वसंत भोसले-पहिल्यांदाच एका लोकप्रतिनिधीने योग्य मार्गाने दक्षिण महाराष्टÑाचे नियोजन करण्यावर वक्तव्य केले आहे. कृष्णा खोºयातील दक्षिण महाराष्टÑाला पुराचा झटका बसल्यावर राज्यसभा सदस्य संभाजीराजे यांनी सांगली दौºयात कोल्हापूर-सांगलीचा कॉरिडॉर करून विकासाचे नियोजन करायला हवे, असे म्हटले. ही भूमिका मी अनेक वर्षे मांडतो आहे. उद्योग, शेती, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यटन, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्र, आदी सर्वांसाठी दक्षिण महाराष्टÑाचा कॉरिडॉर बनवून विकासाचे नियोजन करायला हवे. त्यासाठी ज्या समस्या समोर येतात, त्यादेखील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांच्या समान आहेत. त्या यादीत सांगली आणि साताºयाच्या पूर्वभागातील दुष्काळी पट्ट्यातील समस्यांचा समावेश करा. कृष्णा खोºयात आवश्यक पाणी आहे, त्यामुळे हा दुष्काळ हटविणे अवघड नाही. त्यावर मात होऊ शकते.
खासदार संभाजीराजे अनेक विषयांवर स्वतंत्र मते व्यक्त करतात. ती योग्य असतात. मात्र, ती लावून धरत नाहीत. महापुराच्या निमित्ताने त्यांनी मांडलेली कॉरिडॉर तयार करण्याची योजना फार चांगली आहे. याउलट महाराष्टÑानेच ही संकल्पना स्वीकारली पाहिजे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईचा स्वतंत्र विचार करायला हवा. रायगड ते सिंधुदुर्गचे वेगळे नियोजन करता येते. नाशिकच्या गोदावरी नदी खोºयाचा एकत्रित विचार झाला पाहिजे. पश्चिम व पूर्व विदर्भाचा स्वतंत्र विचार व्हायला हवा. मराठवाडा गुंतागुंतीचा प्रदेश आहे. मात्र, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, आदी जिल्ह्यांना कृष्णा खोºयातील पाण्याची मदत घेता येईल. पुणे आणि परिसराचा स्वतंत्र विचार व्हायला हवा. कारण, पुणे परिसरातील शैक्षणिक व औद्योगिक विकासाने वेगळी उंची गाठली आहे. तसे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या विभागांचा सरळ संबंध कृष्णा नदीशी येतो. हा परिसर या नदीच्या खोºयात येतो. महाबळेश्वर, पाचगणी, वाईपासून सांगलीचा चांदोली परिसर ते कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड येथेपर्यंत कृष्णा खोºयातील एकत्रिकरणाचा विचार होऊ शकतो. महाबळेश्वर ते दाजीपूर हा संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगांचा पट्टा कृष्णा खोºयाचा उगमाचा आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड व सीमावर्ती भाग हासुद्धा कोल्हापूरशी जोडला असला तरी तो कर्नाटकमार्गे कृष्णा खोºयात येतो. दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, आदी नद्या कर्नाटकात जाऊन कृष्णेला मिळतात. याचा अर्थ महाबळेश्वर ते दाजीपूर या पट्ट्यात उगम पावणाºया चोवीस नद्यांचे पाणी एकमेकांना मिसळत नृसिंहवाडीच्या दत्ताच्या पायाशी येते. हा एक सुंदर प्रदेश, भौगोलिक रचना आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, म्हसवड, कोरेगाव, खटाव, आदी भाग व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, जत हादेखील कृष्णा खोºयाशी जोडला आहे. खानापूर तालुक्यात विट्याच्या पश्चिमेस उगम पावणारी येरळा नदी दक्षिणेकडे वाहत येऊन वसगडे आणि ब्रह्मनाळजवळ कृष्णेला मिळते. सांगली जिल्ह्याचा आटपाडी परिसर तेवढा सोलापूर जिल्ह्याकडे पूर्वेला तोंड करून उभा आहे, असे वाटते. माण तालुक्यातून येणारी माणगंगा नदी आटपाडीहून सांगोला तालुक्यातून भीमेला मिळते व पुढे कृष्णेचाच भाग बनते. आटपाडीत कृष्णेचे पाणी पोहोचले आहे. ते बारमाहीसुद्धा देता येऊ शकते. परिणामी, तो एक उत्तम शेती व पशुधन निर्माण करणारा तालुका होऊ शकतो. आटपाडीची डाळिंबे जगप्रसिद्ध करता येऊ शकतात. केवळ नियोजनाद्वारे कृष्णा खोºयातील पाणी नियमित पोहोचले पाहिजे.
