माणूस भटकण्याच्या अवस्थेतून बाहेर पडला, त्याला हजारो वर्षे झाली. वस्ती करून राहू लागला. निवासाची सोय करून एकत्र राहू लागला. अधिक विकासासाठी आणि आनंदी जीवनासाठी तो बाहेर पडत असला तरी सायंकाळ होताच बंद दरवाजाच्या आड येऊन विश्रांती घ्यायची, हा त्याचा नित्यक्रम होता. मात्र, त्याची अधिक सुखी, समाधानी जीवनासाठीची गती इतकी वाढली की, तो चोवीस तास पुन्हा-पुन्हा भटकंती करू लागला. आठ-आठ तासांच्या पाळीत चोवीस तास काम करू लागला. वाहतुकीची अनेक साधने चोवीस तास चालू ठेवू लागला. आनंदात अखंड विहार करण्यासाठी त्याने ‘नाईट लाईफ’ची कल्पनाही मांडली आणि त्याचा उपभोग तो घेऊ लागला. उत्पादन, निर्मिती, व्यवहार आणि पैशांचा खेळ अहोरात्र करत राहिला. त्याची त्याला सवयच जडली. सर्वकाही अंगवळणी पडले. ऐशारामी समाजरचनेत समूहाने राहू लागला.
या सर्वांपासून उपेक्षित असणाराही मोठा वर्ग दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बंद दरवाजे उघडून दुनियादारी करू लागला. तोच माणूस आज त्या दरवाजाच्या दिशेने मिळेल त्या मार्गाने मागे धावतो आहे. गेली चौपन्न दिवस संपूर्ण देश बंद दरवाजाच्या आड आहे. तो आणखीन तेरा दिवस ३१ मेपर्यंत दरवाजा बंदच ठेवण्यात येणार आहे. आपल्या देशात जवळपास एक लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आली आहे, त्यापैकी ३६ हजारजण बरे झाले असले तरी तीन हजारजणांना प्राणाला मुकावे लागले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग तरी कमी होत नाही. विशेषत: मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा धोका वाढतो आहे. परिणामी, या महानगरीतील गावाकडील माणूस ‘आपला गावच बरा’ म्हणून परत जातो आहे. कोट्यवधी स्थलांतरित मजूरवर्ग आपापल्या गावी जाऊन दरवाजाआड लपण्याचा प्रयत्न करतो आहे.
२४ मार्चला अचानक एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही, असा निर्बंध घालण्यात आला. आधुनिक जगात हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे होते. मात्र, उपायही नव्हता; तसेच तीनवेळा हा लॉकडाऊन वाढविण्यात आला. आता चौथ्यांदा वाढवून येत्या ३१ मेपर्यंत संपूर्ण देशातील दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रभाव किंवा लागण कमी आहे, तेथे थोडी सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तू मिळाव्यात म्हणून वाहतुकीत सूट दिली आहे. हे सर्व माणसाला तात्पुरते जगण्याला लागणाऱ्या वस्तूंसाठी आहे. तेवढ्यावर आता माणसाला जगता येत नाही. आर्थिक प्रश्नांची आणि व्यवस्थेची गुंतागुंत एवढी करून ठेवली आहे की, संपूर्ण समाजाचे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावेच लागणार आहेत.
लॉकडाऊन करून, दरवाजे बंद करून आत बसलो तरी समाजात पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही. तो कोठे ना कोठे समाजात राहणार आहे. भारतात लॉकडाऊनचा परिणाम खूप सकारात्मक झाला. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी आहे. त्यापैकी मृत्यूंचे प्रमाण कमी आहे, असे मानले जाते. ते सिद्ध मात्र झालेले नाही. आपण संसर्गित किती लोक आहोत, याचा नेमका अंदाज येत नाही, हेदेखील मान्य करावे लागेल. बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो हे नव्या पिढीला समजले गेले.
प्लेग किंवा इतर महामारीने माणसाच्या समोर मृत्यू उभे राहण्याचे दिवस संपले होते. आपणास अलीकडे याची गंधवार्ताही नव्हती. ती आता कोरोनामुळे कानावर आली आहे. समाज समूहाने राहताना सार्वजनिक आरोग्यासाठी अद्याप किती काम करावे लागणार आहे. अन्न प्रत्येकास मिळावे; पण ते सुरक्षितही असावे आदी धडेपण शिकविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा उगम कसा आणि कुठून झाला, याचा अद्याप शोध लागला नसला तरी अनेक गोष्टी शिकवून गेला आहे. यासाठी लॉकडाऊनमध्ये राहून सर्व मानवजातीच्या सुरक्षेचा विचार करण्याची ही एक संधी चालून आली आहे. अद्याप विषाणूचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी झालेलो नाही आहोत. त्यामुळे चौथा टप्पाही यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी थोडे कष्ट पडले, तरी ते स्वीकारावे लागतील.