सामाजिक माध्यमांमधून जी चर्चा चालते किंवा ज्या संदेशांचे आदान-प्रदान केले जाते, त्यांच्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नसते अशी एक सर्वसाधारण समजूत आता झाली आहे. पण मधूनच अशा माध्यमांमधून असा एखादा संदेश येतो की वाचणारा पार हलून आणि हादरुन जातो. रिओ येथील धडधाकटांच्या आॅलिम्पिक स्पर्धांनी संपूर्ण जगासमवेतच भारतातही एक प्रकारचा उन्माद निर्माण केला होता. पण त्याच जागी दिव्यांगी लोकांसाठी आयोजित पॅरालिम्पिक म्हणजे समांतर आॅलिम्पिक स्पर्धांकडे मात्र फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. समाज माध्यमात याच वास्तवावर नेमके बोट ठेवले गेले आहे. रीतसर आॅलिम्पिक स्पर्धेत ११७ भारतीय स्पर्धक सहभागी झाले आणि त्यांनी पदके आणली दोन. एक रजत तर दुसरे कांस्य. त्याच वेळी पॅरालिम्पिकमध्ये भारतातर्फे सहभागी झाले १९ खेळाडू पण त्यांनी आजवर (स्पर्धा आणखी दोन दिवस चालेल) जिंकून घेतली चार पदके, ज्यात दोन सुवर्णपदके आहेत. परंतु त्यांच्यापैकी एकालाही कोणी प्रायोजक नव्हता. प्रसिद्धीचा अभाव होता. ज्यांनी पदके जिंकली त्यांना कोटीतली नव्हे तर काही लाखातली आणि तीदेखील एखाद्या राज्येतर्फेच बक्षिसे जाहीर केली गेली. सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत कुठे दिसले आणि जाणवलेही नाहीत. समाज माध्यमातला संदेश पुढे म्हणतो, यात सशक्त आणि कमीशक्त यांच्यातील तुलनेचा हा प्रश्न नाही. जे जिंकले त्यांना ‘बीएमडब्ल्यु’ कोणी देणार नाही. तेव्हां किंमान मारुती उद्योगाने तरी काही विचार करावा, असेही हा संदेश सुचवतो. वस्तुत: जे लोक शारीरिक वा मानसिकदृष्ट्या अपंग आहेत त्यांच्यासाठी केन्द्रातील नव्या सरकारने अपंगसाठी दिव्यांग हा शब्द घडवला आहे. शब्दांच्या अशा खेळी करण्यात तसेही भाजपाच्या लोकांचा हात कोणी धरणार नाही. पण त्यांचे कौशल्य इतक्यापुरतेच मर्यादित आहे. रिओत सिंधू आणि साक्षी यांनी पदकांची कमाई केली आणि ज्यांना पदक मिळवता आले नाही पण तिथपर्यंत धडक मारता आली त्यांचे झालेले व होत असलेले कौतुक योग्यच आहे. पण केवळ तितकेच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघ जेव्हां एखादा आणि विशेषत: पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकतो तेव्हां राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसदेपासून सारेच आपला आनंद व्यक्त करुन मोकळे होतात. पण मरियप्पन थंगवेलू आणि देवेन्द्र झाजरिया या पुरुष खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली (यातील देवेन्द्रने तर जागतिक विक्रम मोडला) वरुणसिंग भाटीने कांस्य तर दीपा मलिकने रौप्य पदक जिंकले पण त्यापैकी कोणीही सिंधू वा साक्षीइतके नशिबवान ठरले नाही. मग प्रश्न निर्माण होतो, दिव्यांगी नेमके कोण आहे?