- विकास झाडे, संपादक, लोकमत, दिल्लीदिल्लीला हस्तिनापूरची बाधा झालेली आहे. त्यामुळे इथे अनेकांची मती भ्रष्ट होते. सामाजिक कार्याचा डमरू वाजवून सामान्य लोकांची मने जिंकत राजकारण करणाऱ्या नेत्यांचे हे शहर आहे. दिल्लीत कामापेक्षा अभिनयाला अधिक महत्त्व आहे. जेवढा चांगला अभिनय तेवढे इथे डोक्यावर धरले जाते. यात निपुण असलेल्या नेत्यांच्या हाती देशाची सूत्रे येतात. लोकही अभिनय सम्राटाच्या हाती सत्ता सोपवितात व नंतर कपाळावर हात मारून घेतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यापासून वेगळे नाहीत.सामाजिक आंदोलनातून नावारूपास आलेल्या केजरीवालांनी दिल्लीच्या राजकारणात मजबूत पाय रोवले आहेत. अभिनय कौशल्यास कामाची जोड देत ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ‘वीज, पाणी, शिक्षण’ या त्यांच्या कामांवर भाळत लोकांनी त्यांना भरघोस मते दिलीत; परंतु सुरुवातीच्या पाच वर्षांत दिल्लीकरांनी अनुभवलेले केजरीवाल आता दिसत नाहीत. देशाचे भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आता लोकांची मते बदलत असतील, तर केजरीवालांच्या राजकीय कालखंडाच्या उत्तरार्धास सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. अनुभवातून माणूस परिपक्व होतो आणि त्यानुसार तो बदल घडवीत असतो. किंबहुना तसा बदल करणे ही वर्तमानाची गरज असते; परंतु अलीकडे केजरीवालांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. त्यांना ‘फेकू विषाणू’ची बाधा झाली असे वाटते. ‘फेकू विषाणू’ कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला नाही. २०१४ मध्ये तमाम भारतीयांनी याचा अनुभव घेतला. त्यातूनच याचा शोध लागला. या विषाणूचे सर्वाधिकार एका प्रभावशाली नेत्याकडे असले तरी त्याची बाधा अन्य राजकीय नेत्यांनाही होत गेली. फक्त फेकत राहायचे आणि वास्तवतेला चिरडून टाकायचे, हा या विषाणूचा धर्म आहे. गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ ची स्थिती दिल्ली सरकारच्या आवाक्याबाहेर गेली आहे. याला थोपविणे कठीण आहे असे लक्षात येताच केजरीवालांनी ‘फेकू’ पॅटर्न स्वीकारला. लोकांना सत्य न सांगता केवळ स्वप्ररंजन केले. महिनाभरात मुंबईलाही मागे टाकेल असे दिल्लीतील चित्र आहे.मार्चमध्ये टाळेबंदी लागली तेव्हा दिल्लीत केवळ ३० रुग्ण होते. त्यातील बहुतांश विदेशातून आले होते. केवळ एकाचा मृत्यू झाला होता. आज ८६ दिवस झालेत. या काळात मृत्यूचा आकडा दोन हजारांपर्यंत पोहोचला आहे आणि कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर गेली.डॉ. महेश वर्मा समितीने दिलेल्या अहवालानुसार, जुलै अखेरपर्यंत दिल्लीत रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती देत दिल्लीकरांच्या मनातील कोरोनाची भीती अधिक गडद केली आहे. समूहामध्ये विषाणू पसरत असल्याचे केजरीवालांचे विधान तथ्यहीन असल्याचा खुलासा आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेला करावा लागला. यातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. दिल्लीत एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना केजरीवाल सरकारने उभारलेली यंत्रणा अत्यंत खुजी ठरली. कोविड-१९ ला समर्पित रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली. त्यासाठी ‘अॅप’ सुरूकेले. कुठल्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, किती व्हेंटिलेटर आहेत याबाबत माहिती देणाºया अॅपचा मात्र बोजवारा उडाला. रिक्त खाटा दाखविण्यात आलेले रुग्णालय पूर्ण भरलेले आहे. रुग्णांना प्रवेश मिळत नाही. उपाचारांअभावी रुग्ण मरत आहेत. हा अनुभव केवळ सामान्य लोकांनाच नाही तर संक्रमित वरिष्ठ अधिकाºयांनाही आला आहे. दिल्ली सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाला यासंदर्भात दररोज शेकडो टिष्ट्वट जातात; परंतु त्याची दखलही घेतल्या जात नाही.विषाणूचा प्रकोप असतानाही बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची वासना जागी झालेल्या मोदी सरकारला केजरीवालांना सहकार्य करण्याची इच्छा नाही. शिवाय भाजपचे राज्य असलेल्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील रुग्णांचे लोंढे कोरोनाच्या उपचारांसाठी दिल्लीत येत आहेत. त्यांना थोपविण्यासाठी दिल्लीतील कोरोना रुग्णांवरच इथे उपचार करण्याचे केजरीवाल जाहीर करतात तेव्हा भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडतात. नायब राज्यपाल कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाला रद्द करतात. केजरीवाल आता एकाकी पडले आहेत आणि आकडेवारीच्या चक्रव्यूहात ते स्वत:च अडकले आहेत. दुसरीकडे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, आमदार आतिशी, आदी नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीत एकही वस्ती आणि सरकारी कार्यालय असे नाही जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. केंद्र सरकारच्या आरोग्यसेतू अॅपमध्ये प्रत्येक एक कि.मी. परिसरात रुग्ण असल्याचा रेड अलर्ट दाखविला जातो. उपचाराची सोयच नसल्याने ७८ टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. त्यांची सुश्रुषा करणारी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उपचार देऊ शकलो नाही किमान मृतदेहाची वेळीच विल्हेवाट लागावी म्हणून यमुनेच्या काठावर मोठ्या प्रमाणात शवदहनाची व्यवस्था प्रशासन करीत आहे, इतकी भयावही स्थिती दिल्लीची आहे.
CoronaVirus News: दिल्लीत कोरोनाचे तांडव; केजरीवालांचे प्रयत्न खुजे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 5:23 AM