- किरण अग्रवालआपत्तीलाही संधी मानून तिचा लाभ उचलू पाहणारे जेव्हा आढळून येतात, तेव्हा संवेदनशील मनाच्या लोकांचे हळहळणे स्वाभाविक असते, यातही व्यावसायिकतेतील पै पैशाच्या लाभापलीकडे जाऊन जेव्हा कुणाकडून निर्मम अगर संवेदनहीनतेचा प्रत्यय घडविणारे वर्तन घडून येते, तेव्हा चीड वा संताप आल्याखेरीज राहात नाही. मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अशा प्रकरणात खरंतर संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु तेही धड होत नसल्याचाच अधिकतर अनुभव येतो. सद्यस्थितीतील कोरोनाच्या संकटात अशीच काही उदाहरणे पुढे आल्याने समाजमन अस्वस्थ होणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू पाहात असल्याचे दिलासादायक वर्तमान आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून ८९.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर पॉझिटिव्हिटी दरही ९.५४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असून, मृत्यूदरही १.१४ टक्क्यांपर्यंत घटला आहे. चेन्नईमधील गणित विज्ञान संस्थेतील संशोधक सितभ्र सिन्हा यांनी केलेल्या संशोधनानुसार या महामारीशी संबंधित ‘आर’ संकेतांक प्रथमच ०.८२ एवढ्या नीच्चांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळतात. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जागोजागी लागू करावे लागलेले कडक निर्बंध हळूहळू काही प्रमाणात शिथील केले जात आहेत. अर्थात कोरोना गेलेला नाहीच, मात्र तो आटोक्यात येत असल्याचे संकेत पाहता, ‘फीलगुड’ म्हणता यावे, अशी स्थिती आहे. जनमानसातील भीतीचे वातावरण ओसरायला यामुळे मदत व्हावी, परंतु एकीकडे असे होत असताना दुसरीकडे माणुसकीला नख लावणारे प्रकार समोर येत असल्याने भीतीची जागा अस्वस्थतेने घेणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
तिकडे प्रयागराजमध्ये शेकडो शव गंगेत वाहून येत असल्याचे दूरचित्रवाणी माध्यमातून बघायला मिळाले असताना, नदीकाठी वाळूत पुरलेल्या प्रेतांवरील चादरी व त्याभोवती रोवले गेलेले बांबू काढून नेल्याचा दुर्दैवी प्रकार पुढे आला आहे. मनुष्य इतका कसा स्वार्थांध, माणुसकीशून्य व संवेदनाहिन होऊ शकतो, असा प्रश्न हे चित्र पाहून पडावा. आपल्याकडचेच उदाहरण घ्या, एकीकडे रुग्णालयात दाखल झालेला एकेक जीव वाचविण्यासाठी वैद्यकीय सेवकांचा मोठा वर्ग अविरत सेवा देत प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, दुसरीकडे अपवादात्मक संख्येत का होईना काहीजण सेवा व विश्वास या संकल्पनांशी फारकत घेत याहीस्थितीत आपला व्यवसाय मांडून बसल्याच्या तक्रारी आहेत. केवळ पैसे लाटण्यासाठी चक्क मृतदेहावर तीन दिवस उपचार केले गेल्याचा प्रकार नांदेडात पुढे आला असून, मृतकाचा चेहरा दाखविण्यासाठी म्हणजे अंतिम दर्शनासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये घडल्याची तक्रार ऐकावयास मिळाली. विदर्भातील खामगावमध्ये रुग्णाच्या शिल्लक बिलापोटी महिलेचे मंगळसूत्र ठेवून घेतले गेल्याची बाब समाजमाध्यमात व्हायरल झाली, तर नाशकात मेडिक्लेमचे पैसे कंपनीकडून पदरात पडूनदेखील रुग्णाची अनामत रक्कम परत न दिल्यामुळे संबंधितांना रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करावे लागल्याची घटना चर्चित ठरली. ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणे, परंतु यासारखे लहान-मोठे प्रकार अनेक ठिकाणी घडले ज्यातून संधीसाधूपणाचा निर्मम व क्रूर चेहरा पुढे येऊन गेला.
अशा घटनांचे प्रमाण नगण्य आहे, यापेक्षा सेवाभावाने झटणाऱ्या व अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे हे खरे, परंतु मोठ्या पांढऱ्या कॅनव्हासवरील छोटा का होईना काळा डाग हा लक्ष वेधून घेतो, तसे माणुसकीशून्यतेचा अनुभव देणाऱ्या अपवादात्मक घटनांबद्दल होते; म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. संवेदना इतक्या का ओहोटीला लागल्या की, मनुष्याकडून पशुत्वाचे वर्तन घडावे; हा या संदर्भातून उपस्थित होणारा खरा प्रश्न आहे. ‘नरेचि केला हीन किती नर’ या उक्तीचा प्रत्यय यावा, अशाच या घटना म्हणायला हव्यात. कधी ना कधी जायचे प्रत्येकालाच आहे, परंतु राहायच्या कालावधीत जगण्यासाठी इतकी वा अशी यातायात करावी लागणार असेल तर त्या जगण्याला अर्थ तो काय उरावा? पण दुर्दैवाने भावनाशून्यता वाढीस लागली आहे. कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवजातीवरचे संकट आहे, तेव्हा त्याला सामोरे जाताना माणुसकी सोडून चालणार नाही, इतकेच यानिमित्ताने सांगणे.