- सचिन जवळकोटे, निवासी संपादक, सोलापूरसध्या ‘रामराव’ची स्टोरी सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. आयुष्यभर घरात दरारा अन् मान असणारे रामराव जेव्हा तापाने फणफणतात, जोरात खोकू लागतात, तेव्हा त्यांच्या पत्नीसह घरातील मुलेबाळेही त्यांच्याशी किती विचित्र पद्धतीने फटकून वागतात, हे या कथेत अत्यंत परखडपणे मांडले गेले आहे. मोती नावाचा कुत्रा सोडला, तर कोणीच त्यांच्यासोबत दवाखान्यात येत नाही; मात्र, १४ दिवसांनंतर ‘निगेटिव्ह रिपोर्ट’ घेऊन रामराव दवाखान्यातून बाहेर पडतात, तेव्हा ते शरीरानं ठणठणीत असले, तरी मनाने पूर्णपणे खचलेले असतात. एकवेळ कोरोना झाला असता, तरी सहन केला असता; परंतु आपल्याच माणसांनी संशयातून निर्माण केलेला हेटाळणीचा जो भयानक आजार पसरविला, तो त्यांना सहन होत नाही. म्हणूनच घरची मंडळी आता मोठ्या गाडीत घेण्यासाठी येत असतानाही ते उलट पावली चालत अनोळखी वाट धरतात, कधीही घरी न परतण्यासाठी.सोशल मीडियावरची ही पोस्ट कदाचित काल्पनिक असेलही. मात्र, सध्या गावोगावी असे कैक ‘रामराव’ संशयाच्या रोगाने बाधित झाले आहेत. नजरेतल्या द्वेषापासून ते वाळीत टाकण्याच्या भाषेपर्यंत अनेक कटू प्रसंगांना ते सामोरे जाऊ लागले आहेत. ‘कोरोना’ची भीती गावागावांत इतकी खोलवर रुजली आहे की, नेहमीप्रमाणे शेजारच्या घरातून येणारी भाजीची वाटीही आता विषाची वाटू लागली आहे. पूर्वी विरजणासाठी दही मागणारी शेजारीणदेखील आता उंबरा ओलांडून बाहेर पडेनाशी झाली. माणसेच माणसाला परकी झाली. माणुसकीची भावनाच पोरकी झाली.
‘संसर्ग’ नको म्हणून केवळ ‘संपर्क’ कमी करा, एवढीच या रोगावर मात करण्याची अचूक मात्रा लागू झालेली. मात्र, एकमेकांमधला ‘संवाद’ तोडून टाकण्याची घातक प्रक्रिया सुरू झाली. ज्या तरुण पिढीने आपल्या गावचे नाव पुण्या-मुंबईत जाऊन मोठे केले, तीच आता पुन्हा गावात आली म्हटल्यावर उलट त्यांचा दुस्वास केला गेला. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर विनाकारण संशय व्यक्त झाला. ज्यांनी कधीकाळी गावातील पडिक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पैसे पाठविले, त्यांनाच आता गावची वेस पूर्णपणे बंद झाली. रस्त्यावर काटे-कुटे अन् दगडं-लाकडं टाकून त्यांचा प्रवेश रोखला गेला. अनेकांना त्यांच्या घरच्यांवर दबाव आणून गावाबाहेर काढले गेले. केवळ ‘बाहेरून आलेला’ या भीतीपोटी गावातूनच बहिष्कृत करण्याचा अन् समाजातून वाळीत टाकण्याचा नवा पायंडा कैक ठिकाणी पाडला गेला.केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी परिसरातही असाच विचित्र प्रकार दिसून आला. ज्या पेठेत एखादा इसम ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळून आला त्या टापूतही आपापले छोटे-मोठे रस्ते स्थानिक लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेत. शेजारच्या गल्लीबोळातील रहिवाशांनाही जाण्या-येण्यासाठी प्रवेश रोखला गेला. हाती मिळेल त्या वस्तू म्हणजे टायर, भंगारातील मोडके-तोडके इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, बांबू अन् फाटकी पोती यांचा यासाठी वापर करण्यात आला.‘हातावर क्वारंटाईनचा शिक्का म्हणजे तो शंभर टक्के कोरोना रुग्णच,’ असाही भ्रम गावागावांमध्ये पसरला. संशयाचे पिशाच्य विनाकारण बागुलबुवा निर्माण करू लागले. या रोगाशी लढा देण्यासाठी खंबीरपणे साऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून-सांगून प्रशासनही हतबल झाले; त्यामुळे खरा रुग्णही घाबरून दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. तपासणीसाठी दारापर्यंत आलेल्या सरकारी टीमसमोर तोंडही चुकविले जाऊ लागले. त्यामुळेच की काय, अनेक ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच तो बाधित रुग्ण होता, हे उघडकीस येऊ लागले.कदाचित, या रुग्णांनी ‘समाजाला काय वाटेल?’ ही भीती डोक्यात न ठेवता थेट दवाखान्यात धाव घेतली असती, तर कदाचित हा आजार मृत्यूपर्यंतही गेलानसता. त्यांच्या संपर्कात आलेले इतरही आता आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल झाले नसते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, एकीकडे ‘कोरोनाचा शारीरिक हल्ला’ परतवून लावत असतानाच दुसरीकडे ‘समाजाचा मानसिक आघात’ सहन करण्याची वेळ कृपया कोणावरही आणून देऊ नका.