- सविता देव हरकरे
(उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षा दलासोबत पाठशिवणीचा खेळ खेळणारा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ‘पोस्टर बॉय’ रियाज नायकूला अखेर भारतीय जवानांनी टिपलेच. तीन वर्षांपूर्वी या संघटनेचा कमांडर बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर रियाजने त्याची जागा घेतली होती. मुळात गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. त्याच्यासह आणखी ६४ दहशतवाद्यांचा खात्मा हे एक मोठे यश मानले जात असले, तरी गेल्या पंधरवड्यात दहशतवादविरोधी लढ्यात देशाला सात सपुतांना गमवावे लागले, हे विसरून चालणार नाही.सध्या केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत आहे. अशात जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तान व त्या देशाद्वारे प्रायोजित दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या कारवाया म्हणजे अमानवीय वर्तुणुकीचा कळस आहे. अर्थात, त्यांच्याकडून मानवीयतेची अपेक्षा करणेही व्यर्थच म्हणायचे. जम्मू-काश्मिरात कोरोनाचा शिरकाव यापूर्वीच झाला आहे. पाकिस्तानलाही या विषाणूने विळखा घातला आहे; पण या परिस्थितीतही देश सावरण्याऐवजी शेजारील राष्टÑांत कुरापती करण्यातच त्यांना भूषण वाटावे, यापेक्षा लांच्छनास्पद दुसरे काय असू शकते? म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. एप्रिल-मे महिना घुसखोरीसाठी सोयीचा असतो. हीच संधी साधण्याचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलही सतर्क असते. ३०० दहशतवादी नियंत्रण रेषेवर व्याप्त काश्मिरात घुसखोरीसाठी तयार असल्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर खोºयात गेल्या एक मेपासून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.इकडे छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले; पण त्यांचीही शहादत कोरोनाच्या विळख्यामुळे विस्मरणात गेली. आपल्या देशात ही समस्या दुहेरी आहे. कारण आपल्या येथे जसजसे ऊन तापू लागते तसतसे दहशतवाद्यांच्या घुसखोरीसोबतच नक्षलीही डोके वर काढत असतात. या काळात ते अधिक आक्रमक होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे घडत आलेय. सुकमातील घटना ही त्याचीच चाहूल आहे. लॉकडाऊनच्या आड नक्षली मोठ्या प्रमाणात जमवाजमव करीत आहेत आणि बस्तर भागातच आणखी मोठे हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. नक्षलविरोधी मोहिमेवर लक्ष ठेवणाºया एका ज्येष्ठ अधिकाºयाने हा खुलासा केला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह नेपाळमधूनही नक्षलवादी एकत्र आले असून, त्यांच्या बैठका सुरू असल्याचेही या अधिकाºयाचे म्हणणे आहे.राज्यातील सर्वाधिक नक्षलग्रस्त समजल्या जाणाºया गडचिरोली जिल्ह्यातही अलीकडेच नक्षल्यांनी धुमाकूळ घातला होता. दुसरीकडे ओडिशात मात्र त्यांनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे; पण ती कितपत पाळली जाईल सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी झाला आहे. बहुदा त्यामुळेच ही चळवळ थंडावली, असा समज शासनाने करून घेतला असावा; पण तो किती चुकीचा आहे याचा प्रत्यय या हल्ल्याने आणून दिलाय. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते; पण हा विचार अथवा चळवळीचे समूळ उच्चाटन अशक्य नसले तरी वाटते तेवढे सोपेहीे नाही. देशाच्या सीमेवर आणि आतही आणखी किती वर्षे जवानांचे हे मरणसत्र सुरू राहणार, हा प्रश्न आहे. अशा घटनांनी मनाचा संताप होतो, तसेच दहशतवाद आणि नक्षलवादाच्या या किडीवर कायमस्वरूपी काहीच उपाय होऊ शकत नाही याची अगतिकताही असते.गेल्या अनेक दशकांपासून केंद्र व राज्य सरकारांतर्फे नक्षल्यांच्या बीमोडाकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या. मोहिमा आखण्यात आल्या. त्यामुळे ही चळवळ खिळखिळी करण्यास नक्कीच हातभार लागला आहे, याबद्दल कुणाचे दुमत नाही; पण हे प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत. नक्षलवादाचा जन्म हा मुळात शोषणातून झाला आहे. त्यामुळे अशा नक्षलग्रस्त भागात सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्या लागणार आहेत. गडचिरोलीत मागील दोन-तीन वर्षांत स्थानिक लोकच नक्षल्यांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हा एक आशेचा किरण आहे. सरकार आणि सुरक्षा दलांच्या कुठल्याही मोहिमेपेक्षा जनक्षोभाचे अस्त्र रामबाण ठरणार हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त लोक विकासगंगेत कसे सहभागी होतील हे बघावे लागेल. नक्षली नव्हे, तर हा समाज, सरकार आपला सच्चा मित्र आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजवावी लागेल.