उत्तराखंडमधील हरिद्वारला दर बारा वर्षांनी होणारा महाकुंभमेळा होत असताना कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. सोमवारी सोमवती आमावास्या होती. कुंभ राशीत गुरू आणि मेष राशीत सूर्य असताना हरिद्वारला कुंभपर्व असते. त्यासाठी आजवर हरिद्वारला १७ लाख ३३ हजार साधू-संत, तसेच भाविकांनी भेट दिल्याचे उत्तराखंड प्रशासन सांगत आहे. दर बारा वर्षांनी येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी उत्तराखंड सरकारने फेटाळून लावत साधू-संतांची बाजू उचलून धरली. उत्तराखंड उच्च न्यायालयाने याची नोंद घेत काही निकष पाळले जावेत, असे निर्देश दिले होते.
कुंभमेळ्याला येणाऱ्या प्रत्येकाने कोविड नसल्याचा अहवाल घेऊन हरिद्वारमध्ये प्रवेश करावा, मास्कचा वापर करावा आणि सामाजिक अंतर पाळून सर्वांचा वावर असावा, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. यापैकी एकाही नियमाची किंवा निर्देशाची अंमलबजावणी झाली नाही. याउलट दर बारा वर्षांनी शाहीस्नानास होणारी गर्दीच हरिद्वारमध्ये गंगामय्याच्या तीरावर दिसून आली. उत्तराखंडचे पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी ही गर्दी रोखणे अशक्य असल्याचे स्पष्ट करीत पोलिसांनी हस्तक्षेप केला तर चेंगराचेंगरी होईल, असा खुलासा केला आहे.
प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडांत दर बारा वर्षांनी कुंभमेळा होत असतो. या कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू-संत आणि भाविकांच्या गर्दीचा अंदाज प्रशासनाला असतो. या उपरही उत्तराखंड प्रशासनाने कोणतीही खबरदारी न घेता कुंभमेळा होऊ दिला आहे. उत्तराखंड हा उत्तर प्रदेश राज्याचा भाग होता. उत्तर प्रदेशाच्या सीमेवरील या शहरात हा मेळा होत असताना उत्तर प्रदेशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे, याची नोंदही घ्यायला हवी होती. या दोन्ही प्रदेशांतील शाळा, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. सर्व जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर कुंभमेळा होणे आवश्यक होते का, असा सवाल उपस्थित होतो.
शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना आपण एकत्र येऊ देत नसताना कुंभमेळा होण्याची गरज होती का? महाराष्ट्रात पांडुरंगाची वारी दरवर्षी आषाढी, कार्तिकीला निघते. जोतिबाची यात्रा चैत्र पौर्णिमेला सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत भरते. जेजुरीला खंडेरायाची यात्रा भरते. अशा असंख्य यात्रा-जत्रा महाराष्ट्रात शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार होत आल्या आहेत. त्या वारकऱ्यांची वारी आणि भाविकांच्या सर्व यात्रा-जत्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चैत्र पौर्णिमेला कोल्हापूरजवळच्या वाडी रत्नागिरी डोंगरावर पाऊल ठेवायला जागा नसते, इतकी गर्दी होते. जोतिबाचे मंदिर आज कुलूपबंद आहे. गतवर्षीही ते बंद ठेवण्यात आले होते. जोतिबा यात्रेला येणारा भाविक अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर शहरात येतो. करवीरनगरीलाच यात्रेचे स्वरूप येते. उत्साहाचा माहौल असतो. चैत्र पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशीच्या रात्री अंबाबाईच्या पालखीची भव्य मिरवणूक निघते. गेली दोन वर्षे हे सर्व बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या काळजीने आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार भाविकांनी कठीण प्रसंग समजून घेतला. त्याला प्रतिसाद दिला.
घरोघरीच जोतिबाची पूजा आणि श्री अंबाबाईची भक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशा वातावरणात भाविकांनी घरासमोर गुढ्या उभारून सण साजरा केला. कुंभमेळ्यासाठी जमलेल्यांनी कोरोनासंबंधीच्या कोणत्याही नियमांचे पालन तर केलेच नाही, किंबहुना या नियमांचे पालन तेथे जमणाऱ्या साधू-संतांच्या संख्येमुळे शक्यच नाही, हे प्रत्येकाला माहीत होते. तरीदेखील धर्माळू, धर्मांध आणि धर्मभावनांना महत्त्व देणाऱ्या प्रशासनाने कुंभमेळा होऊ दिला.
शाहीस्नानापूर्वी आणि नंतरही येणाऱ्या वृत्तांतानुसार अनेक साधू-संतांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी नवी दिल्लीत मरकज मेळ्यासाठी काही हजार मुस्लीम बांधव जमले होते. त्यात काही परदेशांतून आलेले होते, त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सभ्यतेला न शोभणारी वक्तव्ये भाजपच्या आमदार- खासदारांनी केली होती. त्यांना कोरोना जिहादी म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.
तो एक प्रकारे धर्मांध प्रचाराचा भाग होता, असे वाटत होते. त्यावेळी कोरोनाची नियमावलीदेखील लागू करण्यात आली नव्हती. हा हिंदू- मुस्लीम असा तुलना करायचा भाग नाही. कोणत्याही समाजाचे बांधव असाेत, कोरोना संसर्गाच्या कालावधीत एकत्र येणे गंभीर आहे. यासाठी संपूर्ण देश लॉक करावा लागला होता. अशा पार्श्वभूमीवर होणारा कुंभमेळा आवश्यक हाेता का?