ज्वालामुखीच्या स्फोटाने सर्व होरपळून जावे, तसे भारत कोरोनाच्या विस्फोटात जळतो आहे. मन की बात करणारे काही बोलत नाहीत, राज्यांच्या कारभाऱ्यांवर सर्व काही ओझे टाकून, मोरांना खाऊ घालत बसले आहेत. उद्योग, व्यापार, दळणवळण, सर्व काही ठप्प झाले आहे. लोकसहभागातून काही तरी केले जाईल, प्रत्येक राज्याला मदत, मार्गदर्शन आणि तज्ज्ञांकडून पाठबळ दिले जाईल, असे वाटले होते. मात्र, त्यापैकी काहीच होताना दिसत नाही.
परवा-शनिवारी चोवीस तासांत अर्थात एका दिवसात देशातील बाधितांची संख्या ९० हजार ६३३ झाली आहे आणि एकूण आकडा ४१ लाखांच्या वर गेला आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत दररोजच्या बाधितांची संख्या एक लाखाच्या वर जाईल. तसे मृत्यूचे तांडव वाढत जाईल. भारतातील राज्यांपैकी महाराष्ट्रात हे थैमान अधिक वेगाने पसरते आहे. धोरणातील धरसोडपणा नडला आहे. नेमक्या कोणत्या दिशेने जायचे, हेच राज्याच्या मंत्रिमंडळाला समजत नाही. मुख्यमंत्री लॉकडाऊन उठवायला नको, या मताचे होते. अजित पवार आणि त्यांच्या सहकारी मित्रांना उद्योग-व्यापार करणाऱ्यांचा पुळका आहे. लॉकडाऊन शिथिल करून टाकला.
लोकांच्या हालचालीवरील निर्बंध कमी केले. व्हायचा तो परिणाम झाला. गैरशिस्तीने वागण्यात ‘जगात भारी’ अशी बिरुदावली मिरविणारे आम्ही भारतीय सुसाट वेगाने फिरायला लागलो. कोरोनाची पेरणीच समाजात करून टाकली. उत्तम पाऊस होत असल्याने जोमानेच पिके येणार, तसे झाले. कोरोना संसर्गाबाबत जागतिक पातळीवर भारत स्पर्धा करू लागला. एक-दोन आठवड्यांत कोरोनामध्ये आपण महासत्ता बनू. आपले हे कर्तव्य आहे. वास्तविक हा आणीबाणीचा काळ आहे. गरिबांची तर होरपळ झाली. व्यापार-उद्योग करणारे अडचणीत आले. इतका सारा तोटा सहन करून देशाला (जीडीपी) सकलअंतर्गत उत्पादनात उणे तेवीसपर्यंत खाली आणण्याचा विक्रम केला. इतकी किंमत मोजूनही आपण आज सुरक्षित आहोत का? सरकारी आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. तरी युद्धाच्या तयारीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी, आमदार-खासदारांनी पाय रोवून अधिकाºयांच्या मागे उभे राहून व्यवस्था उभी करायला हवी होती. काही कारण नसताना आठवड्यातील दोन-चार दिवस जिल्ह्यातून मुंबईला जा-ये करण्यात दिवस वाया घालवीत असतात.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा करता येते. ही यंत्रणा उभी करण्यासाठीची आर्थिक तरतूद, त्यातील वाटा ठरविण्यासाठी मुंबईच्या वाºया मारताय का? असा उद्विग्नपणे प्रश्न विचारावा असे वाटते. कोरोनाच्या संकटात मानवजातीला वाचविण्याच्या लोकलढ्यात देखील संधी मिळेल तेथे हात मारावा, असे वाटते; किती संवेदनहीनता आहे. आरोग्य क्षेत्रातील खासगी क्षेत्राविषयी तर न बोललेले बरे! कोरोनाबाधित रुग्ण दारी येताच, यांची तोची दिवाळी-दसरा! दोन-चार लाख रुपये खर्च करण्याची तयारी असणारा रुग्ण आला असेल, तरच ‘बेड उपलब्ध आहे’ हे उत्तर मिळते. पैसे भरले तरच दरवाजा उघडला जातो.
