- डॉ. अमोल अन्नदाते(वैद्यकतज्ज्ञ)चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीचे थैमान सुरू असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँडेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणि ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या निमित्ताने पडत आहेत.सध्या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केलेली नाही, पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत-चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने, ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणि आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान आणि सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होईपर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करातही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.नवी साथ दाखल होते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे असते, देशातील पहिल्या काही केसेस ओळखणे आणि त्यांना वेगळे ठेवून त्यांचे उपचार करणे, पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे. साथ अजून दाखल झालेली नाही, पण ती झालीच, तर या पहिल्या केसेसच्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला, तेव्हा २००७ साली ही माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये, हा हेतू असला, तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.
यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर आणि जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे, शिंक आल्यावर किंवा खोकताना तोंड, नाक, झाकणे, सर्दी, खोकला असलेल्यांनी इतरांपासून लांब राहणे आणि प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे, पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली, तरी करायच्याच आहेत. ही साथ चीनमधून इतर देशात पसरत असताना शक्यतो मांसाहारी, त्यातच न शिजविलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे, प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.