शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

CoronaVirus : आपल्या आणि इतरांच्याही जिवाची काळजी घ्या!

By विजय दर्डा | Published: February 22, 2021 2:11 AM

...आता वेळ आली आहे बेजबाबदारीने वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि खुल्या बाजारात लस उपलब्ध करून देण्याची!

-  विजय दर्डा 

हे वर्ष उजाडताना वाटत होते, कोरोनाची सद्दी संपायला लागली आहे. संसर्गग्रस्तांची संख्या आणि मृतांचे प्रमाणही घटत होते. फेब्रुवारीच्या मध्यावर देशाच्या काही भागांतून कोरोना पुन्हा पसरू लागल्याचे वृत्त येऊन थडकले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राच्या अमरावती, वर्धा, यवतमाळ, मुंबईचे काही भाग, पुणे, अकोला आणि नागपूर जिल्ह्यातली स्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. लोकांचे बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनच परिस्थिती चिघळण्यामागचे एकमेव कारण आहे.

महाराष्ट्रात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर लग्नसमारंभ दणक्यात पार पडले. या समारंभात सहभागी झालेल्या हजारो लोकांनी कसलीही काळजी घेतली नाही. ना मास्क लावले, ना सॅनिटायझरचा योग्य तो वापर केला. हे समारंभ दणक्यात साजरे झाले. जणू कोरोना नावाचे काही असलेच तर ते कधीचे संपून गेले आहे, असाच सगळ्यांचा तोरा होता. छोटेखानी सभागृहात पाच-सहाशे लोकांचे गट जमले. ही सारी लग्नेच दुर्दैवाने कोरोनाच्या फैलावाला खतपाणी घालणारी ठरली.

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सरकारी अधिकारी, यंत्रणा, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, पोलीस आदींनी  प्राणांची बाजी लावून  साथीच्या फैलावावर काबू मिळवला आणि हे सारे कोरोनायोद्धे म्हणून सन्मानित केले गेले. या सर्व योद्ध्यांनी केलेली मेहनत समाजातल्या बेजबाबदार लोकांनीच मातीत मिळवली, असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे.  नव्याने घोंघावणाऱ्या कोरोनाच्या संकटासाठी लग्नसमारंभाचे आयोजक तर जबाबदार आहेतच; पण नियमांकडे डोळेझाक करणारी हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि काही प्रमाणात हे सारे होऊ देणारी यंत्रणाही जबाबदार आहे. या सगळ्यांच्या हातमिळवणीशिवाय हे होऊ शकले नसतेच.

बाजारपेठांतूनही सर्वत्र बेजबाबदारीचेच राज्य दिसते आहे. लोक नावापुरते मास्क लावताहेत. प्रत्यक्षात तो मास्क हनुवटीखाली लटकलेला असतो. नाक-तोंड पूर्णत: उघडे असते. कोरोनाच्या फैलावासाठी अत्यंत अनुकूल अशी ही स्थिती. या गर्दीतल्या एखाद्या व्यक्तीला जर संसर्ग झालेला असला तर तो कितीजणांपर्यंत पोहोचेल, काही सांगता येत नाही. कोरोनाच्या या लाटेत आपण आपल्या प्रिय व्यक्तींना गमावून बसलो आहोत, याचा विसर तरी कसा पडू शकतो?

बाजारपेठेवर अनेकांची रोजीरोटी अवलंबून असते. त्यासाठी या बाजारपेठा पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. पण आपण स्वत:वर काही निर्बंध लादून घेतले नाहीत तर कोरोनापासून वाचणार  कसे? कोरोना असाच अनिर्बंध फैलावत राहिला तर त्याचा  परिणाम  अर्थव्यवस्थेवर होईल. महत्प्रयासांनी आपण कठोर लॉकडाऊनमधून बाहेर आलो आहोत. आत्ता कुठे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते आहे.  पुन्हा कोरोनाचा आतंक माजला तर केवळ संसर्ग झालेल्यांनाच क्षती पोहोचेल असे नव्हे, तर इतर लोकही बरबाद होतील.

