- सुनील माने, वरिष्ठ पत्रकार आणि व्यूहरचनाकार
मानवी संस्कृतीच्या प्रवासात आपले हित साधताना दुसऱ्यांची हानी करण्याची प्रवृत्ती सतत दिसते. कोरोना विषाणू संक्रमण ही अशीच भीषण प्रवृत्ती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या वुहानमधूनच कोरोना पसरविण्यात आल्याचा अनेक शास्त्रज्ञांचा साधार दावा, अमेरिकेने या संसर्गाची चौकशी करण्याचे दिलेले आदेश, ‘जी-७’ राष्ट्रांच्या चर्चेचा चीनविरोधातला कल यामुळे चीनविरोधातल्या जागतिक आघाडीला आकार येताना दिसत आहे. जागतिक महासत्ता ठरण्याच्या आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर राखण्यासाठी चीनने जगाबरोबर जैविक युद्ध सुरू केल्याची शक्यता सध्या चर्चेत आहे.
चीन हा देशातल्या सर्व तऱ्हेच्या व्यवहारांवर पोलादी पकड असलेला वर्चस्ववादी देश, त्यामुळे कोरोना विषाणू चीनने पसरवला हे थेट पुरावा देऊन कोणी मांडण्याची शक्यता नाही. असे पुरावे मिळू द्यायला चीन काही मूर्ख नव्हे. जागतिक आरोग्य संघटना नावाचा दात पडलेला, नखे काढलेला सिंह चीनने गळ्यात साखळी बांधून कोरोनाच्या केंद्रात फिरवला, असे विषाणू तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या स्थितीत जगाला पुरावे कसे मिळणार? - त्यामुळे एकच बाब शक्य वाटते ती म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित निष्कर्ष काढून चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे. त्यासाठीची लाॅजिकल मांडणी सुरू झाली आहे.
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, २०१२ मध्येच चीनला कोरोनासारखी लक्षणे असलेला विषाणू सापडला. त्यावर बरेच संशोधन झाले. वटवाघळांचा खाण्यासाठी वापर चीनमध्ये शेकडो वर्षे सुरू आहे, पण कोरोनाचे खापर वटवाघळांवर फोडण्यात आले. मात्र या संशोधनात कोरोनाजन्य विषाणूमधील जनुकीय विशेषत: वटवाघळांत नसतात, असे त्यांना आढळून आले आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांपासून जगभरातील विविध अभ्यासकांनी यासाठी चीनला जबाबदार धरले आहे.चीनच्या डोळे दीपवणाऱ्या प्रगतीचे सगळ्या जगालाच कुतूहल आणि अप्रूपही! माओ त्से तुंग यांनी नव्या चीनची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर आणि ७०च्या दशकापासून कम्युनिस्ट नेत्यांच्या धोरणातून या नव्या चीनची उभारणी झाली आहे. कोरोना पसरविणाऱ्या या युद्धपिपासू वृत्तीचा परिपोष या धोरणात आहे, असे आता बोलले जाते. हे धोरण जगावर राज्य करण्याचे आहे. प्रस्थापितांच्या सर्व प्रकारच्या नाड्या आवळून जगात सर्वांत शक्तिशाली देश आणि प्रबळ अर्थव्यवस्था होण्याचा सर्वव्यापी कार्यक्रम चीनने ठरवला आहे. त्यात कोणताही मार्ग, हत्यार, उपाय आणि योजना यांच्या वापरावर निर्बंध नाही! कोरोना संक्रमणाचे जैविक हत्यार वापरणे हाही त्या दीर्घ योजनेचा भाग असू शकतो, अशी शंका घ्यायला जागा आहे.
