कोरोनाच्या संसगार्मुळे जगातील गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध असा प्रत्येक जण सध्या अतिशय चिंतेत आहे. घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. घरात बसून काय करावे हे सुचेनासे झाले आहे. दिवसाचे दहा-बारा तास कसे घालवायचे हा मोठा प्रश्न आहे.
रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले लाखो लोक आपण कधी आणि कसे घरी पोहोचणार या विवंचनेत आहेत. घरातील मंडळी त्यांची वाट पाहत आहेत. वृत्तपत्रेही काही दिवस बंद होती. त्यामुळे सोशल मीडियावरून पसरणाऱ्या बातम्या खºया की खोट्या हेही कळत नव्हते. आता काही ठिकाणी वृत्तपत्रे मिळू लागली आहेत, बातम्या नीट कळू लागल्या आहेत. वृत्तपत्र वाचनात किमान थोडाफार वेळ तरी जाऊ लागला आहे. अनेकांच्या दृष्टीने हा विरंगुळाच आहे.
माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा याखेरीज आयुष्यात करमणूकही लागते. शिवाय माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे अरिस्टॉटलने म्हटले आहे ते किती योग्य आहे हे आता सर्वांनाच जाणवू लागले आहे. त्याला सतत एकमेकांना भेटावेसे वाटते, गप्पा माराव्याशा वाटतात आणि मनोरंजनाशिवाय त्याचे आयुष्य शुष्क होते. मानसोपचार तज्ज्ञ सामान्यांच्या या स्थितीबद्दल चिंतीत आहेत. अशा एकाकी अवस्थेमुळे वा सतत तणाव व अस्वस्थ राहण्याने मानसिक आणि शारीरिक आजारांची शक्यता असते. या आजारांपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी व्यायाम हा एक उपाय आहे. घरात बसून आणि काही काम न केल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम हवाच; पण पुरेसा नाही.
माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याला करमणूक लागतेच. ती करमणूक तो चित्रपटांमधून मिळवतो, टीव्हीवरील मालिका आणि अन्य कार्यक्रमांमधून मिळवतो. त्याला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी अशा खेळांमधूनही त्याचे मनोरंजन होते. अनेकांसाठी चार वर्षांनी येणारे आॅलिम्पिक ही मोठीच पर्वणी असते. नोकरदार वा व्यापार, उद्योगांमध्ये असणारे किंवा मोलमजुरी करणारे यांचा वेळ रोज कामात जातो. सुट्टीच्या दिवशी टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट, खेळांचे सामने असे वेगळे काही त्याला हवेच असते. भारतातील लाखो वा काही कोटी लोक गेले दहा-पंधरा दिवस घरी आहेत. एवढी मोठी सुट्टी असूनही कुटुंबीयांसमवेत त्यांना बाहेरगावी फिरायला जाणे तर सोडाच, पण चित्रपट पाहायला जाणेही शक्य नाही. एकही नवा चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही, चित्रपटांचे चित्रीकरण बंद आहे. तीच स्थिती टीव्ही मालिकांची. त्यामुळे जुन्याच रटाळ मालिका पुन्हा पुन्हा दाखविल्या जात आहेत. अशा काळात जुन्या विनोदी आणि लोकांचा तणाव दूर करतील अशा मालिका वा चित्रपट दाखवल्यास तणाव काहीसा कमी होईल.
केंद्र सरकारने रामायण, महाभारत आणि चाणक्य या एकेकाळी गाजलेल्या मालिका पुन्हा दाखवा, असे दूरदर्शनला सांगितले; पण नव्या पिढीला त्या आवडतील का, हा विचार केल्याचे दिसत नाही. कोरोना संसर्गाच्या शक्यतेने आयपीएल सामने पुढे ढकलले आहेत, आॅलिम्पिकही आता होणार नाही आणि विम्बल्डनही पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे टीव्हीवर क्रीडाविषयी शुकशुकाटच आहे. परीक्षा पूर्ण न होताच शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. आठवीपर्यंतची मुले पुढील वर्गात आपोआप जातील; पण या सुट्टीत काय करायचे हा त्यांच्या आणि पालकांपुढील प्रश्न आहे. खेळायला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अनेक मुलांना मोबाईल गेमची सवय वा व्यसन लागायची भीती आहे. ते होता कामा नये. अन्यथा कोरोनातून बाहेर पडल्यानंतर मुलांची ही सवय त्रासदायक ठरेल. त्यामुळे लहान मुलांसाठी मोगली वा तशा मालिका दाखवायला हव्यात. ये जो है जिंदगी, हम पांच, आदी मालिकाही लोक आनंदाने पाहतील; पण तसे घडताना दिसत नाही.
मुळात कोट्यवधी लोकांना घरांत बसणे भाग असताना त्यांचा तणावाविना वेळ कसा जाईल हे पाहणेही प्रशासनाची जबाबदारी आहे. तसे न झाल्यास तणाव आणि घरांत वाद वाढू शकतात, याचाही विचार व्हावा. चीनमध्ये तसे घडले आहे. भारतात ते घडणार नाही; पण सरकारी पातळीवरही याचा विचार व्हायला हवा. कोरोनाचा संसर्ग काही काळाने थांबेलच. त्यावेळी अनेक नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात आर्थिक व रोजगाराचे प्रश्न असतीलच; पण सर्व भारतीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे असेल. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे अगदी किरकोळ वाटणाºया या बाबींचाही विचार प्रत्येकाने करायला हवा.
कोरोनाचा संसर्ग काही काळाने थांबेलच. त्यावेळी अनेक नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात आर्थिक व रोजगाराचे प्रश्न असतीलच; पण सर्व भारतीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे असेल याचाही विचार करायला हवा.