तांबेंचा घोळ, काँग्रेसची नाचक्की अन् भाजपची खेळी

By यदू जोशी | Published: January 13, 2023 08:36 AM2023-01-13T08:36:30+5:302023-01-13T10:33:55+5:30

नाशिक पदवीधरमध्ये तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला दगा दिला. देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली. गाफील नेत्यांमुळे काँग्रेस तोंडावर पडली.

Copper mess, Congress dance and BJP play | तांबेंचा घोळ, काँग्रेसची नाचक्की अन् भाजपची खेळी

तांबेंचा घोळ, काँग्रेसची नाचक्की अन् भाजपची खेळी

googlenewsNext

- यदु जोशी

विधान परिषदेच्या पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील निवडणुकीचे निकाल ही शिंदे-फडणवीस सरकारची लिटमस टेस्ट असेल, तसेच महाविकास आघाडी अद्यापही एकत्र असल्याच्या दाव्यातील खरेखोटेपणाही समोर येईल. मुळात या मतदारसंघांतील उमेदवार हे फार आधीपासून ठरवायचे असतात, कारण चार-पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या मतदारसंघांत प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा लागतो, तसेच आपली मतदारनोंदणी अधिकाधिक करण्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे असते. ज्यांच्याकडे केडर मजबूत आहे त्यांची नोंदणी अधिक होते. उमेदवारीच्या घोषणेचे टायमिंग हा येथे कळीचा मुद्दा असतो. 

शिक्षक, पदवीधरांच्या निवडणुका या संघटनांच्या बॅनरखाली लढविण्याचे  प्रमाण पूर्वी अधिक होते; पण संघटनांकडून निवडून गेलेले आमदार विधान परिषदेत वा राजकारणात आपले ऐकत नाहीत, वा त्यांना व्हिप जारी करता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर राजकीय पक्षांनी थेट आपले उमेदवार लढवायला सुरुवात केली. संघटनांसाठी हा शह होता. यानिमित्ताने संघटनांचा संकोच करण्याचा वा संघटना संपविण्याचाही हेतू होता; काही ठिकाणी तो साधला गेला, काही ठिकाणी संघटनांनी आपली ताकद कायम ठेवत राजकीय पक्षांना झुकवले. 

स्वत:चे उमेदवार असोत की पाठिंब्यावरचे, भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, ती विधान परिषदेत आपला सभापती बसविण्यासाठी. त्यादृष्टीने सगळी खेळी खेळली जात आहे. विधानसभा तर हातात नाही, किमान विधान परिषद हातात ठेवण्यासाठी या पाच जागा किती महत्त्वाच्या आहेत याचे गांभीर्य महाविकास आघाडीला कळलेले दिसत नाही. शिक्षक मतदारसंघात लक्ष्मीदर्शन घडविणे हा प्रकार अलीकडच्या काळात काही ठिकाणी सुरू झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत एका मतामागे पाच हजार रुपये आणि एक पैठणी वाटली गेल्याची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी तरी लक्ष्मीकांत प्यारेलालचे संगीत वाजणार नाही, अशी अपेक्षा आहे.

अमरावती पदवीधरमध्ये विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांची उमेदवारी चार महिने आधी जाहीर केली. शिवसेनेतून आलेले धीरज लिंगाडे यांना काँग्रेसने काल उमेदवारी देऊन उशीर केला. १२ वर्षांत पाटलांनी पदवीधरांसाठी काय केले हा संशोधनाचा विषय. अकोल्याच्या राजकारणात भाजपमध्ये त्यांच्याशी कोणाचेही पटत नाही, पण देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त आहे. त्यांना पाडण्यासाठी गेल्या वेळी पक्षातील काही लोकांनी काँग्रेसचे संजय खोडके यांना मदत केली होती. यावेळी तसे दिसत नाही. तरीही कोणी काही काड्या केल्या तर तशांची यादी तयार होण्याची भीती आहेच.  उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढलेले ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊन महाविकास आघाडीचे तर बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार देऊन भाजपचे टेन्शन वाढविले आहे. 
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपने शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना पाठिंबा दिला.

महाविकास आघाडीचा उमेदवार ठरता ठरत नाही. मुंबईत बैठक करून उद्धव सेनेचे गंगाधर नाकाडे यांची उमेदवारी ठरविली गेली. काँग्रेसने वेगळा सूर लावला. राष्ट्रवादीचा म्हणून एकाने उमेदवारी अर्ज भरला. आ. कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. काँग्रेसमधीलच एक गट विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या विरोधात आहे. पदवीधरमध्ये मिळविलेले यश टिकवण्याची रणनीती काँग्रेसने आखलीच नाही. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या नागपुरातील बैठकीला बड्या नेत्यांनी दांडी मारली, पक्षात ताळमेळ नाही. राज्यात पाचपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाही. 

गाणार तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्याबाबत अँटिइन्कमबन्सी फॅक्टर थोडाफार आहेच, पण दोघांकडेही नेटवर्क आहे. औरंगाबादेत आधी काँग्रेसमध्ये असलेले किरण पाटील यांनी भाजपची उमेदवारी मिळविली आहे. याशिवाय शिक्षक संघटनांचे सूर्यकांत विश्वासराव, प्रदीप साळुंके, मनोज पाटील, नितीन कुलकर्णी, डॉ. गणेश शेटकर आदी उमेदवार आहेत. पदवीधरमध्ये असलेली पूर्वतयारी शिक्षक मतदारसंघात नसणे ही भाजपची अडचण आहे. मात्र अर्जमाघारीनंतर बरेच चित्र स्पष्ट होईल. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील पुन्हा लढत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा आहे; उद्धव सेनेने तसे जाहीर केलेले नाही; पण त्यांच्यासोबतच जातील असे दिसते. शिंदे सेनेतून आलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. दोन्ही धनवान आहेत. म्हात्रे गेल्या वेळी क्रमांक दोनवर होते. विरोधकांची मते विभागल्याचा फायदा बाळाराम पाटलांना झाला होता, यावेळी त्यांची कसोटी आहे.

 नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणूनही अर्ज भरल्याने सस्पेन्स वाढला आहे. त्यांना काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्याने काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही. म्हणजे ते उद्या जिंकले तरी काँग्रेसला बांधिल नसतील. भाजपने कोणालाही उमेदवारी दिली नाही. याचा अर्थ भाजप तांबेंवर रुमाल टाकायला मोकळा आहे. काँग्रेसने सत्यजित यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती; पण अचानक सत्यजित आले. हे सगळे घडताना सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरात मुंबईत होते अन् तिकडे नाशकात घोळ सुरू होता. नाशिकमध्ये काँग्रेसची नाचक्की झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीने काँग्रेस तोंडावर पडली. तांबे पिता-पुत्राने काँग्रेसला दगा दिला आणि काँग्रेसचे नेते गाफील राहिले.  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांना उमेदवारी द्यावी, असे भाजपमध्ये चालले होते; पण एकाच घराण्यात मंत्रिपद, खासदारकी अन् आमदारकीही द्यायची का यावरून ते बारगळले. शिक्षक, पदवीधर मतदारसंघ हवेतच कशाला, इथले आमदार या वर्गाचे किती प्रश्न सोडवतात, अशी चर्चादेखील अधूनमधून होत असते. हा आत्मचिंतनाचा विषय!

Web Title: Copper mess, Congress dance and BJP play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.