कृष्णेच्या उगमापासून आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराने राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले महाराष्टÑाला दिले. शाहू महाराज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माणगावची परिषद, साताºयातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची लेखणी, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार, पावनखिंडची लढाई, औंधच्या पंतप्रतिनिधींचे दातृत्व अशा सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक घटनांचा हा भाग साक्षीदार आहे.
शिवरायांच्या घराण्यांचा वारसाही सातारा व कोल्हापूरला लाभला आहे. औद्योगिकरणाचा पाया, चित्रपट व्यवसायाची सुरुवात, सहकार चळवळीचे माहेरघर, श्वेतक्रांतीचा परिसर, शैक्षणिक कार्याचा उठाव मांडणारा प्रदेश, हळद, द्राक्षे, पानमळे, ऊस, भात, डाळिंबे, आले ते स्ट्रॉबेरी उत्पादनाला आपले करणारा हा रयतेचा परिसर आहे. यंत्रमाग ते आॅटोमोबाईल उद्योगाला पूरक असणारा प्रदेश आहे. चांदोली, कोयना आणि दाजीपूरची अभयारण्ये, असंख्य गडकिल्ले, कोकण, कर्नाटक व गोव्याला जोडणारा हा कृष्णेच्या खोºयाचा मार्ग आहे.
हा परिसर साऊथ कॉरिडॉर म्हणून स्वीकारला पाहिजे. तो पुणे-बंगलोर महामार्गाने जोडला आहे. दक्षिण-उत्तरेला मिरज जंक्शनने बांधले आहे. सह्याद्री आणि कोकणात जाणारे घाटरस्ते हेसुद्धा या परिसराला समृद्ध करणारे आहेत. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, साताºयाची रयत शिक्षण संस्था, सांगलीचे वालचंद महाविद्यालय, सांगली-मिरजेची वैद्यकीय नगरी, इचलकरंजीची वस्त्रनगरी, हुपरीची चांदीनगरी, गोकुळ दुधाचा ब्रॅँड, वारणेची लस्सी, चितळेचे दूध, भाकरवडी, भारती विद्यापीठ, विवेकानंद संस्था, अशी खूप मोठी यादी होईल. मुंबई, पुण्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल देणारा हा विभाग आहे, याचीही नोंद घ्यायला हवी.
यासाठी महापुराकडे संकट म्हणून पाहताना आपली शक्तिस्थळेही ओळखली पाहिजेत. ती न ओळखता आपल्या परिसराला जोडून घेणारा प्रस्ताव मांडला जात नाही. सर्वच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात ठरावीक कालावधीत पडलेला प्रचंड पाऊस व धरणांचा विसर्ग एकाचवेळी करावा लागला. त्याचा परिणाम पूर येण्यावर झाला. मात्र, त्याचे महापुराच्या प्रलयात रूपांतर होण्याचे कारण मानवनिर्मित आहे. त्यासाठी नद्यांच्या खोऱ्यांचा व भौगोलिक रचनांचा विचार एकत्रित करून विकासाचा कॉरिडॉर बनवायला हवा. त्यासाठी कृष्णेचा उगम झाला तेथून याची आखणी करायला हवी. कारण त्याच्याच बाजूला उगम पावणाºया कोयना नदीचे सर्वाधिक पाणी कृष्णा खोºयात येते. सर्वांत मोठे धरणही या खोºयातील कोयनेवरच आहे. कोयनेचे पाणीदेखील कोकणात सोडले आहे. त्याचाही फेरविचार करायला हवा. आज याच धरणाच्या पाण्यावर सांगलीपर्यंतची शेती, उद्योग आणि पिण्याचे पाणी मिळते. मिरजेला वारणा धरणाचे पाणी दिले जाते. इतका फरक एका शहरात आहे. मात्र, एका नदीच्या खोºयाच्या धाग्याने जोडलो गेले आहोत.
