होय नाही करता करता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा शेवटी एकदाची चालू होते आहे. कोरोना महामारीमुळे वर्षभर ती रखडली. त्यानंतर यजमान जपानच्या देशवासीयांमध्ये ऑलिम्पिक आयोजनाबद्दल साशंकता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आता अवघ्या काही तासांत या स्पर्धेचे उद्घाटन होईल आणि शनिवारपासून प्रत्यक्ष खेळांना सुरुवात होईल. माणसावरची संकटे येत राहतील; पण त्यापुढे दबायचे नाही, थांबायचे नाही, उलट एकत्र येत लढत राहायचे हा संदेश ऑलिम्पिकमधून मिळणार आहे. म्हणून स्पर्धेच्या ‘फास्टर, हायर, स्ट्रॉंगर’ या मूळ घोषवाक्यात यंदा प्रथमच ‘टुगेदर’ हा शब्दही जोडण्यात आला. ‘वेगवान, सर्वोच्च, सर्वशक्तिमान, संघटित’ या चार शब्दांमध्ये केवळ खेळाचेच नव्हे तर कोरोनापश्चात जगरहाटीचेही सूत्र सामावलेले आहे.
दीड वर्षापूर्वी विळखा घातलेल्या कोरोनाच्या संकटातून जगाला वेगाने बाहेर पडायचे आहे. कोरोनाने आक्रसून टाकलेली मानवी महत्त्वाकांक्षेची, प्रगतीची सर्वोच्च उंची पुन्हा गाठायची आहे. एका अर्थाने निसर्गात कमजोर असणाऱ्या मानवजातीला पुन्हा खंबीरपणे सर्वशक्तिनिशी उभे राहायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही लक्ष्यांचा भेद माणूस म्हणून एकत्र येत, संपूर्ण जगाने संघटितपणे करायचा आहे. म्हणून ‘फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, टुगेदर’. खेळातून, स्पर्धांमधून हे साधले जाईल? शंकाच नको. मुळातच माणूस हा जितका समाजप्रिय आहे तितकाच तो वर्चस्ववादीदेखील आहे. क्षेत्र कोणतेही असो माणसाची मूळ प्रवृत्ती जिंकण्याची, सतत पुढे राहण्याची असते. चार्ल्स डार्विनने तर ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हाच सिद्धांत मांडला. कालौघात संस्कृतीच्या कल्पना बदलत आल्या. हिंसा-रक्तपात न घडवता, शारीरिक इजा न पोहोचवता सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी क्रीडा स्पर्धांची कडवी चुरस माणसाने आपलीशी केली. चित्त्यासारखी सर्वात वेगवान धाव कोणाची, माशासारखा जलद पाणी कोण कापतो, आखाड्यातल्या झुंजीत ताकदीच्या बळावर कोण कोणाला नमवतो... असे सगळे सुरू झाले.
नियमांच्या चौकटीत बसवून, खेळीमेळीच्या वातावरणात, उमदेपणाने श्रेष्ठत्व जोखण्याची पद्धत माणसाने ‘खेळ’ या नावाने रूढ केली. याच परंपरेचे जागतिक स्वरूप म्हणजे ऐतिहासिक ऑलिम्पिक स्पर्धा होय. आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक अशा सर्व अंगांनी माणसाला कमजोर करून टाकलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा फार महत्त्वाची ठरणार आहे. जगावर पसरलेल्या उदासीची काळोखी झटकून टाकण्यासाठी ऑलिम्पिकमधल्या हारजितीचा थरार कामी येईल, अशी आशा आहे. पण परिस्थिती अशी बिकट की कोरोनाचे संकट अजूनही घोंगावते आहे. ऑलिम्पिक जिथे खेळली जाणार त्या जपानमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले आहेत. त्यांच्यासोबत कोरोनाचा विषाणू आलेलाच नसेल असे सांगता येत नाही. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोना रुग्ण आढळूनही आले आहेत.
तरीही आजवरच्या इतिहासात सर्वात महागडी ठरलेली ही ऑलिम्पिक स्पर्धा पार पाडण्यासाठी जपानने कंबर कसली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांविना रंगणार असली तरी दूरचित्रवाणीच्या, इंटरनेटच्या माध्यमातून जगभरचे प्रेक्षक स्पर्धेला लाभतील. खरे तर ऑलिम्पिकमधल्या यशाचा इतिहास भारतासाठी फार भरजरी नाही. म्हणून तर अजूनही आपल्याला खाशबा जाधव यांनी पन्नाशीच्या दशकात मिळवलेल्या पहिल्या पदकापासून ते अलीकडच्या अभिनव बिंद्राच्या एकमेव ‘ऑलिम्पिक गोल्ड’पर्यंतच्या मोजक्याच आठवणी जपून ठेवाव्या लागतात. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताची पदक संख्या दुहेरी आकड्यात पोहोचेल, असा विश्वास क्रीडाक्षेत्राला आहे. जगभरातून तब्बल साडेअकरा हजार खेळाडू विविध क्रीडा स्पर्धांमध्ये स्वतःची ताकद दाखवणार आहेत.
सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक गळ्यात मिरवण्याचा आनंद क्षणिक असेल; पण ‘जगात सर्वोत्कृष्ट’ ठरण्याची ऊर्मी त्या खेळाडूला, त्याच्या देशाला दीर्घकाळ अभिमानास्पद वाटत राहील. त्यासाठी झुंजणाऱ्या साडेअकरा हजारांमध्ये १२७ भारतीय आहेत. त्यातही पाहावे तर देशाच्या एकूण लोकसंख्येत प्रत्येकी फक्त सव्वादोन टक्के वाटा असलेल्या हरियाणा, पंजाब या राज्यातले अनुक्रमे ३१ आणि १९ खेळाडू ऑलिम्पिक खेळतील. देशाची नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे सहाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये आहेत. हे चित्र कधी बदलणार कोण जाणे? तूर्त तिरंगा खांद्यावर घेऊन झुंजणाऱ्या प्रत्येक भारतीयासोबत आपणही जपानच्या मैदानात उतरूयात. पदकांचे प्रेम जिंकण्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. सध्याच्या कठीण काळात ऑलिम्पिकपर्यंत ही सगळी मंडळी झेपावली हेही थोडके नाही.