संसर्गजन्य आजार असल्याने कोणते उपचार आत चालू आहेत आणि आरोग्याचा बाजार कसा मांडला आहे, हे नातेवाइकांना कळण्याचा किंवा सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘पैसे भरा’ एवढा निरोप देण्यासाठीच नातेवाइकास जवळ केले जाते. या क्षेत्रात अतिउच्च शिक्षित क्षेत्रातील हे भारतीय माणसांचे समाजमन आहे. ते कसे समाजाला ओरबाडत आहे, पाहा ! पुण्यात एका माजी महापौरास उपचार वेळेवर न मिळाल्याने जीव गमवावा लागला. पुण्यात एरवीही मरण पावणाºयांवर मोफत अंत्यसंस्काराची सोय करण्याचे धोरण याच माजी महापौरांनी अंमलात आणले. त्याच माजी महापौराचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी एका स्मशानभूमीतून दुसºया स्मशानभूमीत फिरत होता. त्याला जागा मिळत नव्हती. सध्या अनलॉक-४ सुरू आहे. बºयापैकी मोकळीक मिळाली आहे. जिल्हाबंदी उठली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाखाली आलेला नसतानाच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, रोजगार उपलब्ध होण्यासाठी म्हणून ही शिथिलता देण्यात आली आहे. त्यासाठी कोरोनाला रोखणारे मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर, आदी सुरक्षेच्या अटी कायम ठेवण्यात आल्या आहेत.
कागदोपत्री हे सर्व छान वाटत असले तरी ‘पण लक्षात कोण घेतो’ म्हणण्यासारखी अवस्था शहरी भागांमध्ये दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणी मास्क न वापरल्यास २०० रुपयांचा दंड करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. काही प्रमाणात कारवाईही केली जात आहे. मात्र, कारवाईपेक्षा स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. ती शंभर टक्के पाळली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. हातावरचे पोट असणाºयांना दररोज रोजगाराला बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही. शिवाय लक्षणे नसलेले अनेक लोक पॉझिटिव्ह आढळत असल्याने कोरोनाचे अहवाल किती खरे ? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यामुळे मला काय होतयं, ही भावनाही वाढू लागली आहे. परिणामी, महाराष्ट्रात दररोज २० हजाराच्या आसपास लोक बाधित होत आहेत. त्यांच्या संपर्कात येणाºया प्रत्येकी वीस म्हणजे चार लाखजणांचा शोध (ट्रेसिंग) घ्यावा लागतो. त्याला इतकी मोठी यंत्रणा उभी करावी लागते.
सरकारी खर्चाने का असेना, निवडणुकीत घर अन् घर पिंंजून काढले जाते तशी कार्यकर्त्यांची फौज शासकीय कर्मचाºयांच्या मदतीला का उभी करीत नाही. राजकारण होईल, निवडणुका येतील-जातील. मात्र, अशा आणीबाणीच्या काळात अधिकाºयांना प्रचंड बळ दिले पाहिजे. जनतेनेही शहाण्यासारखे वागले पाहिजे. पृथ्वी कोठेही पळून जाणार नाही. आपण जगलो, तर जळालेला जपान राखेतून उभा राहिला तसा भारत उभा करता येईल. यासाठी कोरोनाचा हा ज्वालामुखी गाडायलाच हवा!
एक-दोन आठवड्यांत कोरोनामध्ये आपण महासत्ता बनू. कोरोना काळात गरिबांची होरपळ झाली. व्यापार-उद्योग करणारे अडचणीत आले. इतका सारा तोटा सहन करून देशाचा जीडीपी उणे तेवीसपर्यंत खाली आणण्याचा विक्रम आम्ही केला. इतकी किंमत मोजूनही आपण आज सुरक्षित आहोत का?