फ्रान्समध्ये कोरोना विषाणूची दहशत पसरत असताना तिथल्या काही लोकांनी हे संकट आव्हान म्हणून स्वीकारलं. कमीत कमी मृत्यू होतील असा निर्धार केला. कोरोनामुळे वृद्धांची बळी पडण्याची शक्यता तर सर्वांत जास्त; पण व्हॅलरी मार्टिन या महिलेनं मात्र आपल्या वृद्धाश्रमातले नागरिक कोरोनानं मरणार नाहीत, अशी शपथच घेतली. कोरोनाच्या दहशतीत आपल्या वृद्धाश्रमाची गोष्ट नक्कीच वेगळी असेल असं तिनं मनापासून ठरविलं आणि तसं करूनही दाखविलं.व्हॅलरी मार्टिन फ्रान्समधील लेआॅन शहरामध्ये ‘व्हिलानोव्हा’ नावाचं वृद्धाश्रम चालविते. या वृद्धाश्रमात १०६ वृद्ध नागरिकआहेत. आपल्या वृद्धाश्रमातील प्रत्येकाचा जीव व्हॅलरीला अनमोल वाटत होता. अजून प्रत्येकाला खूप जगायचं आहे, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला कोणीही बळी पडून चालणार नाही असं तिनं मनाशी ठरविलं. ते कृतीत उतरविण्यासाठी तिनं स्वत:ला तिच्या स्टाफसह वृद्धाश्रमातील १०६ वृद्ध नागरिकांसोबत अक्षरश: कोंडून घेतलं.कोरोनापासून आपल्या वृद्धाश्रमातील लोकांचे जीव वाचविण्यासाठी व्हॅलरीला ही कैद आवश्यक वाटत होती. पण, या कोंडून घेण्याचा त्रास वृद्ध नागरिकांना होऊ नये म्हणून तिच्या वृद्धाश्रमातले सारेचे नागरिक ८० वर्षांच्या पुढचे. त्यासाठी तिनं पहिलं काम केलं ते वृद्धाश्रमातलं वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला आपापल्या खोलीत डांबून न ठेवता आवारात मोकळं वावरण्याची मुभा दिली. त्यांची काळजी घेण्यासाठी व्हॅलरीसह तिचे १२ सहकारी या १०६ वृद्ध नागरिकांसमवेत वृद्धाश्रमात कैद झाले होते. प्रत्येकजण या परिस्थितीचा उल्लेख ‘आनंदाची कैद’ असा करीत होते. वृद्ध नागरिकांचा अनमोल जीव वाचविण्याचा हाच एक पर्याय होता.वृद्ध नागरिकांना वृद्धाश्रमात कोंडून आपण मात्र आपल्या कार्यालयीन वेळेत यायचं आणि वेळ झाली की घरी जायचं हा पर्याय व्हॅलरीला योग्य वाटला नाही. यामुळे बंदिस्त अवस्थेतील वृद्धांमध्ये आपण कैद असल्याची नकारात्मक भावना निर्माण झाली असती, शिवाय आपल्या बाहेर येण्याजाण्यातून वृद्धांमध्ये संसर्गाची भीती होतीच. त्यामुळे व्हॅलरीनं लॉकडाऊन संपेपर्यंत वृद्धाश्रमातच राहण्याचा निर्णय घेतला. तिच्यासोबत १२ सहकारीही आपापल्या घरी न जाता वृद्धाश्रमातच राहिले. फ्रान्समध्ये लॉकडाऊन घोषित झाल्याबरोबर प्रत्येकानं घरी जाऊन चादरी, उशा कपड्याची बॅग भरून आणली. कोणीही बळजबरीनं तिथं राहत नव्हता. प्रत्येकाला वृद्धाश्रमातील वृद्धांचा आनंद आणि त्यांची काळजी महत्त्वाची वाटत होती.या बारा सहकाऱ्यांपैकी एका सहकारीचं बाळ तर केवळ दहा महिन्यांचं होतं. ४७ व्या दिवशी लॉकडाऊन शिथिल झालं. व्हॅलरीनं पूर्वीचं रूटीन सुरू करण्याआधी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांची आणि स्टाफची कोरोना चाचणी करून घेतली. ती निगेटिव्ह आली! त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं!
coronavirus: ‘आनंदाची कैद...!’ १०६ वृद्धांसाठी त्यांनी स्वत:लाही केलं बंदिस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 4:41 AM