>> अतुल कुलकर्णी
आपल्याकडे एक म्हण आहे, कोणी जात्यात तर कोणी सुपात... अगदी फार नाही, पण अगदीच तीन चार महिन्यापूर्वी चीनच्या वुहान शहरातून एक साथ सुरू झाली. त्यावेळी त्याचे पडसाद साता समुद्रापलीकडे असणाऱ्या युरोपीयन देशात उमटतील आणि ते देशच प्रचंड संकटात येतील असं कोणी सांगितलं असतं तर असं सांगणाऱ्याला त्या लोकांनी ठार वेडाच ठरवलं असतं... अगदी तसंच काहीसं अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इराण अशा देशांनाही वाटलं होतं. चीनमधला व्हायरस आपल्याकडे येईलच कसा..? आपल्याला असल्या व्हायरसनं काहीही होणार नाही, या अतिविश्वासात या देशांचे लोक होते... जसं आज आम्ही आहोत...
त्या देशांच्या जनतेला त्यांच्या राज्यकर्त्यांनी समजावून सांगितलं... हात जोडून सांगितलं... दंडुके मारत सांगितलं... बाबांनो, घरी बसा, बाहेर पडू नका... मात्र अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, इराण या व अशा अनेक देशांनी ते ऐकलं नाही.... जसं आज आम्ही कोणाचंही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही...
त्या सगळ्या देशांची लोकसंख्या किती...? त्या देशांची आर्थिक स्थिती काय...? त्यांच्याकडे असणाऱ्या वैद्यकीय सोयी सुविधा किती...? ते देश प्रगत किती...? आणि त्या देशातील नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास किती...? तरीही आज अमेरिकेपासून सगळे देश प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आणि आम्ही....?
आमच्याकडेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी सांगून झालं... हात जोडून विनवण्या करून झाल्या... लाठ्या काठ्यांचे प्रसादही देऊन झाले... आम्ही मात्र कोरोना नावाच्या भिक्कारड्या विषाणूला जुमानत नाही तिथं तुम्ही कोण लागून गेलात...? तुम्ही सगळा देश लॉकडाऊन केल्यानं आम्हाला काहीही फरक पडत नाही, समजलं... आमच्या मर्दुमकीचे किस्से तरी माहिती आहेत का तुम्हाला....
एक डॉक्टर, लंडनहून आला. त्यांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला होता, पण त्या मोठ्या डॉक्टरनं विमानतळावरच्या फडतूस डॉक्टरचं कशाला ऐकायचं... तो घरी गेला, कोरोनाच्या विषाणूचा प्रसाद स्वत:च्या अख्खा खानदानाला दिला. त्यात त्याचे आजोबा असणारे ज्येष्ठ डॉक्टर जीवानिशी गेले... याच काळात लंडन रिटर्न या डॉक्टर महाशयानं दोन बायपास सर्जरी केल्या... आता त्यांच्या सहवासात आलेले डॉक्टर, नर्सेस, अन्य कर्मचारी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेत बसलेत... त्यात त्याचा काय दोष ना?...
एक दांपत्य असंच धार्मिक स्थळाला भेट देऊन आलं. त्यांनाही घरातच क्वॉरंटाईन चा सल्ला दिला होता. पण ते तर देवाला जाऊन भेटून आले ना?... तो विषाणू काय देवापेक्षा भारीय का राव?... त्यांचं काय वाकडं करणार... पण तो विषाणू देवाला नाही घाबरला... आता त्या कुटुंबातले १९ लोक या विषाणूच्या तडाख्यात आहेत... म्हणून काय झालं...
तुम्ही लॉकडाऊन केलं, तरीपण एका गावातल्या लोकांना धार्मिक कार्यक्रमाची पालखी काढायला पोलिसांनी विरोध केला... काय हिंमतय राव त्या पोलिसांची... आता मग गावकऱ्यांनी रत्यांच्यावरच दगडफेक केली तर त्यात त्यांचं काय चुकलं... खरं आहे बाबा, तुमच्या या असल्या पराक्रमाची यादी फार मोठी आहे...
पण एकच सांगतो, त्या अमेरिकेनं, इटलीनं असंच केलं... जे आज तुम्ही करताय... सांगूनही ऐकायचंच नाही, त्यात तुम्हाला पुरुषार्थ वाटतोय... पण त्या देशात जसं रोज सात-आठशे लोक धडाधडा मरून जात आहेत, त्यांना उचलायला पण कोणी उरलेलं नाही बाबांनो... मिल्ट्रीच्या गाड्यातून एकावर एक सरण रचावं तसं मृतदेह ठेवून नेले मिल्ट्रीवाल्यांनी... इराणमध्ये ओळीनं पाच पन्नास ट्रक डेडबॉडीज घेऊन एका मार्केटमधून गेले, लोक तेवढ्यापुरतं बाजूला झाले, त्या गाड्या गेल्या की पुन्हा आपापला जीव वाचवायला निघाले...
ती अवस्था आपल्या अशा बेताल वागण्यानं आपणच आणणार आहोत याची खात्री पटायला लागलीय... रोज सकाळी भाजीमंडईत आम्ही बेलगाम गर्दी करतोय... अनेक वस्त्या वाड्यांवर जणू काही झालंच नाही अशा रितीनं मिरवतोय... ही अशी मस्ती चांगली नाही मित्रांनो एवढंच सांगतो...
बघा विचार करा... तुमचा नाही तर नाही पण तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या म्हाताऱ्या आईबापाचा, बायकोचा, पोराबाळांचा तरी विचार करा... जिवंत राहीलात तर कोणाला ना कोणाला या सगळ्या लढाईत कोण चुकलं, कोण बरोबर ठरलं हे तरी सांगू शकाल... नाहीतर ही व्यवस्था तुम्हालाच एक दिवस चुकीचं ठरवून कायमचं संपवून टाकेल... थोडी तरी लाज लज्जा असलीच तर बघा विचार करा... घरी थांबता येतं का याचा....
(लेखक 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)