एकविसावे शतक नव्या तंत्रयुगाचे असेल. ज्ञान हे भांडवल असणार! मानवाच्या नवनव्या शोधांचा आविष्कार अधिक सुखकर जीवन सर्वांसाठी उपलब्ध करून देणार! असे म्हणत या शतकातील दुसरे दशक संपतासंपता एक अनाकलनीय कोरोना नावाचे संकट आले आहे. भारताने याला तोंड देण्यासाठी सर्व आधुनिक जीवन गुंडाळून ठेवून लुप्त होण्याचा एकवीस दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकविसाव्या शतकाचे स्वागत करताना असे लुप्त होण्याचे जिणे वाट्याला येईल, याची अंधुकशी जाणीवही कोणाच्या मनाला स्पर्श करून गेली नव्हती. आज एक दिवस सरला आहे. अजून वीस दिवस घरात राहून या कोरोना विषाणूचा पराभव करता येईल का? याची प्रतीक्षा करायची आहे. चैत्र पाडवा साजरा करण्यासाठी घराच्या दारात किंवा फ्लॅटच्या बाल्कनीत जात असताना दोन वार्ता कानावर पडल्या. तेव्हा वाटलं, एकवीस दिवस संपतील तेव्हा नवा दिवस शुभवर्तमान घेऊन येईल. कोल्हापुरात संशयित म्हणून दाखल झालेल्या सर्व १७ रुग्णांचा अहवाल आला आणि ते सर्व निगेटिव्ह आहेत. दुसरी वार्ता होती की, पुण्यात एका जोडप्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी जाऊ देण्यात आले. ते पूर्ण बरे झाले. महाराष्टÑातील ते पहिले रुग्ण होते. भारतात आजअखेर ५६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी दहाजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, आदी विकसित राष्ट्रापेक्षा आपल्याकडील कोरोना विषाणूचा फैलाव कमी आहे आणि मृत्यूंचे प्रमाणही कमी आहे. याचा अर्थ आपण कसंही वागून चालणार नाही. गेल्या रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी जशी साथ दिली. तशीच आणखी दोन-तीन आठवडे साथ देण्याची गरज आहे. मागील शतकात प्लेगसारख्या अनेक साथींचा आपण पराभव केला आहे. एड्ससारख्या रोगावर विजय मिळविला आहे. दोन महायुद्धांतून बरेच काही शिकलो आहोत. हिरोशिमा आणि नागासाकी कायमचे स्मरणात राहिले आहेत. निम्म्याहून अधिक विश्व अतिरेकी कारवायांनी होरपळून निघाले आहे. या सर्व संकटांपेक्षा भयावह महासंकट कोरोना विषाणूचे आहे. संपूर्ण विश्वाची गतीच थोपवावी लागली. पृथ्वी स्वत:भोवती फिरते आणि चंद्र तिच्याभोवती फिरतो, हे सिद्ध करायला आणि मान्य करायला किती वाद माणसांनी घातले आहेत. त्याच पृथ्वीवरील मानवाची गती वाढली. ती आज पूर्ण रोखावी लागली. असे एखाद्या हॉरर चित्रपटाला शोभेल, असे कथानक मानवाच्या समोर आले आहे. त्याचा शेवट कसा होणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कोल्हापूर आणि पुण्यातील रुग्णांच्या तब्ब्येतीची सुधारणा ही आशेचा किरण आहे. याचा अर्थ नवे रुग्ण सापडत नाहीत किंवा दाखल होत नाहीत, असे नाही. त्याचा प्रादुर्भाव अद्याप होतो आहे. आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या तिसऱ्या टप्प्यांवर येऊन पोहोचलो आहोत. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचा प्रादुर्भाव हा तिसºया टप्प्यांतील काळजी न घेतल्याने झाला आहे. त्यामुळे काही घटना या शुभवर्तमानाची पहाट होणार आहे, अशी अंधुकशी आशा दाखवित आहेत. डॉक्टर, रुग्णालये, कर्मचारी, शासन, प्रशासन, आदींच्या प्रयत्नांना आपण कसा प्रतिसाद देतो आहोत. यावर सर्व काही अवलंबून आहे. मला वाटते, एड्स विरोधाचा लढा देताना तथाकथित संस्कृतिबंध बाजूला ठेवून निरोधाचा वापर हाच उपाय मानला, तेव्हा त्यावर मात करता आली. मात्र, अजूनही त्यावर कायमस्वरुपी उपाय सापडलेला नाही. कोरोनाचा उद्भव नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये झाला. त्याने जगात आतापर्यत चार लाख ४० हजारापर्यंत बाधित केले आहेत. तर १९ हजार ७५२ जणांचा बळी घेतला आहेत. त्यावर अद्याप लसही सापडलेली नाही .त्यामुळे हे बळी वाढू नयेत यासाठी आता सामाजिक विलगीकरण जपणे, घरात थांबून इतरांना मदत करणे, स्वत:चा बचाव करणे याला प्राधान्य द्यायला हवे आहे. भारतीयांनी २१ दिवस हे तंतोतंत पाळले की, विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची साखळी निश्चित तुटेल आणि आपण त्यावर मात करू शकू! चैत्र पाडव्याचा हा निर्धार असला पाहिजे!
Coronavirus : शुभवर्तमानासाठी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 1:58 AM