बी.व्ही.जोंधळे,दलित चळवळीचे अभ्यासक
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर १६ वर्षांनी म्हणजेच ९ जुलै १९७२ ला उदयास आलेल्या दलित पँथरने आंबेडकरी चळवळीला एक आक्रमक नि आश्वासक रूप जसे दिले तसेच अत्याचाराचा प्रतिकार करण्याचे एक सामर्थ्यही प्रदान केले होते. दलित पँथरने लढाऊ भूमिका घेताना म्हटले होते, ‘आम्हाला साऱ्या देशाचे राज्य पाहिजे, आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने आमच्यावरचा अन्याय, अत्याचार, आमचे शोषण थांबणार नाही, आम्ही क्रांतिकारी समूह जागे करून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढू.’
पँथर्सच्या वादळी सभा, जिथे अत्याचार होईल तिथे धावून जाऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्याची कार्यशैली याची सर्वदूर चर्चा होऊ लागली; पण आंबेडकरी चळवळीला जो दुहीचा शाप आहे तो अखेर पँथरलाही भोवला व पँथर चळवळ मोडून पडली. लोककवी वामनदादा कर्डकांनी विकलांग झालेल्या आंबेडकरी चळवळीवर आपल्या लोकगीतांतून भाष्य करताना कळवळून लिहिले.संपला वामन तयाचे गीत आता संपले, संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो!
पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना अशाच विदीर्ण भावना दाटून आल्या तर नवल नव्हे! नामदेव ढसाळांना जातीबरोबरच वर्गाचाही विचार व्हावा असे वाटत होते, म्हणून ते आंबेडकरवादाबरोबरच मार्क्सवादाचीसुद्धा सांगड घालत हाेते. याचा अर्थ ते आंबेडकरवादाला दुय्यम लेखत होते असा नाही. समग्र परिवर्तनासाठी संघर्ष करण्याची ढसाळांची भूमिका चूक नव्हती. याउलट राजा ढालेंची भूमिका समग्र परिवर्तनासाठी धर्मांतरासारखे उपाय योजावेत, अशी हाेती. ढालेंनी १९७८ मध्ये पँथर बरखास्त करून जी मास मूव्हमेंट काढली तिचे उद्दिष्ट बाैद्ध धर्माद्वारे सांस्कृतिक क्रांती घडवून आणावी, हेच होते. काही पँथर्संनी तर ‘जो बुद्धिस्ट, तोच खरा पँथर’ अशी संकुचित भूमिका घेऊन जनसामान्यांची विश्वासार्हता न मिळविता आपले नेतृत्व कसे शाबूत राहील याचीच काळजी वाहिली. हेसुद्धा पँथर चळवळीच्या पीछेहाटीचे एक कारण ठरले.
‘दलित पँथर : एक अधोरेखित सत्य’ या त्यांच्या ग्रंथात अर्जुन डांगळे लिहितात, ‘मध्य मुंबईत बॅ. रामराव आदिक विरुद्ध रोझा देशपांडे या पोटनिवडणुकीत राजा ढालेंनी काँग्रेसशी डील केली, असा आराेप ढसाळांनी ढालेंवर केला. ढालेंनी पँथर बरखास्त करून मास मूव्हमेंट काढली, त्याचेही कारण म्हणजे आपण पँथरचे सर्वोच्च नेते जरी असलो तरी संस्थापक नाही हे शल्य ढालेंच्या मनात डाचत होते! आपणाशिवाय पँथर चालू शकत नाही, असाही भ्रम ढालेंचा होता. पण पुढे रामदास आठवले, अरुण कांबळे, दयानंद मस्के, गंगाधर गाडे, ॲड. प्रीतमकुमार शेगावकर, टी. एम. कांबळे, उमाकांत रणधीर, एस. एम. प्रधान आदींनी पँथरचे पुनरुज्जीवन ‘भारतीय दलित पँथर’ असे करून पँथर चळवळ चालविली; पण १९९६ च्या रिपब्लिकन ऐक्यात पँथरचे विसर्जनही करून टाकले. दलित पँथरचे संस्थापक कोण यावरूनही पँथर्समध्ये श्रेयाचे भांडण निर्माण झाले. ज. वि. पवार म्हणतात, पँथरची कल्पना मला व ढसाळांना सुचली म्हणून आम्हीच खरे पँथरचे संस्थापक आहोत, तर अर्जुन डांगळे लिहितात, राजा ढालेंंचा पँथर स्थापनेत प्रत्यक्ष वाटा नव्हता. ‘साधना’ साप्ताहिकातील ‘काळ स्वातंत्र्य दिन’ या त्यांच्या लेखाला प्रसिद्धी मिळाल्यावर ढाले पँथरमध्ये आले!
- तर राजा ढाले ‘दलित पँथरचा संस्थापक कोण?’ या त्यांच्या पुस्तिकेत ‘संघटना स्थापनेची बीजभूत कल्पना कुणाला तरी सुचावी’ लागते म्हणजे आपणालाच ती सुचली असे ते अप्रत्यक्षपणे सुचवितात.
- दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव आता वर्षभर ठिकठिकाणी साजरा होणार आहे, तेव्हा प्रश्न असा की, दलित चळवळ भूतकाळातच रमणार आहे, की भविष्याचा वेध घेऊन दलित मुक्तीचा लढा पुकारणार आहे? पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या अनुषंगाने चिंतन व्हावे ही अपेक्षा!