पुन्हा लॉकडाऊन वा संचारबंदी लावण्याची वेळ आली तर आपले काही खरे नाही. सर्वसामान्यांसह व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक इतके धास्तावलेत की पुन्हा व्यवहार ठप्प होण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांना कापरे भरते. शाळांची परिस्थिती भयावह आहे. वर्गच सुरू झाले नाहीत तर विद्यार्थ्यांकडून फी कशी घेणार, आणि फीचे पैसे आले नाहीत तर शिक्षकांचे पगार कुठून करणार हे कोडे अजूनही शाळांना सोडवता आलेले नाही. काही लोकांना याची फिकीरही नसावी, हे दुर्दैव. त्यांना आपल्या जिवाची भ्रांत तर नाहीच; पण इतरांचेही काही वाटत नाही. हे लोक समाजद्रोही आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई अत्यावश्यक आहे.

सरकारने लसीकरण मोहीम अधिक गतिमान करायला हवी. सध्या केवळ आघाडीवरल्या कोरोनायोद्ध्यांनाच लस टोचली जात आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक व्यक्तींना लस टोचण्यात आलीय. हीच गती कायम राहिली तर तमाम गरजवंतांचे लसीकरण होईपर्यंत खूप काळ जाईल. पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींची पाळी मार्च महिन्याच्या मध्यावर येईल, असे सांगण्यात येते. आपल्याकडे जर दहा कोटी लसींचा साठा असेल आणि सीरम इन्स्टिट्यूट व बायोटेक पूर्ण क्षमतेनिशी लसीचे उत्पादन करत असतील तर लसीकरणाची मोहीम गतिमान करण्यास काय हरकत आहे? पन्नाशी ओलांडलेल्यांच्या लसीकरणासाठी इतका विलंब या तंत्रयुगात  अनाकलनीय आहे.

तामिळनाडू राज्यात कोरोना लसीकरणासाठी पत्रकारांना अग्रक्रम देण्यात आला आहे, ही गोष्ट इथे मुद्दाम नमूद केली पाहिजे. जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निभावणारे पत्रकारही एका अर्थाने कोरोनायोद्धेच आहेत. जर आपल्याकडे इतका मोठा साठा असेल तर मग लस खुल्या बाजारात का उपलब्ध होत नाही? खुल्या बाजारात म्हणजे औषधालयांत नव्हे तर खासगी क्षेत्रातल्या रुग्णालयांत!

आपल्याकडली खासगी रुग्णालयेही संसाधनांनी सुसज्ज आहेत आणि त्यांची मदत घेत लसीकरण मोहिमेला गती देणेही शक्य आहे. अशी गती मिळाली तर सरकारवरचा ताणही कमी होईल. ज्या लोकांची पैसा खर्च करण्याची ऐपत असेल ते खासगी रुग्णालयांत जातील आणि ज्यांची नसेल, ते सरकारी लसीकरण केंद्रांत जाऊन लस टोचून घेतील. लस खासगी रुग्णालयांतूनही उपलब्ध व्हावी आणि पूर्वनिर्धारित शुल्क आकारून या रुग्णालयांनी लसीकरण हाती घ्यावे, अशी इच्छा  जनसामान्यांतूनही व्यक्त होताना दिसते आहे.

भारताने अनेक व्याधींवर लसीकरण मोहिमेच्या मदतीने मात केलेली आहे. लसीकरणामुळेच भारतीयांची प्रतिकारशक्ती अमेरिकी आणि युरोपिअन नागरिकांपेक्षा सरस ठरली. आपल्यावरला कोरोनाचा प्रकोप तुलनेने कमी असण्यामागचे कारण ते हेच. लसीकरणाच्या बाबतीत आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत.

आपल्याकडे प्रचंड क्षमता आणि संसाधने आहेत. लसीकरणातून आपण निश्चितपणे कोरोनावर विजय मिळवू शकू याचा अर्थ आपण बचावासाठीच्या उपाययोजनेला तिलांजली द्यावी, असा नाही. बेफिकीर राहाण्याचा प्रमाद  महागात पडेल. आपल्या जिवाची काळजी घेतानाच आपण इतरांच्या आरोग्याशीही खेळू नये. योग्य प्रकारे मास्क घाला, सुरक्षित अंतर राखा. स्वस्थ राहा इतरही स्वस्थ राहातील यासाठी दक्षता घ्या !

(लेखक लोकमत समूह,  एडिटोरियल बोर्डाचे चेअरमेन आहेत)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार