- विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक
एखाद्या सिरीअल किलरला पोलीस कसे शोधतात या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. खुनाच्या जागेवर सापडलेले सुगावे, खून करण्याची विशिष्ट पद्धत वगैरे बरेच घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. गुंतागुंतीची शोध प्रक्रिया असते ती. पण, या साऱ्या घटकांपेक्षाही खून झालेल्या जागांचे भौगोलिक स्थान हा घटक अधिक महत्त्वाचा ठरतो असे सांगितले तर? पटकन विश्वास बसणार नाही, पण हे अनेक प्रकरणांमध्ये खरे असते. खून, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या मालिकेमध्ये गुन्हा घडलेल्या जागांच्या भौगोलिक स्थानांचे योग्य विश्लेषण केले तर त्यात एक पॅटर्न सापडतो आणि त्याच्याच आधारे संशयित राहत असलेल्या भागाचा बऱ्यापैकी अचूक अंदाज बांधता येतो हे या तपास पद्धतीचे सूत्र.
या सूत्राचे तार्किक आधार दोन. एक म्हणजे बहुतेक गुन्हेगार त्यांच्या स्थानिक परिसरात जास्त गुन्हे करतात. म्हणजेच गुन्ह्याच्या जागेपासून जसे दूर जाऊ तसे गुन्हेगार सापडण्याची शक्यता कमी होत जाते. गुन्हेशास्त्राच्या परिभाषेत याला ‘स्थान ऱ्हास’ म्हणतात. दुसरे म्हणजे, गुन्हेगार आपल्या राहत्या जागेच्या फार जवळ गुन्हे करीत नाहीत.
आपल्या अगदी जवळच्या भागात गुन्हा करून उगाच पोलिसांचा वावर आणि संशय वाढविण्याचा धोका गुन्हेगार पत्करत नाहीत. राहत्या जागेजवळ ते एक सुरक्षित वर्तुळ म्हणजे बफर झोन तयार करतात. स्थान ऱ्हास आणि सुरक्षा वर्तुळ या दोन भौगोलिक घटकांचा योग्य मेळ घातला तर सिरियल किलर राहत असलेला परिसर बऱ्यापैकी नेमकेपणे ठरविता येऊ शकतो यावर या तपासपद्धतीचा विश्वास. त्यालाच गणिती सूत्राची, नकाशाची जोड देऊन ही शोधपद्धती लक्ष्य परिसर (टार्गेट एरिया) पक्का करते आणि मग इतर सुगावे, पुरावे यांच्या आधारे गुन्हेगारापर्यंत पोहचते.
गुन्हेशास्त्रामध्ये आज बऱ्यापैकी प्रस्थापित झालेल्या या पद्धतीची सुरुवात तशी दोनशे वर्षांपूर्वीची. फ्रान्समधील आंद्रे ग्युएरी या वकिलाने हजारो गुन्ह्यांच्या नीट तपशीलवार नोंदी लावून, त्याला संख्याशास्त्राची जोड देऊन त्याचा पाया घातला. एखाद्या भागातील गुन्हे अगदीच रँडमली घडत नाहीत. गुन्ह्यांच्या घटनांमध्येच नाही तर गुन्हेगारांच्या आणि त्यांच्या शैलीच्या बाबतीतही काही वर्तनवृत्ती (पॅटर्न्स) आढळून येतात, असा त्यांचा दावा होता. त्या वर्तनवृत्तींच्या आधारे एखाद्या परिसरात कोणत्या प्रकारचे किती गुन्हे घडतील आणि कोणत्या प्रकारचे गुन्हेगार ते करतील याची बऱ्यापैकी अचूक भाकिते ग्युएरी करायचे. त्यांच्याच पद्धतीला पुढे नेत, त्याला आधुनिक संख्याशास्त्राची व अल्गोरिदम्सची जोड देत कॅनडातील तपास अधिकारी किम रॉसमो आणि न्यूयार्कमधील दोन पोलीस अधिकारी जॅक मॅपल व बिल ब्रॅटन यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आणि मुख्य म्हणजे अनेक गुन्हे मुळात होण्याचेच थांबवले. हे सगळे घडत गेले ते १९८० ते १९९० या दशकामध्ये.
