संपूर्ण जगाला घाबरवून सोडलेल्या कोरोना या विषाणूवरील विनोद, व्यंगचित्रे, मीम समामजमाध्यमांवरून पुढे ढकलण्यात बहुतांश भारतीय मग्न असतानाच, महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरे ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. याचा अर्थ या शहरांमध्ये आता जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होतील.कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या आजारावर अद्यापही औषध अथवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे हाच सध्याच्या घडीला त्यावरील उपाय आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत; परंतु दुर्दैवाने चीन व इटलीमधील परिस्थिती समोर दिसत असतानाही, बहुतांश नागरिक पुरेसे गंभीर नाहीत. विलगीकरण (क्वारंटीन), एकमेकांपासून अंतर राखणे (सोशल डिस्टन्सिंग), सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याकडे दुर्लक्ष करण्याकडेच बहुतांश नागरिकांचा कल आहे.भारतात कोरोनाचे सर्वाधिक बाधित व संशयित रुग्ण महाराष्ट्रातच असून, हा आकडा दिवसागणिक वाढतच जात आहे. जगभरातील अनुभव लक्षात घेता कोरोनाच्या रुग्णांमध्ये घातांकी वाढ (एक्पोनेन्शिअल ग्रोथ) होत आहे. घातांकी वाढ याचा अर्थ एकास बाधा झाल्यास त्यापासून आणखी तिघांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. तसे झाल्यास परिस्थिती फार गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही महानगरे आणि यवतमाळ व अहमदनगरसारखी छोटी शहरे यापुरताच मर्यादित आहे. बहुधा त्यामुळेच इतर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिक कोरोनासंदर्भात पुरेसे गंभीर दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर, परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केल्यास, राज्याच्या छोट्या शहरांमधील आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा स्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहे का, याचा विचार होणे गरजेचे आहे.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्याच्या ग्रामीण भागात होण्याची शक्यता कमी आहे; मात्र ती मोडीतही काढता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनाशी लढा देण्याचा सर्वोत्तम उपाय आहे; मात्र आपल्या देशात अनेकांचे हातावर पोट आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपण प्रत्येकाकडून घरात बसून राहण्याची अपेक्षा करू शकत नाही. मजुरी करून स्वत:चे व कुटुंबाचे पोट भरणाऱ्यांना घराबाहेर पडावेच लागणार आहे आणि त्यामुळे त्यांचा इतर लोकांशी संपर्क होणारच आहे!मार्च महिना संपल्यावर शेतीची बहुतांश कामे संपलेली असतात आणि त्यामुळे दुष्काळी भागातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधार्थ मोठ्या शहरांची वाट धरतात. या लोकांना केवळ आवाहन करून घरी बसविणे शक्य नाही. सरकारने त्यांच्या उत्पन्नाएवढी रक्कम उपलब्ध करून देणे हा एक मार्ग असू शकतो; मात्र त्यासाठी सरकारी खजिन्यात तर पैसा असायला हवा ना?सरकारने येनकेनप्रकारेन ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यात यश मिळवले तरी, रोजगार अथवा शिक्षणासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या जे युवक ‘लॉकडाऊन’मुळे गावाकडे परतणार आहेत, त्यांना कसे थांबवणार? या उलट्या स्थलांतरामुळेही विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहेच ना?आपल्या देशात रुग्णालयांमधील खाटांची संख्या आवश्यकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीने उग्र रूप धारण केल्यास खाटांचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. सरकारने आपत्कालीन स्थितीत खासगी रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेतो म्हटले तरी परिस्थिती आटोक्यात येऊ शकणार नाही. पुन्हा माहिती आणि ज्ञानाच्या अभावी नागरिकच विरोधासाठी पुढे येतात, हा ताजा अनुभव आहे. अनेक शहरांमध्ये विलगीकरण कक्षासाठी जागांचा शोध सुरू झाला तेव्हा त्या भागांमधील नागरिकांनी त्यांच्या वस्तीत कक्ष नको म्हणून विरोध केला, ही वस्तुस्थिती आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच, तर राज्यातील परीक्षण प्रयोगशाळांची अल्प संख्या हा आणखी एक मोठा अडथळा सिद्ध होणार आहे. राज्य सरकारने आणखी काही प्रयोगशाळा सुरू करण्याचा आदेश दिला आहे; मात्र बाधितांच्या संख्येत घातांकी वाढ झाल्यास नव्याने सुरू होऊ घातलेल्या प्रयोगशाळाही कमीच पडणार आहेत. प्रत्येक संशयिताच्या नमुन्यांचे परीक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना परीक्षणांच्या संदर्भात दक्षिण कोरियाचा दर खूप जास्त असल्यामुळे त्या देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे, तर इटलीमध्ये दक्षिण कोरियाच्या तुलनेत खूप कमी परीक्षणे झाल्याने त्या देशातील मृत्यू दर खूप जास्त आहे. परीक्षणांच्या बाबतीत भारत तर इटलीच्या तुलनेतही कुठेच नाही. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव समुदाय प्रसार म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहचल्यास, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने हा धोका ओळखून तातडीने उपाययोजना आखण्याची नितांत आवश्यकता आहे.- रवी टाले ravi.tale@lokmat.com
CoronaVirus : खरा धोका पुढेच!
By रवी टाले | Published: March 21, 2020 4:10 PM
कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहचल्यास, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या रुग्णांमध्ये घातांकी वाढ (एक्पोनेन्शिअल ग्रोथ) होत आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिक कोरोनासंदर्भात पुरेसे गंभीर दिसत नाहीत.आपल्या देशात रुग्णालयांमधील खाटांची संख्या आवश्यकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे.