किरण अग्रवाल
कोरोनाच्या संकटाचा जोर ओसरू लागल्याने जनजीवन व व्यवहार पूर्वपदावर येत आहे हे दिलासादायकच म्हणायला हवे; पण याचा अर्थ संकट टळले आहे असा अजिबात घेता येऊ नये. दुर्दैवाने तसे होत आहे. कोरोना टाळण्यासंबंधीची खबरदारी न घेताच तो संपल्याचा समज करून घेत किंवा तशा आविर्भावात बहुतेकांचा वावर सुरू झाला आहे. घरात, कार्यालयात वा सार्वजनिक ठिकाणी वावरताना याबाबतची कुठलीही काळजी वाहिली जात नसल्याने ही बाब संकटाला थांबवून ठेवण्यासाठी पूरक ठरू पाहते आहे. बेफिकिरी व बेजबाबदार मानसिकता यामागे असून, त्यावर कोणती लस कामात येईल हे सांगता येणे अवघड आहे.कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घसरतो आहे. देशात गेल्या आठ महिन्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने नीचांक नोंदविला असून, कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्या बाधितांची चोवीस तासातील संख्याही गेल्या नऊ महिन्यात प्रथमच शंभराच्या खाली आली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०५ टक्के झाला असून, मृत्युदरातही घट झाली आहे, तो १.४३ टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात सुमारे दीड लाख रुग्ण उपचार घेत असून, एकूण संसर्गित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.५२ टक्के इतके असल्याचे आरोग्य खात्याची आकडेवारी सांगते. कोरोना ओसरत असल्याचे यातून लक्षात यावे. अशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणही सुरू झाले असून, पहिल्या आवर्तनात ३१ जानेवारीपर्यंत देशात ३९ लाख आरोग्यसेवकांना डोस देण्यात आले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडील ही स्थिती खूपच समाधानकारक म्हणता यावी. एकूणच कोरोना ओसरत असतानाच लसीकरणही वेगाने सुरू झाल्याने यासंबंधीची जनमानसातील भीतीची छाया दूर होत आहे.
भीती कमी झाल्याने बेफिकिरी मात्र वाढली असून, बेजबाबदारपणाही दृष्टिपथास पडत आहे हे दुर्दैवी म्हणायला हवे. गेल्या वर्षाच्या अखेरीस रमजान व दिवाळीसारख्या सणांच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडले, त्यामुळे बाजारात चैतन्य आले; टप्प्या-टप्प्याने शासनानेही निर्बंध हटविल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ पहात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेस व रेल्वे सुरू झाल्या असून, शाळा-महाविद्यालयेही सुरू होऊ पाहात आहेत. बाजारपेठा तर पूर्वीसारख्याच गजबजल्या असून, लग्नकार्येही धूमधडाक्यात सुरू झाली आहेत. संकटावर मात करीत व त्यातून बाहेर पडत हे सर्व सुरू झाले आहे; परंतु याचा अर्थ कोरोना संपला आहे असे नाही. म्हणूनच तर संभाव्य धोका टाळण्यासाठी समस्त वारकरी बांधवांच्या श्रद्धा व आस्थेचा सोहळा असलेली पंढरपूरमधील माघी वारी रद्द करण्यात आली आहे, तर त्र्यंबकेश्वर येथे भरणारी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची यात्राही रद्द करण्यात आली आहे. ठिकठिकाणच्या गाव पातळीवरील यात्रा-जत्राही यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. पण असे असताना व्यक्तिगत पातळीवर जी खबरदारी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही हे चिंताजनकच नव्हे तर संकटाला थांबून राहा असे सांगण्यासारखेच आहे.देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका दिल्ली व केरळ सोबतच महाराष्ट्रालाही बसला आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.५८ टक्के झाले आहे ही समाधानाची बाब असली तरी सद्य:स्थितीत देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी तब्बल ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्येच असल्याने यासंबंधीच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही राज्यात विशेष पथके पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ संकट टळलेले नाही; पण उपस्थितीविषयक संख्येची मर्यादा न पाळता मोठमोठे सोहळे आयोजित होत आहेत. अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होताना तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक असतानाही त्याचा व सॅनिटायझरचा वापर अभावानेच होताना दिसतो. रिक्षा, बसेस व रेल्वेमध्ये प्रवास करतानाही मास्कविना प्रवासी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी याबाबत काळजी घेणे गरजेचे बनले आहे, पण यासंबंधात स्थानिक स्वराज्य संस्थांनी दंडाची तरतूद केली असली तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. तेव्हा कोरोनाबाबत स्वयंस्फूर्तपणे काळजी वाहिली जाणार नसेल तर यंत्रणांनी बडगा उगारून त्यासाठी संबंधिताना बाध्य करायला हवे, अन्यथा कोरोना गेला गेला म्हणता परत येण्याची भीती नाकारता येऊ नये.