शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

एकांत रिचवण्याचं धैर्य आहे का आपल्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:49 AM

जगण्याची शाश्‍वती नसेल तर लोक कदाचित जास्त उथळपणे वागतील! ‘मजे’साठी तळमळतील! मग सेक्स, ड्रग्ज, मनोरंजन सगळंच उथळ होत जाईल!

- किशोर कदम ( ‘सौमित्र’)वर्षभरापूर्वी अचानक एकांत लादला गेला होता. त्याच्याशी जुळवून घेताना काय घडलं?एक दिवस लॉकडाऊन घोषित झाला आणि बाहेर पडायचंच नाही असं कळलं. पहिल्या दिवशी उशिरा उठलो. मजा वाटली. बाहेर ट्रॅफिकचा आवाज नाही, रस्त्यावर माणसं नाहीत. संध्याकाळही बरी वाटली. पुस्तकं चाळत राहिलो, वाटलं, आजचा दिवस किती शांत गेला! बायकोशी गप्पा झाल्या. मित्रांशी बोललो. दुसराही दिवस तसाच. तिसर्‍या-चौथ्या दिवसापासून जाणवायला लागलं की हे भयंकर काहीतरी आहे. आपण आपल्या इमारतीमध्ये प्राणिसंग्रहालयात प्राणी जसे अडकून पडतात तसे अडकलो आहोत. मोठ्या शहरांमधल्या टोलेजंग इमारतीत खिडकी खिडकीत, बाल्कनीत माणूस उभा आहे आणि रिकामे रस्ते बघतोय. ‘मनुष्यप्राणी’ हा शब्द आपण सिद्ध केलाय. मग भीती वाटायला लागली. खरं तर इतका गोंगाट, गर्दी बघून कधीतरी उद्वेगानं शांतता हवीय, मोकळ्या रस्त्यांवरून पाय मोकळे करता यायला हवेत असं वाटायचं. त्या काळात गेटपर्यंत येऊन बघितलं, रिकामे रस्ते, दूरपर्यंत कोण माणूस नाही; पण तरी चालू शकत नव्हतो. धैर्य करून रस्त्यावर पाय ठेवला, मध्यापर्यंत चालत गेलो, तर सगळं सामसूम.  हे शहरात घडत होतं. इमारतींमध्ये माणसं भरली आहेत; पण कुणी खाली उतरत नाही! अणुहल्ल्यात बेचिराख झालेल्या हिरोशिमामध्ये जे जिवंत राहिले त्यांनी जो भकासपणा अनुभवला असेल तसा काहीसा मी अनुभवू शकत होतो. 