महापुराचा २००५ आणि २०१९ चा धोका जो निर्माण झाला, त्याला अलमट्टी धरणाचा काही संबंध नाही. सांगली, कोल्हापूर आणि नृसिंहवाडीची उंची अलमट्टीपेक्षा खूप आहे. त्या धरणाच्या फुगवट्यापेक्षा आपण पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गासह अनेक ठिकाणी सर्वच नद्यांवर बांधलेले पूल आणि त्यांच्या अप्रोच रोडची भर पहा. कोल्हापूरजवळ सांगली फाटा ते तावडे हॉटेल हा एक मोठा बांधच. पंचगंगेचे पाणी मागे फुगत राहते, हे आपण मान्यच करणार नाही का? या मार्गावरील तावडे हॉटेलजवळचा पूल पाण्याखाली गेला नाही, असाच उंचीचा तो बांधला आहे. शंभर वर्षांतील सर्वांत मोठा महापूर येऊनदेखील जे ब्रिटिश ७२ वर्षांपूर्वी भारत देश सोडून परत गेले, त्यांनी उंची बरोबर मोजली होती. एकही ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला नाही. हे एक शास्त्र आहे. त्याच पुलांना जोडणारे नवे रस्ते करताना त्या भागाच्या पर्यावरणाचा विचारच आपण केला नाही, असाच निष्कर्ष निघतो.
सांगली शहरात येण्यासाठी इस्लामपूर मार्गावर आयर्विन ब्रीज आहे. त्याला पर्यायी पूल वरच्या बाजूला बांधला आहे. तो इतका अरुंद आहे की, या दोन्ही पुलांना तिसरा पर्यायी पूल बांधण्याची गरज चौदा वर्षांत कशी निर्माण झाली? हरिपूरहून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी कवठेसार-हरिपूरदरम्यान पूल हवा, अशी मागणी पुढे आली आहे. हा पूल केला तर उरलीसुरली सांगली पुढील महापुरात वाहूनच जाईल. हा महापूर म्हणजे एक दुर्दैवी घटना होती. तशीच ती दुरुस्त्या करण्याची मोठी संधी आहे, असे मानायला हवे. खासदार संभाजीराजे यांची सूचना ही अर्धसत्य असली तरी महत्त्वाची यासाठीच आहे की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीसह सीमावर्ती भागाचे नियोजन उत्तम पद्धतीने करू शकतो आणि भारतातील एक संपन्न प्रदेश/विभाग म्हणून विकसित करू शकतो. यासाठी केलेल्या चुका मान्य करायला हव्यात.
सांगली शहर पूर्वेला वाढायला हवे होते. ते दक्षिण ते उत्तरेला वाढत राहिले. त्यामध्ये अनेक ओढे-नाले नाहीसे झाले. सांगली शहर परिसरात पडणारे पावसाचे पाणीदेखील आता साठून छोटेखानी पूर थोडा मोठा पाऊस पडला तरी होतो. अनेक रस्ते पाण्याखाली जातात. आज बाजारपेठेची सांगली पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. भारती विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा न्यायालयांची कार्यालये मिरज रस्त्यावर झाल्यावर सांगली पूर्वेला वाढत राहिली. हा बदल दहा वर्षांतील आहे, याचे श्रेय दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांना द्यायला हवे.
क-हाड ते सांगली, कोल्हापूर ते राजापूरचा बंधारा हा सर्व मार्ग आपण पाऊसपाणी, वाहतूक, शहरीकरणाचा विस्तार, आदी सर्वांचा विचार करून करायला हवा आहे. हा प्रदेश ऐतिहासिक घटनांना जोडला आहे, तसा तो असंख्य समान धाग्यांनी पर्यटन, क्रीडाक्षेत्र, शैक्षणिक वातावरण, साहित्य-सांस्कृतिक घडामोडी, साखर, दूध, उद्योग, औद्योगिकनगरी, आदींनी जोडता येतो. उर्वरित महाराष्टÑासह देशातून महाबळेश्वरला येणारा पर्यटक या परिसरात एक आठवडा राहू शकतो इतके वैभव आहे. येथे धार्मिक, ऐतिहासिक स्थळे आहेत. कर्नाटक, कोकण आणि गोव्याच्या मार्गावर असण्याचाही लाभ आहे. या भागाचे दळणवळण बंद पडताच गोव्याची कोंडी झाली होती, कोकणाचे व्यवहार थंडावले होते. सीमावर्ती भागावर परिणाम झाला होता. म्हणजेच कृष्णा खोरे हे एक नदीचे केवळ खोरे नाही, तो एक विकासाचा कॉरिडॉर आहे. त्याची भौगोलिक रचनाच आपणास समृद्धी देते. त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करणार असू तर मात्र त्याचा फटका बसू शकतो. या महापुराने हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. पुन्हा केव्हा महापूर येतो तेव्हाबघू, अशी मस्ती करीत राहिलो तर २००५ आणि २०१९ नंतरचा बसणारा फटका इतका मोठा असेल की, आपण थेट ‘अलमट्टीत’ पोहोचू! यासाठी दक्षिण महाराष्टÑाचा कृष्णा खोऱ्याचा कॉरिडॉर म्हणून तिन्ही जिल्ह्यांचा नवा विकास आराखडा मांडावा.