विशेषतः मॅपल आणि ब्रॅटन यांनी एकत्रितपणे केलेल्या कामामुळे एकेकाळी गुन्हेगारांची बजबजपुरी असलेले न्यूयॉर्कमधील सबवेचे जाळे बऱ्यापैकी मोकळे झाले. घडलेल्या गुन्ह्यांच्या, गुन्ह्यांसंबधी फोनवरील माहितीच्या तपशीलवार नोंदी ठेवायच्या, त्याला गणिती सूत्रे लावून त्यातील वर्तनवृत्ती शोधायच्या आणि त्याआधारे शहरातील गुन्ह्यांची संभावित भौगोलिक क्षेत्रे किंवा हॉटस्पॉट कोणते असतील याची भाकिते करायची ही त्यांची पद्धत. एकदा हे हॉटस्पॉट ठरवता आले की मग, तिथे बंदोबस्त वाढवायचा. किरकोळ गुन्हेगारी वर्तनालाही पोलिसी चाप बसवायचा. त्यामुळे दोन गोष्टी साध्य व्हायच्या. एक पोलिसांच्या वावरामुळे हॉटपॉटमधील संभाव्य गुन्हेगारांमध्ये जरब बसायची. आणि दुसरे म्हणजे किरकोळ गुन्हा करणाऱ्यालाही ताब्यात घेतल्यामुळे मोठे गुन्हेही टळायचे. कारण बहुतेकवेळा किरकोळ गुन्हे करणाऱ्या व्यक्तीच नजीकच्या भविष्यात मोठे गुन्हे करण्याची शक्यताही जास्त असायची. हाच उद्देश असलेले पोलीस पेट्रोलिंग बहुतेकवेळा फार ढोबळमानाने केले जाते. शहराचे सरधोपटपणे भौगोलिक हिस्से करायचे आणि उपलब्ध पेट्रोलिंग पार्टींना ते वाटून द्यायचे. अशा रँडम वाटणीमुळे संभाव्य गुन्हा घडण्याच्या क्षेत्रात आणि वेळेत पोलीस पार्टी तिथे हजर असण्याची शक्यता हजारात एखादी असते. पण मॅपल आणि ब्रॅटन यांच्या हॉटस्पॉट पद्धतीमुळे ती शक्यता कैकपटीने वाढते.
हे अगदी भूकंपानंतरच्या धक्क्यांसारखे आहे. उपलब्ध सिद्धांतांच्या आधारे एखाद्या ठिकाणी भूकंप घडण्याची संभाव्यता फार ढोबळ पातळीवर करता येते. पण, एखाद्या ठिकाणी भूकंप झाल्यानंतर भूकंपोत्तर धक्के (ट्रेमर्स) किती आणि कुठे बसतील याची भाकिते मात्र अधिक अचूक पातळीवर करता येतात. गुन्हे हेही या भूकंप आणि भूकंपोत्तर धक्क्यांसारखे आहे. पहिल्या गुन्ह्याचे भाकित नीट करता येणार नाही. पण त्यानंतरच्या गुन्ह्यांबाबतची भाकिते मात्र बऱ्यापैकी अचूक येतील.
ऐंशीच्या दशकातील शान नावाच्या हिंदी चित्रपटात अब्दुल नावाचे एका खबरीचे पात्र खूप गाजले. दोन्ही पायाने अधू असलेला गरीब अब्दुल चाकाच्या पाटावर फिरत शहराच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवून असे. कुठे काय घडते आहे आणि घडू शकेल याचा त्याला चांगलाच अंदाज असे. बहुतेक पोलीस तपासाचा मुख्य आधार आजही असेच गावोगावचे अब्दुलच आहेत. पण आज त्यांच्या जोडीला कृत्रिम बुद्धिमत्तेचे अब्दुल आले आहेत. कसे काम करतात हे नवे अब्दुल, त्यांचे यश किती, त्यांच्यामुळे काय फायदे होतात आणि काय नवे प्रश्न निर्माण होतात? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात.. vishramdhole@gmail.com
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"