उदासीनता टोकाची होती. वेगळ्या स्वरूपाचा अस्वस्थ काळ असू शकतो याची कल्पना मला काय, कुणालाच नव्हती. संपूर्ण जगभर माणूस हे अनपेक्षित भयाण वास्तव अनुभवत होता.  महिनाभर तसा गेल्यावर आर्थिक नियोजन गडबडण्याचे दिवस आले. माझं कामच गर्दीशी निगडित. शूटिंगच्या वेळी किमान पाचशे लोक आजूबाजूला असतात, फ्रेममध्ये तीन तरी असतात. काळजी घेऊन घेऊन तर किती घेणार? कितीवेळा हात धुणार, कितीवेळा तोंडाला हात लावणं टाळणार? किती अंतर राखून चालणार?  संकटाचं स्वरूप गंभीरच होत राहिलं. आता वाटतं, मास्क, हात धुणं वगैरे काळजी म्हणजे स्वत:ला दिलेला दिलासा की मी सुरक्षित आहे... कधीतरी नवीन सुरुवातीसाठी जुनं संपावं लागतं. मात्र या जुन्याची भयानकता जगण्यात पुरून उरेल अशी आहे.
दु:खाला रुपेरी किनार असते म्हणतात, तसं नवं काही समोर येतंय का यातून?हिटलरच्या छळछावण्यांच्या अघोरी कृत्यानंतर, अणुबॉम्बनी शहरं बेचिराख झाल्यानंतर जेव्हा एक पिढी संपली त्यानंतर गंभीरपणानं लिहिणार्‍या-वाचणार्‍यांच्या कृती समोर आल्या. चित्रं, सिनेमे, कादंबर्‍या यायला लागल्या. कोविड काळात काय झालं हे सर्जनशील अंगानं येण्यासाठीही एक पिढी जावी लागेल. तो काळ जात असताना या पॅन्डेमिकपेक्षाही आणखी काही भयानक येण्याची शक्यता मला भिववते. जागतिक वातावरण प्रचंड ढवळून निघाल्याचं आपण पाहतो आहोत. हुकूमशाही मुळं घट्ट करू लागलीय. जगाची ही परिस्थिती करण्यामध्ये व्यापार, पैसा, जागतिक राजकारण असे अनेक मुद्दे आपल्याला कळत नाहीत व आपण फक्त आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपला देश, आपला धर्म, जातपात, पगार, भूक या गोष्टींमध्ये अडकून राहातो.  आपल्यासारखे समजदार लोक बातम्यांच्या चॅनल्ससमोर खिळून बसतात, कारण ती आपलं मनोरंजन करतात.  प्रदीर्घ काळ अशा सर्व तर्‍हेच्या ‘बाधितते’त काढल्यावर लिहिलेली कविता, कादंबरी, चित्रं, सिनेमा खूप वेगळे असणार आहेत. माणसांच्या आतून बदललेल्या रचनेचे परिणाम लगेच दिसणार नाहीत. पण ज्या प्रकारची घुसमट, तुटलेपण, भकासपण अनुभवास आलं त्याचं काहीतरी रूप समोर येणारच. अशा परिस्थितीतून जाताना कुठलाही कलावंत ‘ही घुसळण बघू नि वापरू’ असा हिशेब करू शकत नसतो. तो टिपकागदासारखं सगळं नकळत शोषून घेतो. पुष्कळ काळानंतर कुठल्यातरी कवितेत, चित्रात, सिनेमात कुठल्यातरी प्रसंगात ती तार छेडली जाते आणि धागा जुळून टिपलेलं वर येतं! तरीही सांगतो, परिस्थिती इतकी बिकट होऊ शकते की लोक आयुष्याकडं गांभीर्यानं बघणंच सोडून देतील की काय याची भीती वाटते. ते जास्त उथळपणे जगू लागतील, जास्त उथळ सिनेमे निघतील. उद्या आपण जगू की मरू याची शाश्‍वती नसेल तर लोकांना फक्त ‘एन्टरटेन्मेंट’ हवी असेल ... आजचा क्षण साजरा करण्यासाठी ते तळमळू लागतील आणि मग तशाच गोष्टींचा पुरवठा वाढेल. यामध्ये सेक्स आला, ड्रग्ज आले, मनोरंजन आलं.तीव्र संवेदशील नजर घेऊन भणंग ‘बाऊल’पण, भटकेपण स्वीकारून या अस्वस्थतेतून मार्ग सापडेल?यातून काही मार्ग आहे, असं मला वाटत नाही. स्वस्थता कुठून कशी येणार? आज मी ठरवलं की मनासारख्या भूमिका केल्या, पैसा कमावला, वाहवा मिळवली आता मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. वाटण्याचं करू काय? ‘साद देती हिमशिखरे’ किंवा हिमालयातल्या साधूंबद्दल लिहिलेलं पुस्तक ‘लिव्हिंग विथ द हिमालयन मास्टर्स’ वाचताना वाटतं, तेव्हा तर नव्हतं ‘पॅन्डेमिक’ मग तरीही लोक शोध घेण्याकरता गेले. त्या मन:स्थितीपर्यंत आम्हा कलावंतांना पोहोचता येईल? अदृश्य होण्याचं तितकं धैर्य आपल्याकडं आहे? एकांत भोगण्यासाठी खूप मोठी मानसिक ताकद लागते. ती आपल्याकडे नाही असं मला वाटतं. त्यामुळं शहरातल्या रिकाम्या किंवा भरलेल्या, गर्दीतल्या किंवा तुरळक गर्दीतल्या, बाजारातल्या किंवा दुकानातल्या गर्दीमधून फक्त चालत राहाणं, बघत राहाणं आणि आपल्याला जे जाणवतंय ते जमलं तर नोंद करून ठेवणं, त्यातून काहीतरी सर्जनशील घडवण्याचा प्रयत्न करणं इतकंच करता येतं. भयानकाचा थेट सामना करून समाजाकडं बघू नि सर्जनशील काहीतरी प्रसवू म्हटलं तर तो खोटारडेपणा होईल. अस्वस्थ आहात, मुके झाला आहात; पण तुमच्या आत काहीतरी झिरपतंय इतकंच पाहाणं आपल्यासारखी माणसं करू शकतात.  लोक अंतर ठेवताहेत, भीती पसरलीय. काही देशांमधले धूर्त राजकारणी प्रतिशोधासाठी महामारीचा वापर करताहेत. हे लक्षात येऊन आपण काही करू शकत नाही ही हतबलता कलावंतांमध्ये किती रूजत चाललीय हे काळ ठरवेल!मुलाखत : सोनाली नवांगुळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या