कोरोना विषाणूचे संकट चीनच्या वुहान शहरातून सुरू झाले. काहींच्या मते ते तेथून सुरू करण्यात आले. या शहरातील जगात कुख्यात अशा मांस बाजाराला लक्ष्य करत जगभर त्याचे ब्रँडिंग करण्यात आले. अधिकृतरीत्या या बाजारात पाचेकशे प्रकारचे मांस मांसाहारींसाठी उपलब्ध असते. कुत्र्यामांजरांपासून हत्ती, वाघ, सिंहापर्यंतचे मांस मिळत असल्याचे सांगतात. या मांस बाजाराचे आणि कुप्रसिद्ध विषाणू प्रयोगशाळेचे शहर एकच असणे हा योगायोग नव्हे. कोरोनाचे खापर फोडता येऊ शकेल, असे सुरक्षित लक्ष्य चीनने आधीच निवडले आणि तयार केले असे जाणकार मानतात.लोकांपर्यंत नीट मांडला न गेलेला मुद्दा आता स्पष्ट केला जातो, तो म्हणजे वुहानचा बाह्य जगाशी वाहतूक संपर्क. हे मांस खाण्यासाठी जगभरातून लोक या शहरात येतात, तसेच दीड कोटी लोकसंख्या असलेले हे शहर व्यापार व आर्थिक केंद्रही आहे. जगभरातील प्रमुख शहरांतून तिथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे.कोरोनाच्या संक्रमणात चीनने व्यापार, व्यवसायासाठी आलेल्यांबरोबरच, आंतरराष्ट्रीय मांस शौकिनांचा प्रवास निर्धोक ठेवला; पण त्याच वेळी चीनचा वुहानशी असलेला देशांतर्गत संपर्क पूर्णपणे बंद केला. परिणामी, कोरोना विषाणूचा जगभर प्रसार होत त्याचे थैमान सुरू झाले; पण चीनची दोनचार शहरे वगळता अन्यत्र कुठेही त्याचा प्रसार होऊ दिला गेला नाही. वुहान ही चीनने कोरोना पसरविण्यासाठीची प्रयोगशाळा म्हणून वापरली, असा आरोप होत आहे, तो त्याच बळावर!
वुहान वगळता चीनच्या एकाही प्रमुख शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसला नाही. त्याचवेळी जगातल्या लंडन, न्यू यॉर्कसारख्या प्रमुख व्यापारी केंद्रांवर हा हल्ला झाला. भारताच्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. ही सर्व शहरे त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. तिथे घाव घातला गेल्याने या देशांचे अर्थचक्र काही काळ रोखून आणि उलटे फिरवून चीन आपली सर्वांत महत्त्वाची खेळी खेळला, अशी मांडणी आता सुरू आहे.यामागे आधार आहे तो चीनच्या महत्त्वाकांक्षेचा. ही महत्त्वाकांक्षा म्हणजे येत्या तीन वर्षांत अमेरिकेला मागे टाकून जागतिक आर्थिक महासत्ता होणे.
चीनने १९७० पासून संपूर्ण आर्थिक धोरण बदलून अंतर्गत सुधारणा घडवत जगाच्या पटलावर प्रवेश केला. आज चीन जगातली सर्वांत मोठी बाजारपेठ, सर्वांत मोठा निर्यातदार आणि सर्वांत मोठा आयातदार देश आहे. खुली अर्थव्यवस्था, परदेशी कंपन्यांचे स्वागत, देशी उद्योगांचे जाळे उभारणी, एसईझेडसारख्या उद्योग संकल्पना आणि प्रचंड निर्यात यातून चीनने देशांतर्गत आणि बाह्य जगावर आपली पकड मजबूत केली आहे. येत्या तीन वर्षांत चीन अमेरिकेला मागे टाकून जगाची क्रमांक १ ची आर्थिक महासत्ता होईल, असे अंदाज जागतिक अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यानुसार, २०२५ मध्ये चीनची अर्थव्यवस्था २२ ट्रिलियन डॅालर्सवर पोहोचेल, तर अमेरिकेची २१ ट्रिलियन राहील. (एक ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी डॉलर्स.)
अख्खे जग लसीकरणासाठी झगडत असताना चीनने मात्र ६८ कोटी २० लाख लोकांचे, म्हणजे लसीकरणासाठी पात्र जवळपास प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण केले आहे. याचा अर्थ काय? चीनने विषाणूसोबत त्याचा अँटिडॉटही तयार केला आणि आपल्या लोकांचे रक्षण केले, असा याचा सरळ अर्थ आहे, अशी काही तज्ज्ञांची मांडणी आहे.
-mane.sunil@gmail.com