- यदू जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतमागच्या चार महिन्यांपासून टीव्ही चॅनल्सचा नवा अवतार पहायला मिळतोय. हा नवा माध्यम दहशतवाद आहे. आम्ही दाखवू तेच अंतिम सत्य अन् बाकी सगळे मूर्ख, आम्ही तेवढे चरित्रवान आणि आम्ही म्हणू ते चरित्रहीन असे प्रमाणपत्र देण्याची जीवघेणी स्पर्धा चॅनल्समध्ये लागली आहे. श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये कसा झाला हे एका रिपोर्टरने टबमध्ये झोपून सांगणं इथपर्यंतही ठीक होतं, पण आता तर हद्द झाली. अरे! उद्धव...(जी) असे मुख्यमंत्र्यांना म्हणेपर्यंत मजल गेली. आक्रस्ताळेपणाचा किळसवाणा प्रकार ! एक चॅनल तसे करते म्हणून दुसरेही करणार! एकाने नाचून सांगितले म्हणून दुसरा उड्या मारून रिपोर्टिंग करणार ! उलट्या पायांची शर्यत सुरू आहे. त्यातून विश्वासार्हतेच्या पार चिंधड्या उडाल्या असून, प्रेक्षकवर्ग भयचकित झाला आहे. माहितीला (इन्फॉर्मेशन) करमणुकीची (एंटरटेन्मेंट) फोडणी घालून एन्फोटेन्मेंट नावाची अफूची गोळी प्रेक्षकांना खाऊ घातली जात आहे. आता तर टीआरपी मॅनेज करण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा भांडाफोड केला. दोन फारशा माहिती नसलेल्या चॅनलच्या मालकांना ताब्यात घेतले आणि ज्यांना टार्गेट करण्यासाठी सरकार आसुसलेले आहे त्यांना चौकशीच्या घेऱ्यात आणले. अन्य एका चॅनलचे एफआयआरमध्ये नाव आहे; पण पुरावा नाही असे सांगतात! हा सिलेक्टिव्ह न्याय कशासाठी? टीआरपी वाढवण्यासाठी चॅनल्सवाले पैसे देताहेत; पण हा टीआरपी वाढवायला पोलीस का मदत करताहेत? आरडाओरड आणि उर्मटपणाने विश्वासार्हतेच्या आघाडीवर आपटलेल्यांचा टीआरपी वाढवून पायावर धोंडा मारून घेतला जात आहे. टीआरपी वाढवून घेण्यासाठी जे चॅनल्स नाही नाही ते धंदे करतात त्या सगळ्यांनाच चौकशीच्या रडारवर आणा. एका चॅनलचा संपादक हा मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप करतो आणि तरीही मानहानीची साधी तक्रार केली जात नाही, हे बोटचेपेणाचे लक्षण आहे. उद्धव ठाकरे हे कोण्या एका पक्षाचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बदनामीवर टीआरपीचा उतारा हे संपादकास थेट हात लावण्याची अजूनही हिंमत नसल्याचे लक्षण आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांच्या बदनामीचे षड्यंत्र भाजपने रचल्याचा आरोप अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या अहवालाच्या हवाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तरीही भाजपवाले शांत आहेत. देशमुखांना नोटीस का पाठवत नाहीत?
टीआरपीसाठी विश्वासार्हतेच्या चिंधड्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:41 IST