घेतली पाहिजे. सध्या मुलांसमोर असणारी आव्हानं खूप वेगळी आणि आत्यंतिक गुंतागुंतीची आहेत, कुमारवयीन मुलांमध्ये होत असणारे शारीरिक-मानसिक बदल, मेंदूतील बदल या सगळ्यामुळे कुमार वय हे अतिशय गोंधळात टाकणारं वय असतं. काहीतरी वाटणं आणि घडणारी कृती याचे परिणाम समजणं कुमारवयातील मुलांना शक्य नसतं. कारण तो मार्ग मेंदूमध्ये तयार होण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नसते.
हे खरंच की बदलत्या कालमानानुसार मुलं लवकर वयात येत आहेत. निसर्ग निसर्गाचं काम करीत आहे आणि समाज म्हणून आपल्या काही धारणा पक्क्या झालेल्या आहेत. अशावेळी मुलांनी काय करायचं? मुलांच्या मनात आणि मुख्य म्हणजे काय करायचं? मुलांच्या मनात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या शरीरात निर्माण होणाऱ्या इच्छा आणि भावनांचं काय? असा विचार आपण सहृदयतेने केला गेला पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर जग आपल्या जवळ आलेलं आहे. मुलाची इच्छा असो वा नसो एका क्लिकवर त्याला अनेक गोष्टींचं एक्स्पोजर मिळत आहे. कुमारवयात निर्माण होणारं लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक असलं तरी त्याचं करायचं काय हे मुलांना नीट कळत नाहीये. करून बघू अशा उत्सुकतेपोटी बऱ्याच वेळा मुलं शारीरिक जवळिकीचे अनुभव घेऊ लागली आहेत.
याबाबतीत पालक म्हणून आपल्याला काळजी वाटणं अगदी साहजिकच आहे. पण, मुलांशी बोलत राहणं, चर्चा करणं हे जास्त योग्य आहे. मुलांसाठी हा काळ सर्वार्थानं प्रचंड गोंधळाचा असतो, त्यांचं त्यांनाच काही कळत नसतं. अशा वेळेस एक समंजस मोठं माणूस म्हणून आपण त्यांच्यासोबत असायला हवं. बाहेर घडणाऱ्या घटना मुलांनी आपल्यापासून लपवून ठेवू नयेत, यासाठी लहानपणापासूनच घरातला संवाद किती चांगला आहे, किती अर्थपूर्ण आहे, तुमच्यातील नातं किती मोकळेपणाचं आहे, हे खूप महत्त्वाचं ठरतं. एकूणच बदलाचा वेग इतका आहे की, अनेक गोष्टी आपल्याला नकोशा असल्या तरी त्या आपण थोपवू शकणार नाही. काळाप्रमाणे पुढे जाणं आणि स्वतःला पालक म्हणून घडवत जाणं हे मात्र आपण नक्कीच करू शकतो.
याबाबतीत घरातील पालक म्हणून आणि सामाजिक पालक म्हणून आपली प्रगल्भ भूमिका खूप महत्त्वाची ठरते. मुलांना अगदी काटेकोर बंधनात ठेवलं तरीसुद्धा आपण २४ तास मुलांवर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे मुलांवर पहारा नको तर आपण त्यांच्या सोबत 'असणं' महत्त्वाचं आहे. मुलांच्या बाबतीत जे जे घडतंय किंवा जे घडू नये असं आपल्याला वाटतं, त्याबाबतीत मुलांशी मोकळेपणाने बोलणं, सतत संवाद साधणं, हे करणं, त्यासाठी वेळ काढणं ही नव्या पालकत्वाची नवी जबाबदारी आहे. आपण घेतो त्या व्यक्तिगत निर्णयांच्या परिणामांची जाणीव मुलांना करून देणं, त्यातल्या धोक्यांची कल्पना देणं, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकवणं, त्यांनी केलेल्या कृतीचे परिणाम काय होऊ शकतात, हे मुलांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी घरामध्ये कुटुंब चर्चा घडायला हव्यात. म्हणजे मूल त्याला जे वाटतंय ते काही प्रमाणात का होईना आपल्याला सांगू शकेल.
यातूनही समजा काही घडलंच तर मुलाच्या सोबत आपण असू, हा विश्वास मुलाला आपण दिला पाहिजे. परिणामांबाबत मुलांना जागरूक करणं एवढं आणि एवढंच आपल्या हातात आहे. आपला पालक म्हणून केलेला आततायीपणा आणि धाकधपटशा मुलाचं अधिक नुकसान करेल हे नक्की समजून घेऊया. परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याची किमान वयोमर्यादा कायद्याच्या स्तरावर कमी करणं हा बदलत्या वातावरणाला सामोरं जाण्याचा उपाय आहे का? यावर मतमतांतरं असणार. ती वयोमर्यादा कमी करण्याकडे कल असेल, तर त्यातून आणखी नवी गुंतागुंत निर्माण होणार हे उघड आहे. या सगळ्या गजबजाटात काही सकारात्मक पर्याय मुलांना देता येतील का, याचा विचार समाज म्हणून आपण एकत्र येऊन केला पाहिजे, हे मात्र नक्की.