- डॉ. नीरज देव
रस्त्याने जाताना मी जेव्हा हिंदूंचे स्मशान, मुस्लिमांचे कब्रस्तान वा ख्रिश्चनांची दफनभूमी पाहतो तेव्हा विचारांचे काहूर माजते. हसावे की रडावे तेच कळत नाही. खरेतर मन विषण्ण होते. माणूस म्हणविणाऱ्या माणसा-माणसांतील भिंती मरणानंतरही तशाच राहतात तर! धन-काञ्चन-हाडामासाच्या स्त्रीचासुद्धा त्याग करा, असे सांगणारा धर्म मृत्तिकावत् देहाचा लोभ का बरे सोडत नसावा? देहावर अंतिम संस्कार होणाऱ्या जागेचा व पद्धतीचा एवढा मोह, विरागी म्हणवून घेणाऱ्या धर्माला का बरे पडावा?स्मशान कोणाचेही असो हिंदूंची दहनभूमी वा मुस्लीम-ख्रिश्चनांची दफनभूमी; मन उदास करते. जीवनाची नश्वरता क्षणोक्षणी दाटून आणते. वाटायला लागते या जीवनात-जीवनातील धन-दौलत, मान-प्रतिष्ठेत काहीच अर्थ नाही. सारे काही इथे येऊन संपणारे. राजवाड्यात राहणारा असो की झोपडीत, शेवटी येथे सारे सारखेच. कळत-नकळत वाटायला लागते आता तरी बदमाशी सोडावी, वृथा लोभ सोडावा, काही तरी सत्कर्म करावे. परलोक मानणाऱ्या व न मानणाऱ्या दोहोंनाही असेच वाटते. यालाच तर म्हणतात ‘स्मशान वैराग्य’! स्मशानात येणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट जाणवून देणे हाच असतो ‘स्मशानाचा धर्म’!स्मशान जशी जाणीव करून देते इहलोकाच्या नश्वरतेची तशीच नकळत आस जागवते परलोकाची-मृत्यूनंतरच्या अज्ञात प्रदेशाची अन् या आशेतच जन्म होतो धर्माचा. धर्म जरी समग्र जीवनावर अधिकार सांगत असला तरी त्याचा मूलभूत आधार असतो परलोकावर, भिस्त असते पाप-पुण्याच्या हिशोबावर. चिंता असते परलोक सुधारण्याची अन् ती जाणीव तीव्रपणे मिळते स्मशानातच. त्यामुळेच असेल की काय एकाच प्रसूतिगृहात जन्मणारी, एकाच शाळेत शिकणारी, एकाच ठिकाणी काम करणारी, वस्त्या-वस्त्यांच्या भिंती बांधून का होईना पण एकाच गावात राहणारी माणसे मृत्यूनंतर मात्र वेगवेगळ्या स्मशानात जातात. धर्म न मानणाऱ्यालासुद्धा त्याच्याच धर्माच्या स्मशानात वा कब्रस्तानात आणून जाळले वा गाडले जाते व त्याच्या मृतदेहावर धर्माचा शिक्का मारला जातो, भिंती पक्क्या होतात.मला ठाऊक नाही की भिंती बांधल्यामुळे मने दुरावतात की मनातच भिंती असतात म्हणून दुरावा निर्माण होतो? काही विचारवंतांना वाटते भिंती मनातच असतात, पण मनाचा अभ्यास करणाऱ्या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांना वाटते भिंती पाडल्या तर मने जवळ येतात. मग आपण असा प्रयोग आपण करून पाहायला काय हरकत आहे? दहन-दफनाची दोन्ही स्मशाने एकच करता आली तर...? भिंती पडायला आरंभ तरी होईल. समजा एक जरी करता नाही आली तरी दहन व दफनविधीला उपस्थित तर राहता येते. उपस्थित राहिलो तर निदान एवढे सत्य तरी कळेल की, कोणत्याही जाती-धर्माचा माणूस असो, त्याला जाळले जावो वा पुरले जावो तो शेवटी मातीलाच मिळतो. ते जर आपण वारंवार पाहत राहिलो तर कदाचित तुटलेली मने सांधता येतील, किमानपक्षी दुरावा तरी घटेल. निदान त्या दिशेने एखादे पाऊल तरी पडेल.कधी कधी असेही वाटते मृत्यूनंतर आपल्या देहाचे काय करावे हा अधिकार सुजाण व्यक्तीने स्वत:च वापरून, आपल्या देहाचे दहन वा दफन काय करावे ते ठरवून ठेवावे. दहन व दफनभूमी अशी दोनच स्मशाने ठेवावीत व धर्मा-धर्माचा विचार न करता त्या व्यक्तीच्या मताचा आदर करीत त्याला त्या त्या भूमीत दहन वा दफन करावे. हे करता येणे अशक्य कोटीतील वाटेल, पण निव्वळ विचार करायला तरी काय हरकत आहे?
(लेखक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)